Mahesh Gaikwad : वाढदिवसाचा झगमगाट बाजूला सारत… जेव्हा कल्याणचा ‘हा’ नेता थेट बळीराजाच्या बांधावर पोहोचतो!

Mahesh Gaikwad : राजकीय पटलावर आजवर अनेक चेहरे पाहिले, सत्ता आणि पदासाठी चाललेली चढाओढही अनुभवली. परंतु, राजकारणात ज्यांना आदर्श मानतो त्या राजसाहेब ठाकरेंनंतर जर कोणत्या नेत्याने मनावर छाप सोडली असेल, तर ते म्हणजे कल्याणचे महेश दादा गायकवाड!

सढळ हाताने गरजूंना मदत करणे हा ज्यांचा स्थायीभाव आहे, अशा महेश दादांच्या आयुष्यात अनेकदा संकटांनी आव्हानांचे डोंगर उभे केले. मृत्यूला हुलकावणी देत जो माणूस पुन्हा नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी उभा ठाकतो, त्यामागे जनमानसाचा आशीर्वाद आणि नवनाथांची असीम कृपादृष्टी आहे, हे नाकारता येत नाही. आज त्यांचा वाढदिवस, आणि निमित्त आहे कोल्हापूर दौऱ्याचे.

आज ही व्यक्ती आपला जन्मदिवस कुठल्याही पंचतारांकित हॉटेलात किंवा शक्तिप्रदर्शन करणाऱ्या भव्य सोहळ्यात साजरी करत नाहीये, तर करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आणि थेट कष्टकरी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा दिवस साजरा करत आहे. माझ्या दृष्टीने हा राजकीय स्टंट नसून एका संवेदनशील माणसाचा प्रामाणिक पवित्रा आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे, दुष्काळाचे सावट आणि निसर्गाचा लहरीपणा बळीराजाला उद्ध्वस्त करत आहे. जेव्हा हे विदारक चित्र महेश दादांच्या मोबाईल स्क्रीनवर झळकत होते, तेव्हा तो आक्रोश कुठेतरी त्यांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करत होता. शरीर शहरात असले, तरी त्यांचे मन मात्र केव्हाच बळीराजाच्या बांधावर जाऊन पोहोचले होते. इथेच एका सर्वसामान्य राजकारणी आणि खऱ्या जननेत्यामधील फरक प्रकर्षाने जाणवतो.

मुळात महेश दादा हे या राज्याचे कुणी मंत्री नाहीत, की कोल्हापुरात त्यांचे कोणते मोठे राजकीय हितसंबंध असतील. ते फक्त एका प्रभागाचे नगरसेवक आहेत. तरीही माणुसकीचे कर्तव्य म्हणून आपला सहकाऱ्यांचा ताफा सोबत घेऊन कोसो दूर कोल्हापुरात धाव घेतलेला हा नेता आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच ते आपला ताफा घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी महालक्ष्मी देवीच्या दरबारात हजेरी लावून त्यांनी दिवसाची सुरुवात केली. “या बळीराजावर आलेले दुष्काळी संकट दूर कर, आणि तुझी कृपादृष्टी साऱ्यांच्या पाठीशी असू दे,” हे प्रामाणिक गाऱ्हाणे घालत त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या मदतकार्याला सुरुवात केली.

शेतकऱ्यांच्या व्यथा, नुकसान आणि त्यांचे अश्रू जेव्हा या नेत्याने जवळून अनुभवले, तेव्हा त्यांच्याही मनात हा प्रश्न निश्चितच आला असणार— “हे सगळं जर माझ्या हातात असतं तर…?” आणि या प्रश्नाचे उत्तर अगदी सरळ आहे. जर सर्वकाही त्यांच्या हातात असते, तर महेश दादांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना अथांग दिलासा दिला असता. जो माणूस स्वतःच्या घासातला घास काढून दुसऱ्याच्या मुखात भरवतो, त्याची ही तळमळ कॅमेऱ्याच्या लेन्सपलीकडची असते.

वाढदिवस केक कापून साजरा करण्यापेक्षा तो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू परत मिळवण्यासाठी झटून साजरा करणे, आणि त्या बदल्यात मिळणारे निखळ जनआशीर्वाद… हीच खऱ्या अर्थाने महेश दादांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची खरी पोचपावती आहे. महेश दादा गायकवाड यांना माझ्या संपूर्ण एमएच मराठी परिवाराच्या वतीने वाढदिवसाचा सस्नेह आणि हार्दिक शुभेच्छा!!!

  • संतोष दिवाडकर 8767948054
    (संपादक, एम एच मराठी)
    (प्रतिनिधी, सकाळ)
    (प्रतिनिधी, पॉलिटिकल महाराष्ट्र)