“नाना पटोले डोक्यावर पडलेले नेते” – भाजप शहर जिल्हाध्यक्ष

डोंबिवली : कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना अक्कल नसून, ते डोक्यावर पडलेले राजकारणी नेते आहेत. तसेच नाना पटोले सडलेल्या मेंदूचे राजकारणी आहेत. असे खळबळजनक वक्तव्य कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे (Shashikant Kamble) यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वीच तथाकथीत गावगुंड मोदीच्या नावे केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली होती. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभरात  उमटताना दिसत असून भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. असे असताना रविवारी देखील नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील  स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करून भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

BJP protests against Nana Patole in Dombivali

कल्याण-डोंबिवलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार ? आमदार गणपत गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर शहरात तुटवडा जाणवत आहे. यामुळेच हे औषध मूळ किंमती पेक्षा तीन चार पटींने अधिक किंमतीत काळ्या बाजारात विकले जात आहे. असे पत्र कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या तुटवड्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर रातोरात औषधांचा पुरवठा करण्यात आला. मात्र सध्या कल्याण डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काही माफिया हे इंजेक्शन मूळ किमती पेक्षा तीन चार पटीने विकून त्याचा काळाबाजार करीत आहेत. आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक किंमत मोजायला तयार होतात व औषध विकत घेतात. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कोरोना काळात उधोगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात पिचलेल्यानी काय करावं ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय रेमडेसिवीर सहज उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी नातेवाईकांना लांब लांबचे अंतर भर उन्हात कापावे लागत आहे. तरी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा मेडिकल मध्ये उपलब्ध करून द्यावा व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांसाठी परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचा ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असुन या औषधाचा मुबलकसाठा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच या औषधाचा काळाबाजार करून मुळ किमती पेक्षा तीन ते चार पट वाढीव दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे साहेब, मा.श्री.राजेशजी नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली.

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)
क.डों.म.पा. क्षेत्रातील कोरोना आकडा पुन्हा चार अंकी – कल्याणचे खासदारही कोरोना पोजिटिव्ह

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही कोरोनाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.

वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्र देखील या आजाराने फोफावले होते. दररोजचा आकडा हा ५०० पर्यंत देखील गेला होता. मात्र हा आकडा जानेवारी पर्यंत निवळत येत दोन अंकी झाला होता. तर एकूण कोरोना रुग्ण हे तीन अंकी म्हणजे १००० च्या आत आले होते. मात्र आता या महापालिका क्षेत्रात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत २०० चा आकडा देखील पार झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी १७८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर महापालिका क्षेत्रात आता सध्याच्या घडीला म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत १६४६ एक्टिव्ह कोरोनारूग्ण आहेत. हा चार अंकी आकडा पुन्हा तीन अंकी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं जास्त गरजेचं असणार आहे.

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील मागील दोन-तीन दिवस त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. १ मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती आपल्या फेसबुकद्वारे दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून जे माझ्या संपर्कात आले त्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी आता केलं आहे.

मास्क कारवाईत पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ – दोघांवर गुन्हा दाखल

विना मास्क फिरणाऱ्या विरोधातील कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यावरून दोघांना गजाआड करण्यात आलय. पुन्हा वाढणाऱ्या कोरोनावर नागरिक संवेदनशील नाहीत का? असा सवाल यातून उपस्थित होतोय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र ४ जे ची मास्क परिधान न करणाऱ्यांवर आज चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता. त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. याउलट या दोघांनी थेट पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

लग्नासाठी चाललेले हे दोघेही आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळी वेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाहीच. उलट अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी देणे, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

कल्याण – डोंबिवलीचे उत्तर आठ दिवसांत देणार – अविनाश जाधव ,मनसे जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज घरत यांना तत्काळ डोंबिवली शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आणि ‘व्हायचं ते होणारच’ अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांना चेतावणी दिली.

बुधवारी कृष्णकुंज येथे शेकडो सेना-भाजप कार्यकर्त्यांनी तसेच ५०० उत्तर भारतीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे योगदान होते. हा पक्षप्रवेश म्हणजे डोंबिवलीचे उत्तर होते का ? असा सवाल त्यांना उपस्थित माध्यमांनी केला होता.
“कल्याण डोंबिवलीचे उत्तर कल्याण डोंबिवलीतच देणार. आठ दहा दिवस थांबा राजू पाटील मोठा पक्ष प्रवेश घडवून आणणार आहेत.” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

आठ दिवसांत मनसे कल्याण डोंबिवलीत कोणाला पक्षात आणणार याकडे संपूर्ण मनसैनिक आणि इतर राजकीय पक्ष आताच लक्ष ठेवून आहेत. मनसे बेरजेची गणित जुळवण्याची तयारी करीत असताना इतर पक्षांना वजबाकीचा सामना करावा लागू नये म्हणजे नवलच.

राज ठाकरेंमुळे महापालिकेत कॅबिन मिळाली आणि आता पक्ष सोडला. – नव्या शहराध्यक्षाची घणाघाती टीका.

डोंबिवलीत मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना मनसेच्या नव्या डोंबिवली शहराध्यक्षांनी मनसे सोडलेल्यां वर घणाघाती टीका केली.

मागील आठवड्यात डोंबिवली मध्ये मनसेला दोन मोठे धक्के बसल्याचे पहायला मिळाले. एक म्हणजे शहराध्यक्ष पद सोडून राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली.

डोंबिवलीत पार पडलेल्या महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात बोलताना मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर नाव न घेता सडकून टिका केली. जे गेले त्यांनी स्वतःचा इमान विकला आहे. त्यांनी स्वतःला विकलंय असे त्यांनी आरोप केले. तर राज साहेबांमुळे ज्यांना इतके वर्ष महापालिकेत केबिन मिळाली ते देखील स्वार्थीपणे सोडून गेलेत. आपण इमान विकायचा नाही असा घणाघाती आरोप त्यांनी मनसे सोडून गेलेल्यांवर केला आहे. डोंबिवलीत आयोजित पक्षाच्या मेळाव्यातून ते बोलत होते. मनोज घरत यांची नियुक्ती झाल्या नंतर मनसेने कल्याण डोंबिवलीत पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.

सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय ? – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

डोंबिवली ग्रामीण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच समारंभाला मनसे नेत्या तसेच सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारला जाब विचारला.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालिनी ठाकरे आल्या होत्या. मात्र पत्रकारांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या आंदोलना बाबत विचारले असता शालिनी ठाकरे यांनी दोन्ही पक्षाना सवाल केले आहेत.

शुक्रवारी भाजपाने वाढीव वीजबिल कमी करण्यासाठीच्या मुद्द्यावर राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. तर शिवसेनेने देखील वाढीव इंधनदर आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन केले. हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. तरीही आंदोलन करीत आहेत. यांना आंदोलन करायची काय आवश्यकता आहे ? हे प्रश्न सोडवायचे सोडून एकमेकांवर लादत आहेत. असा आरोप व सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केल्या. डोंबिवलीतील आयोजित मनसेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.