KDMC Election 2026 : महायुतीतील इनकमिंगचा फुगा फुटलाच; इच्छूकांनी ठाकरे ब्रँडकडे वळवला मोर्चा

KDMC Election 2026 : महायुतीत महिन्याभरापासून सुरू असलेल्या इंकमिंगगचा फुगा फुटणार अशी शक्यता ‘एम एच मराठी’ने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. ही बाब खरी ठरली असून आता महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले असून ठाकरेंच्या पक्षांतून लढण्यासाठी आता इच्छूकांची घालमेल सुरू आहे. तर दुसरीकडे तिसरा पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श.प. व इतर लहान सहान पक्षांचा विचारही केला जात आहे.

मागील महिन्याभरापासूनच उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतून शिवसेना भाजप मध्ये प्रचंड इच्छूकांची गर्दी झाली. पॅनलचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांतही आपसात खेचखेची झाली. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक ओढण्याचे काम दोन्ही पक्षातून केले गेले. मात्र यातील काही माजी नगरसेवकांना पक्षात घेऊनही उमेदवारी देता न आल्याने पक्ष प्रवेश करून पायावर धोंडा पाडून घेतल्याचा अविर्भाव निर्माण होऊ लागला आहे. याउलट शिवसेना उबाठा व मनसेने शांत राहून संयमाने पाऊल टाकल्याचे दिसून आले आहे.

पक्ष सोडून गेलेले आता पुन्हा उमेदवारीसाठी मनसेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आम्ही आमची दारं त्यांच्यासाठी कायमची बंद केली असल्याचे मनसे नेते राजू पाटील म्हणाले. याउलट दुसरीकडे अनेक वर्षांनी मनसेत वापसी करणाऱ्या काही माजी नगरसेवकांचे मात्र जोरदार स्वागत झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार? हे समजण्यासाठी अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे. अर्ज छाननी व माघारी अर्ज गेल्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक चिन्हांसह प्रसिद्ध केली जाणार आहे.

KDMC Election 2026 : The bubble of incoming in the Mahayuti has burst
Thackrey in KDMC : कल्याण डोंबिवलीत ‘ठाकरे’ ब्रँड ठरू शकतो पॉवरफुल

Thackrey in KDMC : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष भरती प्रक्रियेत मग्न आहेत. काँग्रेससह दोन्ही ठाकरेंचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्याचे काम दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याने शहरात दोनच पक्षांची चलती असल्याचे दिसून येत आहे. परंतु राजकारणात आजमितीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याअनुषंगाने आतापर्यंत शांत असलेल्या ठाकरेंचे पक्ष आता ‘वेट अँड वोच’च्या भूमिकेतून बाहेर पडले आहेत. मनसे शिवसेना उबाठा नेमकी काय रणनिती करीत आहे याचा अंदाजही ते इतर पक्षांना लागून देत नसून बुधवारी त्यांनी युतीची घोषणा केली आहे.

इनकमिंगचा फुगा फुटणार? : मागील काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक शिवसेनेसह भाजपात गेलेले आहेत. शिवसेना उबाठाचेही माजी आमदार व आमदारकी लढवलेले काही मोठे चेहरे पक्षाला सोडून गेले आहेत. मात्र ज्या पक्षात इच्छूकांचे प्रचंड ट्रॅफिक जमले आहे, त्याच पक्षात आधीपासून असणाऱ्या पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाला धरताना, दुसरे निसटून जाण्याची भीती आता दोन्ही पक्षांना लागून आहे. तर हेच निसटलेले नाराज निष्ठावंत ठाकरेंच्या ताफ्यात आता सामावू शकतात.

आतापर्यंत ओढाओढी करून शिवसेना भाजपने शक्तिप्रदर्शन करून आपणच वजनात आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र इनकमिंग इतकी झाली की महायुतीच्या घोषणे नंतर नाराज मंडळी आउटगोइंगही सुरू करू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आतापर्यंत शांत असलेले ठाकरेंचं वादळ कधी घोंगावून चित्र पालटवेल हे सांगू शकत नाही. आतापर्यंत या महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरीही शिवसेनेच्या विभाजनानंतर आता भाजप मोठा भाऊ बनून महापौर पदाचा दावा करीत आहे. अंबरनाथ, बदलापुरात तसे साध्यही केले आहे.

आतापर्यंत पक्षीय बलाबल : २०१५ च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी ९४ जागा या शिवसेना भाजपने जिंकल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ५२ नगरसेवक शिवसेनेचे होते. तर मनसेचेही दहा नगरसेवक विरोधी बाकावर बसले होते. आता शिवसेनेच्या विभाजनासह मनसेच्या काही माजी नगरसेवकांनीही पक्षांतर केल्याने ठाकरेंना नवे चेहरे द्यावे लागणार आहेत. याच नव्या चेहऱ्यात मनसेचे २०१० साली निवडणूक लढवलेले काही माजी नगरसेवक पुन्हा मनसेतून निवडणूक लढवणार आहेत.

ठाकरेंचं वादळ घोंघावणार ? : राजकीय पटलावर ठाकरे बंधू मागील काही दिवस शांत होते. मात्र ही शांतता वादळापूर्वीची शांतता असल्याचे ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काय फरक पडू शकतो? यापेक्षा त्यांनी कोणती व्यूहरचना केली आहे? आणि कल्याण डोंबिवलीत नेमकी काय चाल चालणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ६२ ही मॅजिक फिगर असून ठाकरे बंधूना मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वप्रथम महायुतीलाच ६० च्या आत थोपवण्याचे आवाहन असणार आहे.

Thackrey in KDMC : ‘Thackrey’ brand can be powerful in Kalyan Dombivali

जनतेचे नाव पुढे करीत राजकारण्यांचे पक्षप्रवेश; पॅनलच्या जमवाजमवीसाठी पक्षनिष्ठा खुंटीला

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीला अवघा चार आठवड्यांचा अवधी राहिला असून त्यापूर्वी पक्षप्रवेश सोहळे शहरात पार पडत आहेत. पॅनलमध्ये निवडून येण्यासाठी जो तो आपला विचार करीत असून इच्छूकांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना भाजप मध्ये प्रवेश घेण्याची धडपड सुरू ठेवली आहे. मात्र हे पक्षप्रवेश करताना, “आम्ही जनतेच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश करतोय” असा केविलवाणा निर्वाळा करीत स्वतःचे राजकीय स्वार्थ साधले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यंदा पॅनल पद्धत असल्याने सरसकट चार उमेदवारांना एकत्र लढत द्यावी लागणार आहे. त्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसेसह अन्य घटकपक्ष आपले नशीब अजमावणार आहे. मात्र या पद्धतीत लहान पक्ष व अपक्ष लढणाऱ्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. याच बाबीचा फायदा मोठ्या पक्षांना होणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस पक्षांतील माजी नगरसेवक आपापल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन जनतेच्या विकासाचे नाव पुढे करीत स्वतःचे राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी दलबदलू राजकारण करण्यास कोणताही कमीपणा ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत सुगीचे दिवस असणाऱ्या पक्षांसोबत जाऊन पुन्हा नगरसेवक बनायचे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून पक्ष बदलले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपात झालेली प्रचंड ट्रॅफिक पाहता निवडणूक महायुतीत लढावी की स्वतंत्र लढावी असाही मोठा प्रश्न शिवसेना भाजपला पडलेला आहे. दोन्ही पक्षांत प्रचंड गर्दी झाल्याने उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा नाराजीनाट्ये रंगणार आहेत. त्यामुळे ऐनवेळेस स्वतंत्र लढण्याची नामुष्की ओढवू शकते. याउलट दोन्ही ठाकरे एकवटले असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना महायुतीपुढे टिकायचे असेल तर ठाकरेंचे एकत्र लढणेच शहाणपणाचे ठरेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

✍️ संतोष दिवाडकर 8767948054

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला ‘आयपीएल लिलावा’ प्रमाणे रंग; राजकारण्यांच्या बेडूक उड्यांनी पक्षनिष्ठेला सुरुंग

कल्याण : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झाला आहे. किंबहुना एकाच युती आघाडी मधील राजकीय पक्ष एकमेकांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. विशेषतः कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप मध्ये आपसातच ही पक्षप्रवेशाची रस्सीखेच सुरू असून एकमेकांचे दिगग्ज पदाधिकारी व माजी नगरसेवक आपल्या पक्षात खेचून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. नेत्यांच्या दलबदलू राजकारणामुळे सामान्य मतदार व कार्यकर्ते मात्र संभ्रमात अडकले आहेत.

महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच आयपीएल ट्रेड/लिलाव प्रमाणे शहरात राजकीय मंडळी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या घेत आहेत. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून, पक्षातील प्रमुख नेत्यांचे विचार पायदळी तुडवून केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे प्रवेश होत असल्याचे मत सर्वसामान्य मतदारच व्यक्त करू लागले आहेत. याउलट पक्षप्रवेश घेतल्यानंतर “पक्षाच्या, साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला” असे पक्षप्रवेश करणारे अजूनही रेटाळून म्हणतात. मात्र हे फक्त ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असल्याचे आता सुजाण मतदार म्हणू लागले आहेत. तर काही पक्षप्रवेशामागे पक्षातील नाराजी, अंतर्गत वाद, हेवेदावे आणि अंशतः स्वाभिमान ही देखील कारणे पुढे केली जात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी मोठं मोठी अमिषे आणि मोठ्या पदांची प्रलोभने दिली जातात. अशा परिस्थितीत पक्षनिष्ठेचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा फायदा पाहण्यामागे प्रथम प्राधान्य सध्याच्या काळात दिले जात आहे. ग्राउंड लेव्हलवर सुरू असलेल्या या राजकारणामुळे पाच वर्षांत पाच पक्षही फिरण्याचे विक्रम सहज शक्य होत आहेत. इतकेच नव्हे तर नेत्यांच्या सरड्याप्रमाणे सततच्या बदलणाऱ्या रंगांमुळे कार्यकर्त्यांनाही “कोणता झेंडा घेऊ हाती?” असे म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु असे असले तरी, “खिसा गरम तर कशाची शरम?” असे म्हणून सारे काही आलबेल बनले आहे. शेवटी ‘जिथे भेळ तिथेच खेळ’.

  • संतोष दिवाडकर (पत्रकार)

In the backdrop of elections, city politics takes on the color of an ‘IPL auction’

कल्याण पूर्वेत भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याने संघटनेला नवी ऊर्जा

कल्याण : आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकताच भारतीय जनता पक्षात भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विजय जोशी, शीतल मंडारी, केतन रोकडे, स्नेहल रोकडे, विकी जोशी, प्रल्हाद शेळके यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपाच्या संघटनेला कल्याण पूर्वेत नवी ऊर्जा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, जिल्हा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भा.ज.यू.मो. जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, रितेश खराटे, विक्रम तरे, हेमलता पावशे, इंदिरा तरे, मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, विजय उपाध्याय, अमित गायकवाड, मयुरेश तरे, प्रज्वल खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठा कोळशेवाडी मंडळ महिला मोर्चातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सर्व नवे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रहित, विकास आणि सुशासन या पक्षाच्या विचारधारेवर दृढ विश्वास ठेवून या सर्व मान्यवरांनी परिवर्तनाच्या प्रवासाची भक्कम सुरुवात केली आहे अशा भावना यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

BJP party entry ceremony in Kalyan East gives new energy to the organization

News : Mahesh Gaikwad भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम; शिंदेंनी राखली ५५ हजार मतांची ताकद

Mahesh Gaikwad News : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समवेत अन्य काही माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी सामील होणार आहेत. मात्र याच यादीत दुसरे महत्त्वाचे नाव महेश गायकवाड यांचे असल्याच्या चर्चांना दिवसभरात उधाण आले होते. मात्र म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वसंध्येस एकनाथ शिंदेंनी महेश गायकवाड यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा अधिकृतपणे धनुष्यबाणाची जबाबदारी सोपवून ५५ हजार मतांसह कल्याण पुर्वेची कमान राखली असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चा तूर्तास थांबल्या आहेत.

महेश गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्व मतदारसंघातुन भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून जवळपास दुसऱ्या क्रमांकाची ५५ हजारहून अधिक मते मिळवून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याच ५५ हजार मतांनी भाजपला भुरळ घातली असल्याचे राजकीय जाणकारांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान महेश गायकवाड यांना पक्ष विरोधी भूमिका घेतक्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर बराच काळ त्यांचा पुनःप्रवेशही झाला नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपचे आमंत्रण स्वीकारले जाऊ शकते अशीही चर्चा रंगली होती. मात्र दीपेश म्हात्रेंच्या प्रवेशा पूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्यावर कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना प्राप्त झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजपच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव काळात रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत भाजपा समोर लढलेले भक्कम प्रतिस्पर्धी दीपेश म्हात्रे तसेच महेश गायकवाड यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेतल्या पासूनच शहरात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र महेश गायकवाड यांनी असे काही नसल्याचे स्पष्टीकरण या अगोदरही माध्यमांना दिले होते. आता शिंदेंनी त्यांच्यावर पदभार सोपवल्याने उठलेले चर्चांचे वादळ शांत झाले असे म्हणायला हरकत नाही. परंतु सध्याच्या राजकारणात उलथापालथ सामान्य आहे, त्यामुळे कोणतेही पद कुणालाही बांधून ठेऊ शकत नाही हेही तितकेच खरे.

News : Mahesh Gaikwad BJP entry talks come to an end; Shinde retains strength of 55 thousand votes

Dombivli : Bhajan Bhavan चे लोकार्पण; भजन परंपरेला नवे व्यासपीठ

Bhajan Bhavan Dombivli : भजन ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असून, डोंबिवलीलाही या समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेला नवे व्यासपीठ मिळावे या हेतूने डोंबिवली पश्चिम येथील गणेश घाट परिसरात ‘डोंबिवलीकर भजन भवन’ उभारण्यात आले आहे. आमदार विकास निधीच्या माध्यमातून डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्थेच्या या नव्या वास्तूचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते आज मोठ्या उत्साहात लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून डोंबिवलीकरांशी स्नेहसंवाद साधला.

डोंबिवली पश्चिम येथील युवा गायक राजयोग धुरी यांच्या भजन क्षेत्रातील कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लोकरे, शहाबाजकर, प्रमोद धुरी, मुणगेकर, चिले, भाई राणे, सतीश राणे आदी हरीभक्त तसेच भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक राहुल दामले, जनार्दन म्हात्रे, नंदू म्हात्रे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राहुल म्हात्रे, नंदू जोशी, रेखा म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.

भजन परंपरेचा वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. ‘डोंबिवलीकर भजन भवन’ मुळे स्थानिक भजन गायक, कलाकार आणि रसिकांना एक समान मंच उपलब्ध होणार आहे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.

Dombivli : Inauguration of Bhajan Bhavan; A new platform for the Bhajan tradition

डोंबिवली : डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित रासरंग आजपासून सुरु

डोंबिवली रासरंग : डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन व श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर रासरंग २०२५ च्या भव्य उत्सवाला सुरुवात होणार आहे. सायं. ७.३० ते रात्री १० पर्यंत दांडिया आणि गरबा रास रंगणार असून या कार्यक्रमासाठी जगविख्यात दांडिया किंग नैतिक नागदा आणि त्यांचा वाद्यवृंद कलाकारांचा समूह उपस्थित राहणार असून, ते सलग १० दिवस रसिकांना ताल धरायला भाग पाडणार आहेत.

आज (ता.२१) सकाळी ११ वाजता घटस्थापनेसोबतच भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या पद्धतीने ढोलताशा व झांज पथकाच्या गजरात व २१०० विविधरंगी फुगे आसमंतात सोडून उत्सवाची सुरुवात होणार आहे. हा उत्सव दि.२२ सप्टेंबर ते दि.०१ ऑक्टोबर २०२५ या १० दिवस चालणार असून, २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. दररोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता देवीची आरती होणार आहे. त्यानंतर महिलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून महिलांना नवदुर्गा पुरस्कार देण्यात येणार असून सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, उद्योग व इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना या सोहळ्यात गौरविण्यात येईल.

रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्रीच्या उपस्थितीत महिलांसाठी भोंडल्याचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता कुमारीपूजन आणि कुंकुमार्चन आयोजित करण्यात आले आहे. या नवरात्रोत्सवात मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार, प्रख्यात गायक, सिने-नाट्य कलाकार, वाद्यवृंद तज्ज्ञ, कवी-साहित्यिक, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यातील विविध क्षेत्रातील खेळाडू, वारकरी संप्रदाय, ब्रह्माकुमारी, सनातन, गायत्री परिवाराचे सदस्य, स्थानिक नागरिक तसेच लाडक्या बहिणी मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, महाराष्ट्र शासनातील माननीय मंत्रीमंडळातील सदस्य, पोलीस व प्रशासनातील अधिकारी, आरोग्य यंत्रणेतील मान्यवर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. व्यापारी संघटना, रिक्षा युनियन, वैद्यकीय संघटना, ज्वेलर्स संघ यांचे प्रतिनिधी देखील देवीच्या आरतीसाठी हजेरी लावणार आहेत. कल्याण शहरातील हा १० दिवसीय नवरात्रोत्सव धार्मिकतेसोबतच सामाजिक व सांस्कृतिक जत्रेचे रूप धारण करणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Dombivli : Rasarang organized by Dr. Shrikant Shinde Foundation starts from today

कल्याणच्या कुस्तीगीर Vaishnavi Patil ची भारतीय संघात निवड

Vaishnavi Patil : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२३ मध्ये उपविजेत्या ठरलेल्या मांगरूळ गावच्या वैष्णवी पाटीलने ६५ किलो वजनी गटातील चाचणीत यश मिळवून पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. हरियाणाच्या मुस्कानचा ७-२ ने एकतर्फी पराभव करून वैष्णवीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. दि.१३ ते २१ सप्टेंबर दरम्यान झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धेत ती भारताकडून खेळताना दिसणार आहे.

झाग्रेब क्रोएशिया येथे होणारी ‘झाग्रेब ओपन’ ही एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असून भारतातील आणि जगातील पुरुष व महिला कुस्तीपटूंसाठी ती महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेत वैष्णवी सह भारताचे अनेक कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. वैष्णवी ही सध्या महाराष्ट्रातील एक आघाडीची महिला कुस्तीगीर असून ती सध्या हरियाणाच्या हिसार येथे प्रशिक्षक जसबीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

पाटील कुटुंबातील अनेक सदस्य कुस्ती क्षेत्रातील असल्याने तिला या खेळाचे वेड लागले. वैष्णवीने आधी मातीवर कुस्ती खेळायला सुरुवात केली होती. २०२० नंतर तिने मॅटवरची फ्रीस्टाईल कुस्तीचा सराव सुरु केला. तिच्या अथक मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे तिला राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळाले. राज्यस्तरीय व महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांत तिने अनेक पदके जिंकली आहेत.

हेलेन मारौलिस या अमेरिकन जागतिक विजेत्या कुस्तीपटूला ती आपला आदर्श मानते. भारताकरिता ऑलिंपिक पदक जिंकणे आणि जागतिक स्तरावर यश मिळवणे हे वैष्णवीचे ध्येय असून ती तिच्या मार्गावर अग्रेसर आहे. खेळातील सातत्य, मेहनत आणि चिकाटी हीच माझ्या यशाची सूत्रे असल्याचे वैष्णवी सांगते. तिच्या पुढील प्रवासासाठी कल्याणसह संपूर्ण महाराष्ट्र व भारतातून आता तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Kalyan wrestler Vaishnavi Patil selected in Indian team

Kalyan to pandharpur bus msrtc : आषाढी पंढरपूर वारीसाठी

Kalyan to pandharpur bus msrtc : कल्याण व आसपासच्या शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातुन आजपासून (दि.४) जवळपास १६ एसटी बसेस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील भाविकांना मिळणार आहे.

आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून हरी नामाचा जप करीत हजारो वारकरी भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. रविवारी दि.६ जुलै रोजी पंढरपूरात होणाऱ्या सोहळ्यासाठी भक्तगण रेल्वे, एसटी, खाजगी गाड्या अशा मिळेल त्या वाहनाने दाखल होतात. या भाविक भक्तांची विशेष सोय म्हणून एसटी महामंडळ दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून एसटी बसेसचे नियोजन करीत असते.

दोन्ही एसटी आगारांचे चार दिवसांचे नियोजन ठरलेले असून ठाणे विभागातून मिळालेल्या सूचनांनुसार त्याचे पालन केले जाणार आहे. कल्याण आगारातून ११ तर विठ्ठलवाडी एसटी आगारातुन एकूण ५ गाड्या मार्गस्थ होणार आहेत. मार्गस्थ होत असलेल्या या बसेसमध्ये नियमित, जादा व ग्रुप बुकिंग अशा प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या आणखीन ४ बसेस भिवंडी येथून तर कल्याण आगाराच्या ६ बसेस शहापूर येथून पंढरपूर वारी करणार आहेत. ठरलेल्या निर्धारित वेळेनुसार सर्व गाड्या मार्गस्थ होत असून ग्रुप बुकिंग असलेल्या बसेस मात्र प्रवाशांनी मागणी केलेल्या वेळेत सोडण्यात येतील. कल्याण आगाराच्या एसटी गाड्या तारकपूर मार्गे जाणार असून विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या गाड्या चांदणी चौक मार्गे जाणार आहेत.

कल्याण एसटी आगाराचे नियोजन

स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने कल्याण एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतरीत केला असला तरी कल्याणच्या जुन्या आगारा मागील बास्केटबॉल कोर्ट परिसरात तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे.

शुक्रवार – एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.

शनिवार- एकूण गाड्या – ७
नियमित – २
निर्धारित वेळ – स.६, स.७ व इतर ठराविक वेळात

रविवार- एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.

विठ्ठलवाडी एसटी आगाराचे नियोजन

दि.४ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

दि.५ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

दि.६ – एकूण गाड्या – १
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

असा असणार परतीचा प्रवास

मागील तीन ते चार दिवसांत भाविकांना घेऊन पंढरपूरात गेलेल्या सर्व एसटी गाड्या आषाढी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) पुन्हा कल्याणच्या दिशेने परतणार आहेत. पंढरपूरच्या चंद्रभागा स्थानकातून या सर्व गाड्या तेथील ठरलेल्या वेळेनुसार सुटतील. याकरिता कल्याण एसटी आगाराच्या ६ गाड्या आरक्षित झाल्या असून आणखीन ७ गाड्या प्रवाशांच्या गर्दीनुसार म्हणजेच प्रवासी घेऊन शक्य तशा वेळेत आगारात परतणार असल्याची माहिती कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली आहे. तर विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या ५ गाड्यांचे परतीचे आरक्षण झाले असल्याची माहिती विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगारातुन बारमाही पंढरपूर वारी

आषाढी एकादशी निमित्ताने जादा गाड्या सोडण्यात येत असल्या तरी विठ्ठलवाडी एसटी आगारातून दररोज पंढरपूर साठी एक एसटी नियमित रवाना होते. स.७ वाजता ही एसटी विठ्ठलवाडी येथून मार्गस्थ होत कल्याण, डोंबिवली स्थानकातून प्रवासी घेत चांदणी चौक मार्गे पुढे जात दुपारी ४ ते ५ दरम्यान पंढरपूर गाठते. तर हीच गाडी पुन्हा विठ्ठलवाडीसाठी पहाटे ५ वाजता परतीचा प्रवास सुरु करत दुपारी २ ते ३ दरम्यान परतते. विठ्ठलवाडी येथून सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या कलेढोण एसटीनेही फलटण पर्यंत प्रवास करीत पुढे वाहन बदलून पंढरपूरला पोहोचता येते.

Kalyan to pandharpur bus msrtc : Kalyan, Vitthalwadi ST depot ready for Ashadhi Pandharpur Wari