कल्याणच्या गौरी पाडा तलावात मृत कासवांचा खच; मृत कासवांवर अग्नीसंस्कार

कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याण (Kalyan) पश्चिमेतील गौरी पाडा (Gouri Pada) तलावात मृत झालेल्या कासवांवर (Turtle) वन विभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत. तर १३ कासवांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू टीमला (War Rescue Team) यश आले आहे.

कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा तलाव हा मस्त्य व्यवसाय आणि गौरी गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात येथे मासे पकडुन विक्री केली जाते. या तलावात दोन दिवसांपासून खूप दुर्गंधी पसरली होती आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले होते. मा.नगरसेवक दया गायकवाड यांनी वॉर संस्थेच्या हेल्पलाईन वर संपर्क केला असता त्यांची टीम घटनास्थळी गेली. त्यानंतर त्यांना मन विचलित करणारे दृश्य दिसले. त्याठिकाणी दोन-चार नव्हे तर ५० ते ६० मृत कासवांचा खच पडला होता. तर अनेक कासव शेवटचा श्वास घेत होते.

भारतीय मृदूपाठीचे कासव हे संकटग्रस्त उभयचर जीवांपैकी एक आहे. डासांनी पाण्यात सोडलेली अंडी, किडे व मृत मासे त्यांचे प्रमुख अन्न आहे. पाणी शुद्ध आणि स्वच्छ करणारे जीव हे एक प्रकारे मानवी जीवाला फायदेशीर आहे. घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा होत असताना काही कासव किनाऱ्यावर तडफडत असल्याचे आढळून आले. त्यात ९ भारतीय मृदू पाठीचे कासव आणि ४ रेड इयर्ड स्लाइडर जातीचे कासव असे एकूण १३ कासवांना वॉर टिम ने तत्काळ सुखरूप बाहेर काढले आहे. तर ५३ कासवांवर वनविभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत.

मृत कासवां पैकी काही कासव शवविच्छेदना करिता वनविभागाने पाठवले आहेत. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल. कासवांचा मृत्यू कशामुळे झाला? तलावात कोणी औषध टाकले आहे का? पाण्यात रासायनिक सांडपाणी सोडले गेले आहे का? तलावात मासे देखील असून मग त्यांचा मृत्यू कसा झाला नाही? असे एकना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळे कासवांचा मृत्यू मानवनिर्मित असेल तर दोषींवर लवकरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वॉर संस्थेच्या सुहास पवार यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Many turtles die in Gauri Pada lake of Kalyan

आजपासून शाळा सुरू! विद्यार्थ्यांनी सजवल्या शाळेच्या भिंती

कल्याण : पुन्हा एकदा शाळा भरल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन विद्यालय शाळेच्या आवाराबाहेरील भिंतींवर विविध समाज प्रबोधन पर चित्र काढण्यात आली आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा, लेक माझी भारताची शान, स्वच्छता अभियान आदी विषयांबाबत चित्रांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या कामासाठी केडीएमसी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मदत झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी दिली.

शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन‍ आणि शिक्षण विभागातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेला महापालिकेमार्फत देण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

Schools in Maharashtra resume from today

“नाना पटोले डोक्यावर पडलेले नेते” – भाजप शहर जिल्हाध्यक्ष

डोंबिवली : कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना अक्कल नसून, ते डोक्यावर पडलेले राजकारणी नेते आहेत. तसेच नाना पटोले सडलेल्या मेंदूचे राजकारणी आहेत. असे खळबळजनक वक्तव्य कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे (Shashikant Kamble) यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वीच तथाकथीत गावगुंड मोदीच्या नावे केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली होती. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभरात  उमटताना दिसत असून भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. असे असताना रविवारी देखील नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील  स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करून भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

BJP protests against Nana Patole in Dombivali

स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कल्याण : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पुर्वतील प्र.क्र.९८ विजयनगर शिवसेनेच्या मा. नगरसेविका शीतल मंढारी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सौजन्यातुन गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत.

२३ जानेवारी म्हणजेच स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. बाळासाहेबांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्ताने विजय नगर येथील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या होत्या. यावेळी मा. नगरसेवक महेश गायकवाड, शीतल मंढारी यांच्यासह, उपविभागप्रमुख शंकर पाटील, सुमेध हुमणे, गंभाजी लाड, संजय पिंगळे, शाखाप्रमुख राजेश पेडणेकर, प्रशांत बोटे, उपशाखाप्रमुख उत्तम घाडीगांवकर, कृष्णकांत मोरे, महेश नाईक, शाखा संघटक मीना मुठे,ज्येष्ठ नागरिक वामन कांबळे, कोठावदे सर, तसेच पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाने संबोधित केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या गेल्या. बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने भगवा सप्ताहच सुरू असतो. अनेक ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असे शीतल मंढारी यांनी सांगितले. तर उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व तसेच आई वडिलांशी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन महेश गायकवाड यांनी केले.

“बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार, नेहमी गोरगरीब जनतेच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर रहा हा शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानुसार आज त्यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व विजयनगर-आमराई विभागातील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मा. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. नगरसेविका शितलताई मंढारी यांच्या उपस्थितीत विभागातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.”

-सुमेध हुमणे (शिवसेना उपविभाग प्रमुख)

-संतोष दिवाडकर

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी रेल्वे कारभारावर व्यक्त केला संताप

कल्याण : रेल्वे प्रशासनाने कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) व इतर भागातील रेल्वे लगत राहत असलेल्या नागरिकांना घरं सोडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून विविध राजकीय नेते नागरिकांच्या भेटीगाठी करीत आहेत. दरम्यान कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी देखील कोपर परिसरातील नागरिकांची भेट घेतली.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली पूर्वेच्या कोपर परिसरातील नागरिकांचे म्हणणे जाणून घेत संतप्त भावना व्यक्त केल्या. जोपर्यंत रेल्वे प्रशासन (Indian Railways) या लोकांचं आधी पुनवर्सन करीत नाही तोपर्यंत कारवाई होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. यावेळी एका वयोवृद्ध आजीने देखील कारवाई करायला आल्यास अंगावर गोळी झेलण्याची तयारी आहे असे खासदारांना बोलून दाखवले. मात्र श्रीकांत शिंदे यांनी तुम्ही कशाला? गोळी खायला आम्ही आहोत असे प्रतिउत्तर करीत आधार दर्शविला.

शासकीय योजनांमध्ये बाधित होणाऱ्याचं आधी पुनवर्सन केलं जातं. रेल्वेने जागा रिकामी करून घेण्या अगोदर वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांकरिता पुनवर्सन धोरण राबवायला हवे. त्याशिवाय इथली घरं रिकामी केली जाणार नाही असे सांगत रेल्वेच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाने समजदारपणा दाखवावा तसेच केंद्र, राज्य आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे समनव्य साधून हा प्रश्न मार्गी लावावा असेही खासदार श्रीकांत शिंदेंचे म्हणणे आहे.

Shiv Sena MP Shrikant Shinde expresses anger over railway management

ऑटोग्राफ मिळवण्यासाठी लहानग्यांनी रोखला आमदारांचा ताफा

कल्याण : मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं आपण म्हणतो. त्याचबरोबर लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्यांना देखील भाग पडावे लागते. आज कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)आपल्या मतदार संघातील अशोक नगर, मिलिंद नगर भागात पाहणी दौरा करीत होते. हा दौरा संपवून ते गाडीतून निघाले असता परिसरातील लहानग्यांनी त्यांच्या गाडीजवळ येऊन ऑटोग्राफ साठी हट्ट धरला. यावेळी आमदारांना देखील या विलक्षण मागणीवर हसू आले. यानंतर प्रत्येक मुलाच्या हातावर त्यांनी ऑटोग्राफ देत त्यांचा हट्ट पूर्ण केला.

कल्याण पूर्वेतील अशोक नगर आणि मिलिंद नगर भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी विशेष पाहणी दौरा केला होता. या दरम्यान स्थानिक नागरिकांशी बोलून त्यांनी विविध समस्येवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती जाणून घेतली.

याच परिसरातील लहानग्यांनी त्यांच्या पुढे ऑटोग्राफ देण्यासाठी हट्ट केला होता. मुळात आजचा काळ हा फोटोग्राफीचा असल्याने ऑटोग्राफ देणे ही एक दुर्मिळ बाब बनली आहे. मात्र अश्या प्रकारची मागणी आणि लहान मुलांचा उत्साह पाहून मला ऑटोग्राफ देण्याचा मोह आवरता आला नसल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या समाज माध्यमावर पोस्ट करताना लिहले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

-संतोष दिवाडकर

The youngsters stopped the convoy of MLAs to get autographs

video
पुनर्वसनाच्या मुद्द्यासाठी महिलांचा मुंडन करण्याचा KDMC ला इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा रिंगरूट प्रकल्पात ८४५ नागरिक बेघर होत असल्याने मनपा विरोधात मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. बाधित नागरिकांचे हे उपोषण सुरू असून दहा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी या उपोषण कर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी मनपाचा निषेध करत मुंडन केले आहे. तेराव्या दिवसा पर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर महिला देखील कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयासमोर मुंडन करणार असल्याचा इशारा जालिंदर बर्वे आणि आंदोलन कर्त्या महिलांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा ते दुर्गाडी या रिंगरुंटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ रहिवाशांचे पुर्नवसन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विस्थापित कुटूंबियांनी मंत्रालयात भेट घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पुनवर्सन समितीचे अध्यक्ष सपना देवनपल्ली कोळी यांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेला अनेक पत्र व्यवहार करुन देखिल महापालिका आयुक्त व संबंधीत अधिकारी पुर्नवसन करण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्याने प्रशासनाकडे अनेक वर्षापासून रहिवाशी संस्थेच्या माध्यमातून मोर्चे, अंदोलन, पत्र व्यवहार केला आहे.

पुनर्वसनाच्या मागणीसाठी पब्लिकन पक्ष व अटाळी आंबिवली सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जालिंदर बर्वे, सचिव संदीप घाडगे व महिला पदाधिकारी व राहिवाश्यानी सोमवार पासून पालिकेच्या या प्रभाग क्षेत्र वडवली कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. टिटवाळा – अटाळी -आंबिवली या विभागातील रिंगरुटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ कुटूंबियांचे पुर्नवसन बी.एस.युपी या योजनेतुन करण्यात यावे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १९९६चे पुर्नवसन पात्र धोरणात बदल करुन ते २०१६ पर्यंत करण्यात यावे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करु नये. रिंगरुट मध्ये बाधीत होणाऱ्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत रिंगरुट चे काम बंद करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्या सर्व रहिवाशांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

कल्याण : कल्याण मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच.जी ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४ लाख ५० हजार  किंमतीच्या ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत.

दरम्यान आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. (Kalyan Crime)

-कुणाल म्हात्रे

उल्हासनगरमध्ये धावत्या टँकर मधून एसिड उडून चार जण भाजले

Ulhasnagar : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसिड बाहेर पडून चार जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये भरत वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले. याबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरच्या श्री राम चौक परिसरात ही घटना घडली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. ऍसिडने भरलेला टँकर रहदारीच्या परिसरातून घेऊन जाणे तसेच टँकरचे झाकण अश्या पद्धतीने लिकेज होणे ही निष्काळजीपणाची बाब आहे. यामुळे दोन जणांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कठोर कारवाई करतात.

रस्त्यावरून पायी चालत असताना किंवा दुचाकी चालवत असताना अश्या प्रकारच्या अवजड वाहना पासून शक्यतो सुरक्षित अंतर ठेवणे आपल्याच हिताचे असणार आहे. या अगोदरही रस्ते अपघातात अनेक दुचाकीस्वाराचा अवजड वाहनांशी अपघात होऊन त्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. उल्हासनर येथील या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजली आहे.

-संतोष दिवाडकर

In Ulhasnagar, four persons were burnt when acid flew from a speeding tanker

डोंबिवलीत फक्त दागिन्यांसाठी महिलेची हत्या

Dombivli :- डोंबिवली शहरातील टिळकनगर भागात विजया बाविस्कर (Vijaya Baviskar) या ५८ वर्षीय महिलेच्या हत्येने (Murder) सोमवारी एकच खळबळ माजली होती. यानंतर पोलिसांनी तपास करीत एका महिलेला ताब्यात घेतले असून दागिन्यांसाठी हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. मात्र असे असले तरी नेमके हेच कारण आहे की संपत्तीच्या वादातून कट कारस्थान रचले गेले आहे अश्या उलट सुलट चर्चांना देखील उधाण आले आहे.

डोंबिवलीत पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या सीमा खोपडे (Seema khopde) या महिलेने दागिन्यांसाठी विजया बाविस्कर या महिलेची हत्या केल्याचे समोर येत आहे. या महिलेने देखील या हत्येची कबुली दिली असून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत पूढील तपास सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार महिलेचा ३० वर्षांपूर्वी घटस्पोट झाला असून ही महिला सदर भागात मागील तीन वर्षांपासून वास्तव्यास आहे.

विजया बाविस्कर यांची हत्या दागिन्यांच्या हव्यासापोटी झाली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मात्र असे असले तरी या महिलेच्या हत्येमागे नक्की हेच कारण आहे की संपत्तीची लालसा आहे ? असाही संशय टाळता येणार नाही. जर या हत्येच्या मागे संपत्तीचे कारण असेल तर सदर हत्येत आणखीन कोणाचा सहभाग आहे का ? ही देखील एक तपासाची बाब बनू शकते.

-संतोष दिवाडकर

Woman killed in Dombivli just for jewelery