महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांनी चिंचपाडा गावाजवळील शंभर फुटी रोड लगत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप केले. या वेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले त्याचप्रमाणे बुद्ध वंदना करण्यात आली.
गेली २५ वर्षे झोपड्यांमध्ये राहणारे याच देशातील नागरिक, दीनदुबळे, आजही घरा पासून ते पिण्याच्या पाण्या पर्यंत आजही वंचित आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या मेहनती कष्टकरी जनतेला, कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊनचा खूप मोठा फटका बसला आहे. तरी या दीनदुबळ्या जनतेचे बाबासाहेबांवरील प्रेम अजूनही कमी झालेलं नाही. केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवल्या गेल्या तरी या भारत देशात रस्त्यालगत आपला अशियाना तयार करून राहणाऱ्या अनेक जणांच्या डोक्यावर आजही हक्काचं छप्पर नाही. रस्त्यालगत राहून आपली उपजीविका सांभाळणाऱ्या या भारत देशातील नागरिकांना २०२४ पर्यंत डोक्यावर छप्पर मिळेल असे केंद्रशासनाने सांगितलं असलं तरी आज दिसणारी ही अवस्था फारच बिकट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळे, पीडितांसाठी आपलं आयुष्य वेचलं. मात्र अजूनही या देशातील अनेक दीनदुबळे निराधार आहेत असं दिसून येतंय. रस्ता रुंदीकरणामध्ये यांच्या झोपड्या नेस्तनाबूत झाल्यानंतर, येथील नागरिकांचा मानवी हक्क अजूनही त्यांना मिळालेला नाही असे दिसतेय. म्हणून त्यांनी आपल्या व्यथा या दिवशी प्रसार माध्यमांसमोर मांडल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक स्तुत्य उपक्रम कल्याण पूर्वेतील शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमने यांनी राबवला होता. नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेविका शीतल मंढारी, आर पी आय चे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झोपड्यात राहणाऱ्या नागरिकांना अन्नदान, भाजीपाल्याचे वाटप करून, दीनदुबळ्यांना आधार देण्यात आला. या देशात अजूनही अनेक नागरिक आपल्या मानवी हक्कापासून वंचित असून त्यांना त्यांचे हक्क कधी मिळतील ? या प्रतीक्षेत ते असताना या नागरिकांची व्यथा आपण नक्कीच शासन, प्रशासना समोर पत्राद्वारे मांडू असं नगरसेवक महेश गायकवाड यांनी यावेळी सांगितले.