KDMC Election 2026 : महायुतीतील इनकमिंगचा फुगा फुटलाच; इच्छूकांनी ठाकरे ब्रँडकडे वळवला मोर्चा

KDMC Election 2026 : महायुतीत महिन्याभरापासून सुरू असलेल्या इंकमिंगगचा फुगा फुटणार अशी शक्यता ‘एम एच मराठी’ने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. ही बाब खरी ठरली असून आता महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले असून ठाकरेंच्या पक्षांतून लढण्यासाठी आता इच्छूकांची घालमेल सुरू आहे. तर दुसरीकडे तिसरा पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श.प. व इतर लहान सहान पक्षांचा विचारही केला जात आहे.

मागील महिन्याभरापासूनच उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतून शिवसेना भाजप मध्ये प्रचंड इच्छूकांची गर्दी झाली. पॅनलचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांतही आपसात खेचखेची झाली. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक ओढण्याचे काम दोन्ही पक्षातून केले गेले. मात्र यातील काही माजी नगरसेवकांना पक्षात घेऊनही उमेदवारी देता न आल्याने पक्ष प्रवेश करून पायावर धोंडा पाडून घेतल्याचा अविर्भाव निर्माण होऊ लागला आहे. याउलट शिवसेना उबाठा व मनसेने शांत राहून संयमाने पाऊल टाकल्याचे दिसून आले आहे.

पक्ष सोडून गेलेले आता पुन्हा उमेदवारीसाठी मनसेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आम्ही आमची दारं त्यांच्यासाठी कायमची बंद केली असल्याचे मनसे नेते राजू पाटील म्हणाले. याउलट दुसरीकडे अनेक वर्षांनी मनसेत वापसी करणाऱ्या काही माजी नगरसेवकांचे मात्र जोरदार स्वागत झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार? हे समजण्यासाठी अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे. अर्ज छाननी व माघारी अर्ज गेल्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक चिन्हांसह प्रसिद्ध केली जाणार आहे.

KDMC Election 2026 : The bubble of incoming in the Mahayuti has burst
“किती भ्रष्टाचार करायचा काय लिमिट? कमी पडले असेल तर घ्या” – मनसेच्या राजू पाटलांनी खिशातून काढल्या नोटा

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले.

अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे काही वेळेस शाळा प्रशासनाला देखील सुट्टी देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली. “किती पैसा खायचा? किती भ्रष्टाचार करायचा? याला काही लिमिट आहे. म्हणून मी नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडत असतील तर घ्या” अशी खरमारीत टीका राजू पाटील यांनी सत्ताधार्यांवर केली.

MNS, Shiv Sena ubt unite against incomplete work of Palava bridge

लोकसभेत राजू पाटील यांनी केला शिवसेनेचा जोरदार प्रचार; विधानसभेत शिवसेनेने उभा केला पाटलांविरोधात उमेदवार

राजू पाटील : मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्याच राजू पाटलांविरोधात शिवसेनेने अमित ठाकरेंपाठोपाठ आता राजू पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे यांना राजू पाटलांच्या मदतीने भरघोस मतदान झाले होते. मात्र आता मनसे युतीचा भाग नसल्याने शिवसेनेने त्यांच्या उमेदवारा विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मसनेचे आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभेतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा पक्षाचे सुभाष भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना देखील उमेदवारी दिली आहे.

कल्याण ग्रामीणचे शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर हे २०१४-२०१९ या काळात याच मतदारसंघात आमदार होते. मात्र २०१९ साली त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर भोईर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. शिवसेनेने उमेदवार दिल्यामुळे मनसेत मात्र काहीसा संताप व्यक्त केला जात आहे.

Raju Patil campaigned strongly for Shiv Sena in the Lok Sabha

शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नाही; त्यांनी महापौर बसवण्याची स्वप्न पाहू नये; Raju Patil यांचा टोला आणि त्याला भाजप आमदारांचे समर्थन

Raju Patil : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आपला महापौर बसवण्याची तयारी करीत आहे याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नसून त्यांनी महापौर बनवायच्या वलग्ना करूच नये अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर यावर कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ही बाब बरोबर असल्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण आणि सर्व राजकीय समीकरणे पूर्णपणे फिरली आहेत. आता नेमके मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे निवडणूकीच्या निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यात जरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी कल्याण डोंबिवलीत मात्र या दोन्ही बाजूंमध्ये तू तू मे मे अशीच परिस्थिती पहायला मिळते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत जिंकून आपल्या पक्षाचा महापौर व्हावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. मात्र शहरात भाजपा, शिवसेना, उबाठा गट आणि मनसे या चार पक्षांमध्ये जबरदस्त चढाओढ पहायला मिळणार आहे. या महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा महापौर बसला नसून आता भाजप देखील शिंदे गटा समोर चालत नसून त्यांनी महापौर पदाची वलग्ना करू नये असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला देत त्यांना डिवचले आहे.

राजू पाटील यांच्या या वक्तव्यावर कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. राजू पाटील यांच्या मताशी मी सहमत असून शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजपचे खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

संतोष दिवाडकर

Raju Patil & Ganpat Gaikwad criticized Shinde

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party

मनसेच्या चिकणीपाडा जनसंपर्क कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा संपन्न

कल्याण :- कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा आज पार पडला. मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या विध्यमाने शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे. आज कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयाचा नुतनीकरण सोहळा पार पडला. तसेच मनसेचे आमदार राजु पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयात मनसे तसेच आई सामाजिक संस्थेच्या संयुक्त विध्यमाने अल्पदरात शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंतच्या वेळेत हे शिबिर २९ सप्टेंबर पर्यंत सुरू असणार आहे.

यात पेनकार्ड, आधारकार्ड, मतदार कार्ड, हेल्थ कार्ड असे अनेक शासकीय कार्ड निगडित कामे करून देण्यात येत आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मनसे उपविभाग अध्यक्ष जितेंद्र वाघचौरे यांनी नागरिकांना केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जितेंद्र वाघचौरे तसेच सुवर्णा वाघचौरे प्रभागातील अनेक समस्या सोडवत जन सामान्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात असल्याचे आई सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा वाघचौरे यांनी सांगितले.

या दरम्यान जिल्हा सचिव संदीप नावगे, विधानसभा अध्यक्ष अनंत गायकवाड, डॉ. सुनील पांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे माजी अध्यक्ष अशोक भोसले, योगिता गायकवाड, सुधा शाहा यांनी उपस्थीती दर्शविली होती. या उपक्रमाचे आयोजन योगेश गव्हाणे मनसे उप शहर अध्यक्ष, जितेंद्र वाघचौरे मनसे उपविभाग अध्यक्ष, सुवर्णा जितेंद्र वाघचौरे आई सामाजिक अध्यक्षा, सहकारि सतिश (आप्पा) साळवी, सागर कोळगे, विशाल वाघचौरे, अमित मोरे, सीमा अहिरे, प्रार्थना वाघचौरे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

संतोष दिवाडकर

https://youtu.be/_A6gsv3k6cY
Raju Patil : शिवसेनेने स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा मनसे आमदाराचा आरोप

कल्याण :- मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे मनपाने आज जाहीर केले आहेत. मात्र या प्रभाग रचनेवर राजकीय नेत्यांसह काही सर्वसामान्य नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

कल्याण डोंबिवली मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली मधील काही नागरिकांनी नकाशे प्रभाग रचना पाहून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केल्या असल्याचा आरोप केला आहे. मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांनी या प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप घेतला असून शिवसेनेने फायदा होईल अशीच रचना करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. “जिसकी लाठी उसकी भैस” या पंक्ती प्रमाणे शिवसेना सत्तेचा फायदा घेत आहे आणि आपल्या सोइ नुसार प्रभाग पाडले जात असल्याचा घणाघाती आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कोरोनामुळे KDMC निवडणूक बरीच लांबणीवर पडल्याने महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुकेचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने आरोप केल्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवल्या जातात की नाही हे देखील पहावे लागणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र आता युतीतून वेगळे झाल्यानंतर भाजपची काय भूमिका असेल हे देखील पहावे लागणार आहे.

-रोशन उबाळे

Raju Patil: MNS MLA alleges that Shiv Sena has formed wards according to its own convenience

KDMC च्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल; मनसे आमदार राजू पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

कल्याण : बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सत्ताधारी पक्षाला याबाबत सवाल केले आहेत.

क.डों.म.पा. (KDMC) चे माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन आणि गोविंद बोडके यांच्यासह चंद्रप्रकाश सिंह, रवि राव, मारुती राठोड ADTP, सुरेंद्र टेंगले, ज्ञानेश्वर आडके, सुखदेव जाधव, रघुवीर शेळके, संजय भोळे, भागवत, सुहास गुप्ते, हरकचंद जैन, अनिल आर. निरगुडे आणि स्वत: विकासक यांच्यासह इतरत्र बदली झालेल्या माजी महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.

माजी अपक्ष नगरसेवक अरुण पी गीध यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कल्याण न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश अ‍ॅड. अक्षय कपाडिया आणि न्याय दंडाधिकारी सोनाली शशिकांत राऊळ यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी आदेश दिला. नागरी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर नियोजकानी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच निर्धारित नियमांचे पालन न करून मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली आहे असे या तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

एफएसआय देण्याबाबत मालमत्ता विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आली आणि त्यानंतर अनेक अनियमित नियमाना पाठीशी घातले आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे हे सर्वजण पूर्णपणे उल्लंघन करत होते. तसेच नागरी अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट होत्या. तक्रारदाराने स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एसएचओने सांगितले की, कथित आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८, १२० बी, आर डब्ल्यू , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण भाग जानेवारी २००४ च्या दरम्यान घडला असून पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. भूखंडावर २३ मजली स्काय स्क्रॅपर आले आहे आणि विकासकाने गॅरेजचे दुकानात रूपांतर केले आहे.

“माजी आयुक्तांच्या पाठीवर कुणाचा हात ?” – राजू पाटील

जोरदार चर्चेत असलेल्या आणि चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आता समाज माध्यमांद्वारे सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनो यावर काय बोलाल ? कोटींचा घाटा त्यात वाघाचा घाटा ? या आयुक्तांमागे कुणाचा हात ? यांचा कोण नाथ असेल ? असे प्रश्न त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत. या पोस्ट नंतर शहरातील पालिका वर्तुळात हा विषय आता आणखीनच चर्चेत आलेला आहे.

-रोशन उबाळे, संतोष दिवाडकर

Charges filed against former KDMC commissioner; MNS MLA Raju Patil’s question to the ruling party

‘अहो नगरसेवक कोणे ?’ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्या समोर राजू पाटील यांनी व्यक्त केला मनसे नगरसेविकेचा अभिमान

उल्हासनदी बचाव मोहिमेला सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट दिली होती. या दरम्यान त्यांनी नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर यांच्याशी उल्हासनदी प्रश्नावर चर्चा केली. शिवाय मनसे पक्षाचा जाहीर पाठिंबा देखील दर्शवला.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या समवेत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. याच वेळी जवळच्याच भागातील मोहने कोळीवाडाच्या मनसे नगरसेविका सुनंदा कोट देखील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी राजू पाटील यांना राहुल कोट यांनी प्रभागात येण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत “तुमच्या प्रभागात छान आहेत रस्ते” असे म्हणत राजू पाटील यांनी मनसेच्या नगरसेविका सुनंदा कोट यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कामाची पोचपावती दिली. याचवेळी आंदोलनकर्ते तसेच शिवसेना पदाधिकारी कैलास शिंदे यांनी देखील त्यांचा प्रभाग स्वच्छ असल्याचे सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी लगोलगच “अहो नगरसेवक कोणे?” असा असा प्रश्न शिंदे यांना करीत मनसे नगरसेविकेचे कौतुक केले.

सुनंदा कोट या क.डो.म.पा. तील १० नगरसेवकांपैकी १ आहेत. त्यांचे पुत्र राहुल कोट हे देखील मनसेचे पदाधिकारी आहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी प्रभागात विविध विकासकामे केली होती तसेच कोरोना काळातही त्यांनी लोकांना मदतीचा हात पुढे केला होता. याचीच पोच पावती म्हणून मनसेच्या आमदारांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला असल्याचे मनसेचे पदाधिकारी सांगतात.

व्हिडीओ पहा

‘…अन्यथा कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात’ – मनसे आमदार राजू पाटील

उल्हास नदी बचाव मोहिमेसाठी मनसेचे माजी नगरसेवक नदी पात्रात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली आहे. या नदीमुळे लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

क.डो.म.पा. क्षेत्रातील लाखो लोकांची तहान उल्हासनदी भागवत आहे. मोहने पंप हाऊस येथून या नदीतील पाणी उचलले जाते. आणि शुद्धीकरण करून नागरिकांना पाठवले जाते. मात्र हे पाणी उचलण्यापुर्वीच या नदीत सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडले गेले आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण नदी विषारी जलपर्णीने व्यापून गेली आहे. ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेते आणि दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. या नदी साठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. ठोस उपाययोजना राबवली जावी याकरिता नितीन निकम आणि काही समाजसेवक धरणे आंदोलनाला बसले आहे. त्यांच्या या आंदोलनाला सर्वपक्षीय लोकांनी भेटी दिल्या तर अनेक संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला.

उल्हास नदी साठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील भेट दिली. उल्हासनदी साठी आश्वासन दिलं जातात परंतु होत काहीच नाही. या नदीसाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुटणारा नाही. पर्यावरण, जलसंधारण आणि प्रदूषण या तिन्ही विभागांनी मिळून ठोस उपाययोजना राबवायला हवी. अन्यथा लाखो लोकांचे आरोग्य धोक्यातच जाणार असे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नितीन निकम आणि काही समाजसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी मनसे कडून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे