School Election : जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली निवडणूक; विद्यार्थ्यांमध्ये निवडला मुख्यमंत्री

School Election : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नागरिक शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मिळाले पाहिजेत, लोकशाहीचं प्रत्यक्ष ज्ञान मिळाले पाहिजे या उद्देशाने ही घेतलेली निवडणूक निश्चितच उत्साह वाढवणारी, प्रेरणा देणारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे आहे. सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी शालेय निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सरपंच राजेंद्र मढवी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. त्यावेळी तयार झालेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना राजेंद्र मढवी बोलत होते.

आपल्या गावाचा कारभार ते देशाचा कारभार लोकच चालवत असतात. तसेच आपल्या शाळेचा आपणच कारभार चालवायला पाहिजे, यासाठीच ही शालेय निवडणूक घेतली असे उपक्रमाचे संकल्पना असलेले राहनाळ शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नुकतीच शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी वोटिंग मशीन या अँड्रॉइडचा वापर करून त्याच्या साह्याने मतदान घेतले. राहनाळ शाळेत एकूण सात पदांसाठी हे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी अनघा दळवी यांनी मोबाईल ॲपमध्ये नामनिर्देशित उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण सात जागांसाठी २२ विद्यार्थी उमेदवार रिंगणात उतरले होते. फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी दहा मुलांनी माघार घेतली. व बारा उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलांनी प्रचार केला. निवडणूक कर्मचारी एक, दोन, तीन, केंद्राध्यक्ष ही कामे विद्यार्थ्यांनीच केली. त्यासाठी चित्रा पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कोणीही बोगस मतदान किंवा नोटाचा वापर केला नाही हे विशेष असे रसिका पाटील यांनी सांगितले. इयत्ता तिसरी ते सातवीच्या शंभर मुलांनी यावेळी मतदान केले. मतदानाची वेळ संपल्यावर बटन बंद करून मतदान प्रक्रिया संपल्याचे मतदान अधिकारी तेजस बोटके यांनी निकालासाठी रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल सर्वांच्या उपस्थितीत जाहीर केला.

निवडणूकीत जिंकलेल्या विद्यार्थांनी निकाल लागताच एकच जल्लोष केला. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधूनच मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राकेश चौहान,  उपमुख्यमंत्री सुमंत सिंग, शिक्षण मंत्री तन्वी निस्कुळ, सांस्कृतिक मंत्री मीत कडू, आरोग्यमंत्री संस्कृती शिगवण, पर्यावरण मंत्री नेहा झिंझुरडे, क्रीडामंत्री श्रेयस कुंभार यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाचे राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी शाळ व श्रीफळ देऊन सत्कार करत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राहनाळ गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कुणाल म्हात्रे

School Election: Election was held in Zilla Parishad school; Chief Minister elected among students

Shrikant Shinde : खासदारांच्या दौऱ्यात कल्याण पूर्वेच्या शाखेत राढा? ‘ही’ माहिती आली पुढे

Shrikant Shinde :- शिवसेना कल्याण उपशहर संघटक आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेच्या कॉलरला धरून शिवसेनेच्या शाखेबाहेर काढले असल्याची एक पोस्ट काल पासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्वेचा दौरा केला होता. याचदरम्यान कोळसेवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत हा प्रकार घडला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. व असे कोणतेही कृत्य घडले नसून अज्ञात इसमाने ही पोस्ट व्हायरल केली असल्याचा खुलासा आशा रसाळ यांनी स्वतःच आता पोलिसां समोर केला आहे. पक्षांतर्गत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी तरी करीत असल्याचे सांगत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्ट मागे कोणाचा हात आहे हा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

शिवसैनिकांनी मध्यवर्ती शाखेला टाळे ठोकले होते. यानंतर शिंदे समर्थकांनी कुलूप तोडले असून श्रीकांत शिंदे यांनी आत प्रवेश करू नये म्हणून आशा रसाळ यांनी त्यांना आत जाण्यास प्रतिबंध करीत गदारोळ केला असल्याचे व्हायरल पोस्ट मध्ये नमूद केले आहे. मात्र आता या पोस्ट बाबत त्यांना कसलीही कल्पना नसून अज्ञात इसमाने तेढ निर्माण करण्यासाठी हे केले असावे असा खुलासा त्यांनी स्वतः पोलिसांसमोर केला असल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. आता यामागे कोण होते ? हा तपास सायबर सेल कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

-संतोष दिवाडकर

Shrikant Shinde: Dispute in Kalyan East branch during MP’s visit? Sensation by viral post

Eknath Shinde : नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी  

कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  

२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. 

यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.

येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development

Dombivali Crime : गांजा तस्करी साठी आलेल्या २ गांजा तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Dombivali Crime : मानपाडा पोलिसांनी ओडिसा वरून २७२ किलो गांज्याची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी अशी या आरोपींची नावे असून या आरोपींकडून २६३ किलो गांजा, ६ मोबाईल, एक इनोवा कार अशाप्रकारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा गांजा कोणासाठी व कुठे विक्रीसाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहे.

गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याने पोलीस ऍक्शन मोड वर येत गेले काही दिवसांपासून अनेक ठिकाणी नाकाबंदी व छापे मारून गांजा विकणाऱ्या व गांजाची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळत आहेत. त्याच प्रकारे मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल भिसे यांना दोन व्यक्ती उडीसा वरून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी डोंबिवलीत आणणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या आदेशानंतर एक पथक बनवून डोंबिवली मानपाडा परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहीमे दरम्यान डोंबिवली मधील उबार्ली गावात एक संशयित इनोव्हा कार उभी असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या नंतर मानपाडा पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन कार मालकाची विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान ईनोवा कार मधील आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेत कार मधून 272 किलो गांजा जप्त करत कार मधील या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना खाकी दाखवत पुन्हा विचारपूस सुरू केली असता त्यांनी हा गांजा ठाणे व ठाण्याजवळील उपनगरामध्ये छोटे-मोठे गांजाच्या व्यापाऱ्यांना तस्करी करून विक्रीसाठी देत असल्याची कबुली दिली.

-संतोष दिवाडकर

Dombivali Crime: Police handcuffed 2 cannabis smugglers who came for cannabis smuggling

Farmer Day व Doctors Day चे औचित्य साधत आंबिवली जैवविविधता उदयान येथे वृक्षारोपण

Farmer Day : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे ४० एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उदयान उभारले आहे. या उदयानात एकाच ठिकाणी फुलपाखरु उदयान, बॅट पार्क, बी पार्क, नक्षत्र उदयान, मेडीसिनल प्लांट पार्क अनोखे आहेत.

आज कृषी दिन व डॉक्टर्स डे औचित्य साधून या ठिकाणी महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच क्रेडाई-एमसीएचआय आणि कल्याण डोंबिवली युनिट यांचा दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जैवविविधता पार्कमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रम साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आयएमए चे डॉ. प्रशांत पाटील, विविध संघटनांचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे प्रतिनिधी, वृक्ष अधिकारी तथा महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व महापालिका शाळांचे विदयार्थी, आय नेचर फाऊंडेशनचे प्रतिनिधी तसेच अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

Plantation at Ambivali Biodiversity Park on the occasion of Farmer Day and Doctors Day

Shivsena : डोंबिवलीत पार पडली शिवसेनेची महत्त्वाची बैठक

Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर शिवसेनेत शिंदे की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये आपापसात वादावादी आणि गैरसमज नको म्हणून आज डोंबिवलीत शिवसैनिकांची एक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पार पडलेल्या बैठकीच्या वेळी कल्याण जिल्हा प्रमुख लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जे काही सुरु आहे. विशेषत: शिवसेनेत जे काही चालले आहे. बंडखोरी झालेली असून आम्ही शिवसेनेतच आहोत असे सर्व म्हणत आहेत. या बाबतीत कायदेशीर लढाई सुरु झालेली आहे. निश्चीतपणे त्या बाबतीत जो काही निर्णय लागेल, जो काही पक्षाचा आदेश येईल. त्या प्रमाणे शिवसैनिक काम करतील. मात्र शिवसैनिकांमध्ये गैरसमज आणि आपापसात वादावादी होऊ नये. सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर यावी यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचेही लांडगे म्हणाले.

एका शिंदे समर्थकाला शिवसैनिकांनी चोप दिल्याची घटना घडली असल्याविषयी लांडगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, असा काही एक प्रकार घडलेला नाही. कपोलकल्पीत काही घडवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. अशा राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत का? अशी विचारणा लांडगे यांना केली असता त्यांनी सांगितले की, मुंबई पासून कर्जत, अलिबाग एमएमआर रिजनमध्ये बैठका सुरु आहेत. कल्याण डोंबिवलीला येण्याचे तूर्तास तरी नियोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.

-रोशन उबाळे

Shivsena: An important meeting of Shivsena was held in Dombivali

MSRTC Ticket Booking : विठ्ठलवाडी एसटी आगारात गौरी गणपती आरक्षणाला झाली सुरुवात

MSRTC Ticket Booking : गौरी गणपती सणाच्या निमित्ताने कोकण तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी विठ्ठलवाडी एसटी आगारात आगाऊ आरक्षण सुरू करण्यात आले आहे. २८ जून ते २ जुलै पर्यंत आगाऊ तिकीट आरक्षण केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील कल्याणसह विठ्ठलवाडी एसटी आगारातून गौरी गणपती सणाला मोठ्या प्रमाणावर एसटी बस कोकणाकडे रवाना होतात. त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूर मार्गावरही काही एसटी ठराविक वेळेत सुटतात. मात्र याच एसटी बसेस साठीचे आगाउ आरक्षण आजपासून सुरू करण्यात आले असून प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठलवाडी एसटी आगाराकडून प्रवाशांना केले जात आहे. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणावर विठ्ठलवाडी एसटी आगारातून प्रवास करतात.

विठ्ठलवाडी आगाराने निश्चित केलेल्या पत्रकानुसर २८ जून रोजी २६ ऑगस्ट साठीचे आरक्षण केले गेले. यानंतर २९ जून रोजी २७ ऑगस्टसाठीचे आरक्षण केले जात आहे. तर ३० जून रोजी २९ ऑगस्टसाठी, १ जुलै रोजी २९ ऑगस्टसाठी आणि २ जुलै रोजी ३० ऑगस्ट साठीचे आरक्षण करवून घेण्यात येणार आहे. सर्व बसेसचे आरक्षण हे आगारातील खिडकीवर तसेच ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे.

-संतोष दिवाडकर

MSRTC Ticket Booking : Gauri Ganpati reservation started at Vithalwadi ST depot

Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी ३५ हुन अधिक आमदारांसह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून बंड पुकारणारे सर्व आमदार राज्याबाहेर गुवाहाटी येथे थांबले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली युती मान्य नसल्याचे या बंडातून सांगितले जात आहे. मात्र यावरून शिवसैनिक आता महाराष्ट्र भरात आक्रमक होताना दिसत आहेत.

ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याचा एक समज आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालय शनिवारी फोडण्यात आल्या नंतर पोलिसांनी आता अधिक गंभीर भूमिका घेतली असून राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून ठाणे ग्रामीण भागात ३० जून पर्यंत तर मुंबईत १० जुलै पर्यंत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

-संतोष दिवाडकर

Shivsena: MP Shrikant Shinde’s office vandalized by shivsainik

Kalyan Rape Case : तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात नव्या कलमांची वाढ

Kalyan Rape Case : मागील दीड वर्षापासून एका विद्यार्थीनिवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. आपल्यावर होत असलेले अत्याचार ती विद्यार्थीनी बराच काळ सहन करीत होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने पिडीताने तिच्या राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि आय टी कलमे लावण्यात आली आहेत. कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात आठवड्याभरापूर्वी एका अल्पवयीन विद्यार्थीनीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करुन तपास सुरु केला. विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील नोटपॅडवर तिने तिची व्यथा मांडली होती. बारावीत ७१ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी एफवायच्या वर्गात प्रवेश घेणार होती मात्र त्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. तिच्या मोबाईलमधील नोटपॅडमध्ये तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करण्यात आल्याचे तिने नमूद केले होते. मागील दीड वर्षापासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे चक्र फिरविले आणि या प्रकरणी सात आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. विजय यादव, प्रमय तिवारी, सनी पांडे, शिवम पांडे, कृष्णा जायस्वाल, आनंद पांडे, निखिल मिश्रा या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर काजल जैयस्वाल या मुलीचा देखील या प्रकरणात समावेश असल्याने तिला देखील तत्काळ ताब्यात घेण्यात आले.

विद्यार्थीनीचे एका तरुणा सोबत प्रेमसंबंध होते. यातच तरुणासोबत फोटो व व्हिडिओ काढण्यात आले होते. त्यानंतर पीडितेला सातत्याने इतर तरुण ब्लॅकमेल करत होते. धक्कादायक बाब म्हणजे तिची मैत्रीण सुद्धा आरोपी तरुणासमवेत तिला ब्लॅकमेल करत होती. अशी धक्कादायक घटना घडल्याने कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली आहे. या घटनेची व्यापकता आणि घृणास्पद कृत्य यामुळे राजकीय आणि सामाजिक संघटनांनी देखील मोर्चे काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

प्रकरणातील नवे अपडेट्स : दरम्यान बशीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास सुरू ठेवला आणि आता संबधित आरोपींच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी सामूहिक बलात्कार तसेच आय टी सेक्शन अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. पिडितेच्याआई वडिलांचा आरोप आहे की, आरोपी हे धनाढ्य कुटुंबातील आहे. त्यांच्याकडून आमच्यावर दबाब आणला जात आहे. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली पाहिजे. यानंतर पोलिसांनी या कुटुंबाला आता संरक्षण दिले आहे. सोमवारी कल्याण सत्र न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आठ आरोपींना आणखीन तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. तसेच कोळसेवाडी पोलिसांनी तपासाची गती ही आणखीन वेगाने वाढवली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Rape Case: Addition of new sections in gang rape case

Kalyan Crime : लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Kalyan Crime : सामूहिक लैंगिक अत्याचार, अत्याचाराचे चित्रीकरण आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या सर्व जाचाला कंटाळून कल्याण मध्ये एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी घडली होती मात्र दोन दिवसांच्या पोलीस तपासा नंतर आत्महत्ये मागील कारण आणि आरोपी पोलीसांच्या हाती लागले.

रविवारी आत्महत्ये पूर्वी तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट ठेवली होती. पोलीस तपासा दरम्यान तरुणीच्या मोबाईलमध्ये असलेली ही नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात तिने आत्महत्या करण्याचे नेमके कारण तसेच अत्याचार करणाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार महिला दिड वर्षांपासून तिचे आठ सहकारी तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करीत असत. याच अत्याचाराचे चित्रीकरण केले जात असे. आणि हाच शूट केलेला व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं होत. अश्या प्रकारची नाजूक बाब घरी सांगणे अवघड वाटत असल्याने, तसेच समाजात पसरले तर काय होईल? या भीती पोटी अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या तरुणीने अखेर आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.

कोळसेवाडी पोलिसांनी सध्या आठही आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका तरुणीचा देखील समावेश आहे. या आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली आहे. सध्या या आरोपींवर कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा देखील नोंद केला जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातून होऊ लागली आहे.

-संतोष दिवाडकर

Kalyan Crime: Suicide of a young woman after getting fed up with sexual harassment and blackmailing