होम

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांना मिळणार गती ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशीर्षअंतर्गत (२२१७-०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. सदर कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करत विविध विकासकामे मंजूर करून घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते आणि पाणीसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. परंतु, कोरोना सारख्या महामारीच्या संकटात महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता प्रभागातील कामे करण्याकरिता लोकप्रतिनिधी यांचा नगरसेवक निधीचा अभाव पडत असल्यामुळे या शहरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून व्हावीत, यासाठी खासदार डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते.

खा. डॉ. शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कल्याण डोंबिवलीसाठी १५.५५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकासकामे थांबू नये यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शासन दरबारी रु. १५.६५ कोटीचीमागणी केली होती. क.डों. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या निधीतून मुलभूत सुविधा मिळण्यास मदत होईल.

येणाऱ्या काळातही विविध योजनाअंतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणण्यात येईल, त्यासाठी शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी सुद्धा लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरु केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करून ती कामे पूर्णत्वास येतील असा विश्वास हि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *