MNS Kalyan East : कल्याण पूर्व मतदारसंघात मनसे कडून उमेदवार दिला जात नाही अशी गरळ नेहमीच ऐकावयास मिळते. याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच नाराजी देखील असते. त्याचबरोबर या भागातील मतदार देखील राज ठाकरेंच्या भूमिकेवर अंतर्गत नाराजी व्यक्त करतात. कल्याण पूर्वेच्या जागेसाठी मनसेचे काही बडे नेतेच समझोता करतात अशाही चर्चा आजवर ऐकायला आल्या आहेत.
२००९ साला पासून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाड हे आमदार आहेत. राज ठाकरेंची प्रचंड ताकद आणि हवा असतानाही त्यांनी २००९ साली कल्याण पूर्वेत मनसेचा उमेदवार का दिला नाही हा प्रश्न आजही अनेकांच्या मनाला लागून आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेला भरघोस मतदान होत असतानाही मनसेने तेव्हा जागा का लढवली नाही असा सवाल आजही उपस्थित केला जातो.
२०१४ साली मनसेकडून मोरेश्वर भोईर हे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत होते. मात्र अचानकपणे हे तिकीट मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांना देण्यात आले. याचा सर्वाधिक फायदा अनपेक्षितपणे अपक्ष व स्थानिक उमेदवार गणपत गायकवाड यांना झाला. मतदारसंघात त्यावेळी अधिक नावलौकिक नसलेल्या नितीन निकम यांना सात हजारहून अधिक मतदान झाले होते. मोरेश्वर भोईर यांना उमेदवारी मिळाली असती तर कदाचित या मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते अशीही चर्चा होती. यानंतर भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकला.
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा कल्याण पूर्वेत उमेदवार न देण्याचे ठरवले. यामुळे मनसेला मतदान करणाऱ्या मतदारांना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष सोडून वेगळा उमेदवार अथवा इतर पर्यायाचा विचार करावा लागला होता. आता २०२४ च्या निवडणुकीतही मनसे पक्षातर्फे उमेदवार अजूनही दिला जात नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. कल्याण पूर्वेत मनसे प्रत्येक निवडणुकीत का कमीपणा घेते? असा सवाल आता पुन्हा पडला असून याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का? असाही प्रश्न काही राजकीय जाणकार करीत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यात मतदार दिला जातो मग मनसेची ताकद बऱ्यापैकी असलेल्या राजू पाटलांच्या शेजारील मतदारसंघात उमेदवार का दिला जात नाही? किंवा राजू पाटील कल्याण पूर्वेसाठी मनसेचा सक्षम पर्याय का शोधत नाही? असा सवालही या ठिकाणी उपस्थित केला जातो. तर दुसऱ्या बाजूला कुंपणच खातंय शेताला आणि बुजगावणेही फितूर अशी म्हण देखील या मतदारसंघासाठी बोलण्यात येते.
-संतोष दिवाडकर
Why is Raj Thackeray neglected Kalyan East?