Kalyan Dombivli Double Decker Metro Pattern; खाली रस्ता, मध्ये उड्डाणपूल आणि वर मेट्रो
Kalyan Metro : कल्याण-डोंबिवली शहरांतील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी एमएमआरडीएने आता कंबर कसली आहे. शहरातील सर्व नियोजित मेट्रो मार्गिका आता ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वात खालच्या स्तरावर रस्ता, मधल्या स्तरावर फ्लायओव्हर आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम प्राप्त होणार आहे.
मुंबईत पार पडलेल्या एमएमआरडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, लवकरच याचा अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये कल्याण आणि आसपासच्या परिसरातील प्रमुख मेट्रो आणि रस्ते मार्गांचा समावेश आहे.
मेट्रो १२ (कल्याण-तळोजा), मेट्रो १४ (कांजूरमार्ग-बदलापूर), मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो ५-अ (कल्याण-उल्हासनगर-चिखलोली). शिळफाटा-रांजणोली उन्नत मार्ग आणि वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग. आदींचा यात समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गिकांचे आणखी उप-टप्प्यांत विस्तारीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. यात मेट्रो ५-ब चिखलोली ते बदलापूर, मेट्रो ५-क दुर्गाडी ते टिटवाळा, मेट्रो १२-ब शिळफाटा ते कळवा-मुंब्रा मार्गे ठाणे आदींचा समावेश आहे.
अंबरनाथ-उल्हासनगरला मोठा दिलासा :
मेट्रो ५-अ ही मार्गिका दुर्गाडी नाक्यावरून कल्याण शहरामार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर रस्त्याने थेट चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे अत्यंत सुलभ आणि जलद होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या ‘डबल डेकर’ पॅटर्नमुळे जागेची बचत होईलच, पण एकाच वेळी रस्ते आणि मेट्रो वाहतूक सक्षम झाल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.
Kalyan Dombivli Double Decker Metro Pattern

