Kalyan Rape Case : तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात नव्या कलमांची वाढ

Kalyan Rape Case : मागील दीड वर्षापासून एका विद्यार्थीनिवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली होती. आपल्यावर होत असलेले अत्याचार ती विद्यार्थीनी बराच काळ सहन करीत होती. अखेर संयमाचा बांध फुटल्याने पिडीताने तिच्या राहत्या घराच्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि आय टी कलमे लावण्यात आली आहेत. कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात आठवड्याभरापूर्वी एका अल्पवयीन विद्यार्थीनीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करुन तपास सुरु केला. विद्यार्थीनीच्या मोबाईलमधील नोटपॅडवर तिने तिची व्यथा मांडली होती. बारावीत ७१ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी एफवायच्या वर्गात प्रवेश घेणार होती मात्र त्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. तिच्या मोबाईलमधील नोटपॅडमध्ये तिच्यासोबत लैगिंक अत्याचार करण्यात आल्याचे तिने नमूद केले होते. मागील दीड वर्षापासून हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे चक्र फिरविले आणि या प्रकरणी सात आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. विजय यादव, प्रमय तिवारी, सनी पांडे, शिवम पांडे, कृष्णा जायस्वाल, आनंद पांडे, निखिल मिश्रा या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर काजल जैयस्वाल या मुलीचा देखील या प्रकरणात समावेश असल्याने तिला देखील तत्काळ ताब्यात घेण्यात आले.

विद्यार्थीनीचे एका तरुणा सोबत प्रेमसंबंध होते. यातच तरुणासोबत फोटो व व्हिडिओ काढण्यात आले होते. त्यानंतर पीडितेला सातत्याने इतर तरुण ब्लॅकमेल करत होते. धक्कादायक बाब म्हणजे तिची मैत्रीण सुद्धा आरोपी तरुणासमवेत तिला ब्लॅकमेल करत होती. अशी धक्कादायक घटना घडल्याने कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली आहे. या घटनेची व्यापकता आणि घृणास्पद कृत्य यामुळे राजकीय आणि सामाजिक संघटनांनी देखील मोर्चे काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

प्रकरणातील नवे अपडेट्स : दरम्यान बशीर शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पुढील तपास सुरू ठेवला आणि आता संबधित आरोपींच्या कलमात वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी सामूहिक बलात्कार तसेच आय टी सेक्शन अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. पिडितेच्याआई वडिलांचा आरोप आहे की, आरोपी हे धनाढ्य कुटुंबातील आहे. त्यांच्याकडून आमच्यावर दबाब आणला जात आहे. पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली पाहिजे. यानंतर पोलिसांनी या कुटुंबाला आता संरक्षण दिले आहे. सोमवारी कल्याण सत्र न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आठ आरोपींना आणखीन तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. तसेच कोळसेवाडी पोलिसांनी तपासाची गती ही आणखीन वेगाने वाढवली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Rape Case: Addition of new sections in gang rape case

Kalyan Crime : लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Kalyan Crime : सामूहिक लैंगिक अत्याचार, अत्याचाराचे चित्रीकरण आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी या सर्व जाचाला कंटाळून कल्याण मध्ये एका तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी घडली होती मात्र दोन दिवसांच्या पोलीस तपासा नंतर आत्महत्ये मागील कारण आणि आरोपी पोलीसांच्या हाती लागले.

रविवारी आत्महत्ये पूर्वी तरुणीने आपल्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट ठेवली होती. पोलीस तपासा दरम्यान तरुणीच्या मोबाईलमध्ये असलेली ही नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात तिने आत्महत्या करण्याचे नेमके कारण तसेच अत्याचार करणाऱ्यांची नावे लिहून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार महिला दिड वर्षांपासून तिचे आठ सहकारी तिच्या सोबत लैंगिक अत्याचार करीत असत. याच अत्याचाराचे चित्रीकरण केले जात असे. आणि हाच शूट केलेला व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेलिंग केलं जातं होत. अश्या प्रकारची नाजूक बाब घरी सांगणे अवघड वाटत असल्याने, तसेच समाजात पसरले तर काय होईल? या भीती पोटी अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या तरुणीने अखेर आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.

कोळसेवाडी पोलिसांनी सध्या आठही आरोपींना ताब्यात घेतले असून यात एका तरुणीचा देखील समावेश आहे. या आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली आहे. सध्या या आरोपींवर कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा देखील नोंद केला जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कठोर कारवाई करण्याची मागणी समाजातून होऊ लागली आहे.

-संतोष दिवाडकर

Kalyan Crime: Suicide of a young woman after getting fed up with sexual harassment and blackmailing

अनधिकृत फलक लावणाऱ्यांना KDMC चं अभय? RTI मधून आली ‘ही’ माहिती समोर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या KDMC हद्दीत अनधिकृत फलक लागलेले नेहमीच दिसत असतात. प्रामुख्याने त्यात राजकीय नेत्यांच्या शुभेच्छांचे तर जाहिराती म्हणून लावलेले फलक असतात. अश्या लावलेल्या फलकांची कोणतीही परवानगी ही महानगरपालिकेकडून घेतली जात नाही. त्यामुळे अश्या अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येतं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी शहरात लागणाऱ्या अनधिकृत फलकांवर थेट गुन्हे नोंद करून फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश काढलेले असतांनाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजवर एकही अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर गुन्हा नोंद करून फौजदारी कार्यवाही केली नाही अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ता भूषण पवार यांनी केलेल्या अर्जातून उघड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांवर गुन्हे नोंद करावे असे आदेश दिले होते. तरीही शहराच्या हद्दीत अनधिकृत फलकांचा सुळसुळाट असतांना देखील आजवर महानगरपालिकेने एक ही गुन्हा नोंद न करून अनधिकृत फलकांना महानगरपालिकेचे अभय आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते भूषण पवार यांनी महानगरपालिकेकडे ११ एप्रिल रोजी महानगरपालिका हद्दीत आजवर अनधिकृत फलकांवर किती गुन्हे नोंद केले म्हणून माहिती मागविली होती. ३० दिवसांत संबंधित अर्जाचे उत्तर अपेक्षित असतांना देखील महानगरपालिकेने १० प्रभागा ऐवजी ५ प्रभागांची माहिती उपलब्ध करून इतर ५ प्रभागांची माहिती दिली नाही. याउलट महानगरपालिकेने अर्जदार भूषण पवार यांनाच महानगरपालिकेच्या दहा प्रभागात चौकशी करावी आणि माहिती घ्यावी अशी अजब उत्तरं देऊन स्वजबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

संबंधित अर्जा बद्दल माहिती अर्धवट दिली असल्याने महानगरपालिकेकडे प्रथम अपील करून उर्वरित माहिती घेणार आहोत. त्याच सोबत गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार ही राज्य माहिती अधिकार आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC ‘s protection against unauthorized billboards? information came from RTI

Titwala येथील शाळेचा RTE विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार? पालकांचा शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

Titwala : शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत मुलांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य शाळेने देणे बंधनकारक असतांना टिटवाळ्यातील रवींद्र विद्यालयाने मात्र आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार दिला असून शाळेकडून पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बुधवार पर्यंत शाळेने मुलांना शालेय साहित्य न दिल्यास शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे.

सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत टिटवाळा येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रवींद्र विद्यालय या शाळेत प्रवेश मिळवला आहे. तेव्हा पासून शाळेने कधीही शैक्षणिक साहित्य वाटप केलेले नाही. मात्र हया वर्षी सर्व पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्य वाटप कधी करणार हे विचारायला २८ एप्रिल रोजी गेले असता मुख्याध्यापकांनी असभ्यतेची भाषा वापरून पालकांवर दबाव टाकला. तसेच तुमची ऐपत नव्हती आपल्या मुलांना शिकवण्याची तर या शाळेत मुलांना का टाकले? तसेच तुमच्या मुलांना शिकवायचे आहे की नाही हे आमच्या हातात आहे. म्हणून यापुढे तुम्ही पालकांनी एकत्र एऊन अशी तक्रार करायची नाही. तुम्हाला शैक्षणिक साहित्य शाळेतूनच विकत घ्यावे लागेल. असे म्हणून आम्हाला शाळे बाहेर काढून दिले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

याबाबत सर्व पालकांनी टिटवाळा पोलिस स्टेशन येथे शाळेविरोधात तक्रार केली. त्या नंतर २ मे रोजी सर्व पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण विभाग कार्यालयात शाळेची लेखी तक्रार केली. यानंतर शाळेला १४ मे रोजी आरटीईचे एक लेखी पत्रक दिले गेले. आरटीईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश ४८ तासांच्या आत मोफत पुरविण्यात यावे असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. परंतु शाळेने शिक्षण विभागाचा आदेश न मानता शाळा आपल्या मनमर्जि प्रमाणे वागत असल्याचा आविर्भाव पालक व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे बुधवारपर्यंत आरटीई अंतर्गत पालकांना पाल्यासाठीचे मूलभूत अधिकार अंतर्गत येणारे शैक्षणिक साहित्य मिळाले नाही तर गुरुवारी शिक्षण विभाग कार्यालयात सर्व पालकांसोबत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

RTE of Titwala school refuses to provide educational materials to students? A warning of sit-in agitation at the parents’ education board office

Shahad News : ‘आधी प्रश्न सोडवा मग मते मागायला या’ – स्थानिक नगरसेवकाला मनसेची बॅनर लावून कानपिचकी

Shahad News : कल्याण पश्चिमेतील  शहाड परिसरातील आंबिका नाला हा अरुंद आहे. तसेच या भागात नाल्यावर बेकायदा बांधकामे झाली असल्याची ओरड आहे. ९ जून रोजी पहिल्या पावसाचा फटका शहाड परिसराला बसला. या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकार्याने एक बॅनर आंबिकानगर येथे लावला आहे. त्यावर आधी प्रश्न सोडवा. मग मते मागायला या असे लिहिले आहे. स्थानिक नगरसेवकाला कानपिचक्या देत  हा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

मनसेचे पदाधिकारी पंकजराजे पाचपिंडे यांनी हा बॅनर लावला आहे.९ जून रोजी नाल्याचे पाणी तुंबले व ते रस्त्यावर कसे साचले? त्यात वाहने कशा प्रकारे अडकली? याचे फोटोही बॅनरवर लावले आहेत. तासाभराच्या पावसाने ही  अशी स्थिती उद्धवते. आधी प्रश्न सोडवा। मगच मते मागायला या. प्रश्न सोडविला नाही तर मते मिळणार नाहीत असा इशारा राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींना दिला आहे. त्यामुळे या फलका मुळे  परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

-रोशन उबाळे

Shahad News: ‘First solve the problem, then come to ask for votes’ – MNS banner to local corporator

Dombivli Murder : रेल्वे मैदानावर  इसमाची हत्या; दांडक्याने प्रहार केल्याचे निष्पन्न

Dombivli Murder : शहराच्या पश्चिमतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अद्याप पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून त्या दिशेन तपास सुरु आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसली तरी पोलीस मृतदेहाची माहिती काढण्यासाठी चौकशी सूरु केली आहे.

बावनचाळ परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन इसमाला मारले असावे. परंतु त्याची हत्या करण्यामागे काय उद्देश असावा? कोणी हत्या केली असावी? याचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहे. दरम्यान बावनचाळीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक झाले आहे.

-रोशन उबाळे

Dombivli Murder: Murder of a man at a railway ground; Conclusion of being hit with a stick

कल्याणमधील आनंदवाडी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी होतेय मागणी

कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत, Kalyan police आनंदवाडी डबल टॉवर जवळ असलेली पोलीस चौकी अनेक दिवसांपासून बंद आहे. या बंद पोलीस चौकीमुळे परिसरातील लोकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. येथून ये जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी विशेषतः महिला वर्ग ज्यांना याच परिसरातून रात्री ये जा करावी लागते त्यांना या बंद पोलीस चौकीमुळे असुरक्षितता वाटत असून ही बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

कल्याण विकासिनी संस्थेचे अध्यक्ष ऍड. उदय रसाळ यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना पत्र लिहित या विषयाकडे लक्ष वेधले आहे. बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा नव्याने सुरू करून नागरिकांना सुरक्षिततेचा आधार द्यावा अशी मागणी आता केली जात आहे.

कल्याण शहरातील अनेक भागात पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. यातील काही चौक्या या आजतागायत सुरू आहेत तर काही चौक्या या बंद अवस्थेत उभ्या आहेत. यातीलच आनंदवाडी या भागातील चौकी देखील बंद असून ती पुन्हा सुरू होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

-कुणाल म्हात्रे

Demand for reopening of Anandwadi police station in Kalyan

KDMC Election : स्वबळावर लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस; – जगन्नाथ शिंदे

कल्याण :- राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १६ जून दरम्यान वर्धापन दिन सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात असून या दरम्यान विरोधी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाबाबत पसरवल्या जाणार्या चुकीच्या माहितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना आप्पा शिंदे यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ओबीसी आरक्षण नाकारले गेले असून मध्यप्रदेशला मात्र ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पुढे याबाबत बोलताना शिंदे यांनी पक्षपातळीवर महाविकास आघाडी होईल असे संकेत आहेत. मात्र स्थानिक  महानगर पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इच्छुक असतात अशावेळी आघाडी झाल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानेच पालिका निवडणुका KDMC Election स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच आघाडीबाबत योग्य तो  निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत असल्या तरी येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट वाटप २७ टक्के ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच केले जाणार असल्याचे माजी आमदार व कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

-रोशन उबाळे

कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या आवारात साकारणार बाबासाहेबांचे स्मारक; स्मारक समितीने पेढे वाटून मानले खासदारांचे आभार

कल्याण : अनेक वर्षांपासून काही कारणास्तव प्रलंबित असलेल्या कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग आता मोकळा होऊ लागला आहे. क.डों.म.पा.ने या स्मारकासाठी ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यामुळे स्मारक समितीने आज खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना पेढे देऊन त्यांचे आभार मानले आहेत.

कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. मात्र या ठिकाणी पुतळा नसल्याने बाहेरून पुतळा आणताना विशेष कसरत करावी लागते. या भागात बाबासाहेबांचे स्मारक व्हावे याकरिता अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे स्मरकास विलंब होत होता. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने याकरिता ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यानुसार १० महिन्यांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच ज्ञानकेंद्र उभे राहणार आहे.

आज विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कल्याण पूर्वने मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे देऊन आनंद साजरा करीत आभार मानले. यावेळी संस्थापक अण्णासाहेब रोकडे, अध्यक्ष देवचंद अंबादे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड, सचिव सुमेध हुमणे, कोषाध्यक्ष भारत सोनवणे, सह कोषाध्यक्ष शेखर केदारे, समाजसेवक सुभोध भारत, समता फेरी अध्यक्ष केतन रोकडे, मा.अध्यक्ष विवेक जगताप, मा.अध्यक्ष भारती जाधव, मा. सचिव पराग मेंढे, मनीष बनकर, तुषार जाधव, विलास गायकवाड, दादासाहेब महाले, शिल्पा अंबादे, पल्लवी जाधव आणि इतर पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

-संतोष दिवाडकर

Web Title : The Ambedkar Memorial Committee distributed sweets and thanked MP Shrikant Shinde

वसार गावात प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कल्याण : श्री नानासाहेब धर्माधिकारी ( Nana saheb Dharmadhikari ) आई गांवदेवी प्रसन्न प्रवेशद्वाराचे लोकार्पण आज होळीच्या निमित्ताने वसार गावात करण्यात आले. स्व.तुळशीराम गायकर यांच्या स्मरणार्थ रमेश गजानन फुलोरे यांच्या सौजन्याने व सुभाष गायकर तसेच सागर फुलोरे यांच्या प्रयत्नाने व स्वखर्चाने करण्यात आले आहे.

प्रत्येक गावात अथवा शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कमानीतून जावे लागते. यातून आपण कोठे प्रवेश करीत आहोत हे सर्वांना समजते. या दृष्टीने वसार गावात आता नवे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून यावर विचार केला जात होता. मात्र उद्योजक सुभाष गायकर, सागर फुलोरे, रमेश फुलोरे आणि सहकाऱ्यांनी मिळून या प्रवेशद्वाराच्या निर्मितीला सुरुवात केली. होळीच्या शुभमहूर्तावर सकाळी फीत कापून या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

आयोजित लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर तसेच प्रमुख अतिथी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र भुषण विश्वनाथ महाराज वारींगे उपस्थित होते. त्याचबरोबर शंकर महाराज म्हात्रे, अभिमन्यू चिकणकर, अशोक म्हात्रे, गणेश कोळेकर, दिलीप फुलोरे, नरेश वायले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ देखील उपस्थित होते. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार देखील मानण्यात आले.

उद्योग क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना आपण समाजासाठी देखील काहीतरी देणं लागतो हा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि याच विचारातून आम्ही हे प्रवेशद्वार उभे करण्यासाठी पुढे सरसावलो असे उद्योजक सुभाष गायकर यांनी एम एच मराठीशी बोलताना सांगितले. यापुढेही लोकोपयोगी कार्य व समाजसेवा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे गायकर म्हणाले.

-संतोष दिवाडकर

Web Title : Dedication of entrance to Vasar village