Kalyan Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. निवडणूक आयोगाने २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिला आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी कल्याण पूर्व महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत महायुतीत रस्सीखेच सुरू असताना भाजप वरिष्ठांनी आपली जागा कायम ठेवत उमेदवारी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. याकरिता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असलयाचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थिती दर्शविण्याची शक्यता यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मनसेने देखील विद्यमान आमदार राजू पाटील यांनाच पुन्हा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या हस्ते राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला. त्याचवेळी राजू पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी स्वतः येत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी कल्याण शहरात दोन दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार असल्याने दोन्ही राजकीय पक्षांत उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
Kalyan Election : Thackeray Fadnavis in Kalyan tomorrow to fill the applications of candidates