Dombivali : थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून भाजी,फळे, कडधान्य उपलब्ध

Dombivali : शेतात पिकवलेला शेतमाल कोणत्याही दलालाच्या मध्यस्थीशिवाय स्वस्त दरामध्ये थेट ग्राहकापर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांना त्यातून जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या बाजारपेठेचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केला. याच विचाराने शहरात कृषी विभाग आत्मा आणि कृषी पणन पुरस्कृत आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थेट शेतकरी ते ग्राहक अशी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवली पूर्व येथील नेहरू मैदानात ही ग्राहक पेठ सुरु असणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी ही ग्राहक पेठ डोंबिवलीतील वेगवेगळ्या महापालिका मैदानांवर आयोजित केली जाणार आहे. सर्वांचे पोट भरावे यासाठी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या आपल्या अन्नदात्या शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळाले, तसेच शहरातील नागरिकांना थेट शेतातील माल खरेदी करता आला तर त्यात दोघांचाही फायदा असल्याचे मत शेतकर्यांनी व्यक्त केले.

या संकल्पनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या बाजारपेठेत डोंबिवलीकरांना सेंद्रिय तसेच नैसर्गिक पद्धतीचा सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य आदी जिन्नस रास्त दरात विकत घेता येणार आहेत. नेहरू मैदान येथे नवरात्रीनिमित्त विशेष फ्रुट महोत्सवाच्या रूपाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Dombivali : Vegetables, fruits, pulses available from direct farmer to consumer concept

महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत उभारणार महाराष्ट्र भवन; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

रवींद्र चव्हाण : श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या (भक्त निवास) वास्तूचे भूमिपूजन आज संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या अपर सचिव मनीषा म्हैसकर व अयोध्येचे खासदार व आमदार आदींची विशेष उपस्थिती लाभली.

अयोध्येत महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालक राम मंदिरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत अयोध्या नरेश प्रभू श्री राम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतून अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. हिंदुत्वाचा मानबिंदू असलेले हे अयोध्येतील पवित्र राम जन्मभूमी मंदिर जगभरातील हिंदूंना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते. यावेळी बालक राम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली.

भूमिपूजन झाल्याने आता तेथे भवनाचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे म्हटले जात असल्याची प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी व्यक्त केली.

Dombivli News : स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद

Dombivli News : महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामी नारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभियानाचे अयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिर ते पुढील चौकापर्यंत या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.

दोघांनीही स्वच्छता अभियानाला स्वतः येऊन सुरुवात केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधीलकी आणि स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही टर्म मध्ये ते स्वतः या विषयी विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटत असल्याचे मत यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही एका दिवसाची असून उपयोग नाही. तर त्यात सातत्य असायला हवे. त्यातून परिसर स्वच्छता, पर्यावरण व्यवस्थित राखले जावे असेही चव्हाण म्हणाले. मंत्री चव्हाण हे आताच नव्हे तर गेली अनेक वर्षे या उपक्रमात येऊन झाडू हातात घेतात. त्यामुळे त्यांचे सहकारीही पुढे सरसावून मदत करतात. या गोष्टीचा आनंद असल्याचे स्वामी नारायण भक्तांनी सांगितले.

Dombivli News : Huge response to Swaminarayan Mandir Sanstha’s cleanliness drive

Murbad News : घरात बसलेल्या व्यक्तीचा वीज अंगावर कोसळून मृत्यू

Murbad News : मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे. भरदिवसा अंधार दाटून जोरदार पावसाचा थैमान पहायला मिळतोय. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे अनेक लोकांच्या जीवाला घोर लागून राहतो. तर प्रकृतीच्या या रौद्रअवतारा मुळे लहान मुलांचा देखील थरकाप उडतोय. या विजेच्या तांडवामुळे मुरबाडमध्ये एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुरबाडमध्ये काल मुसळधार पाऊस सुरू होता. याचदरम्यान शिरगाव येथे वास्तव्यास असलेल्या परशु पवार यांच्या अंगावर वीज कोसळली. सदर व्यक्ती आपल्या घरातच बसली होती. मात्र दुर्दैवाने वीज अंगावर पडून या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अधिक घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांचा तांडव सध्या सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. त्याचबरोबर झाडांखाली आडोसा न घेता सुरक्षित ठिकाणी जावे. अशावेळी विजसेवा खंडित केली जाते. नागरिकांनी देखील आपल्या यांत्रिक उपकरणांचे प्लग बोर्डपासून वेगळे केल्यास होणारे नुकसान टाळता येईल. संपूर्ण वातावरण शांत होई पर्यंत खबरदारी घेणे गरजेचे असेल.

Murbad News : A person sitting in the house died due to electric shock

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पण गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांचे काय? राजेश दाखिनकर यांचा सवाल

अक्षय शिंदे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले. शिवसेनेकडून राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखिल भारतीय सेनेचे पक्ष प्रमुख अरुण गवळी उर्फ डॅडी यांचे विश्वासू खंदे समर्थक अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख राजेश दाखिनकर यांनी देखील या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल त्यांनी सत्ताधारी तसेच विरोधक दोघांवरही सवाल उपस्थित केले आहेत.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्या चिमुरड्या मुलींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे यावेळी राजेश दाखिनकर म्हणाले. जो माणूस मुलींवर अत्याचार करतो त्याची बाजू कोण कशी घेऊ शकतो? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात ज्या शाळेत हा प्रकार घडला ते संस्थाचालक राजकीय पक्षाशी संलग्न असून ते सध्या फरार आहेत. त्यांना आतापर्यंत अटक होऊन त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचे उत्तर गृहमंत्री व राज्य सरकारने जनतेला द्यायला हवे. शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेले आहे. त्यामुळे या घटनेत आणखीन समाविष्ट असलेल्या इतर व्यक्तींनाही कडक शासन व्हायला हवे अशी प्रतिक्रिया राजेश दाखिनकर यांनी एमएच मराठीला दिली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत अशाप्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाले नव्हते. महिला आणि मुली महाराष्ट्रात पूर्णपणे सुरक्षित होत्या. परंतु अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या संदर्भात मग सरकार कोणाचेही असो, महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे. ‘शक्ती कायदा’ जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे. त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा आम्ही अखिल भारतीय सेनेतर्फे करतच आहोत. परंतु इतर राजकीय पक्षांनी याबाबत महाराष्ट्राच्या दोन्ही सदनांमध्ये सरकारला जाब का विचारला नाही, याचा विचार कोणी केला आहे का? की फक्त महिलांवर अत्याचार झाल्यावर त्याचे राजकारणच करत बसणार आहेत?

डोंबिवलीत घडलेल्या घटनेत आम्ही महिलांवरील अत्याचारासंदर्भात ‘शरिया’ सारखे कायदे महाराष्ट्रात लागू झाले पाहिजेत, तरच अशा प्रकारच्या अत्याचारांना आळा बसेल, असे स्पष्ट मत मांडले होते. राज्य शासनाने कठोर पावले उचललीच पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला पुरा’ होईल.

– राजेश दाखिनकर
(ठाणे जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय सेना)

Akshay Shinde’s encounter but what about others involved in the crime? Question by Rajesh Dakhinkar

Dwarli ते नेवाळी नाका पर्यंत घरफोड्या वाढल्या; रात्रीच्या पोलीस गस्तीची मनसेची मागणी

Dwarli : श्री मलंगगड रोडवरील द्वारली ते नेवाळी नाका परिसरात अलीकडल्या काळात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून महिलांची छेडछाड होत असल्याची माहिती मनसेचे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी हिल लाईन पोलिसांना निवेदनाद्वारे दिली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व भागात असलेला द्वारली ते नेवाळी नाका पर्यंतचा भाग हा शहरी वर्दळीपासून बाहेर असलेला भाग आहे. त्यामुळे येथील लोकवस्ती ही अलीकडे हळूहळू वाढू लागली आहे. त्याचबरोबर परिसरात घरफोड्या, दुकानफोडी वाढल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग भयभीत झाला असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत.

गर्दुल्ल्यांचा वावरामुळे या भागात महिला सुरक्षित नसून छेडछाडीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी निवेदनात केली असून, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना भेटून प्र.क्र.११९ चे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी निवेदन दिले आहे.

Burglary increased from Dwarli to Newali Naka; MNS’s demand for night police patrolling

डोंबिवली ते मुंबई थेट KDMT बससेवा सुरू करण्याची मागणी

KDMT : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस सध्या नवी मुंबई मार्गावर यशस्वी व प्रवाशांना सोयीस्कर अशी धाव घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता डोंबिवली मोठागाव येथून नव्याने बांधण्यात आलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मुंबईकडे बस सेवा सुरू करण्यासाठी युवासेनेचे दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळेल असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत लवकरच शंभरहून अधिक नवीन बस दाखल होणार आहेत. या बसमुळे डोंबिवली ते घोडबंदर रोड, डोंबिवली ते ठाणे, डोंबिवली ते मुलुंड चेक नाका आणि डोंबिवली ते घाटकोपर मेट्रो स्टेशन या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाल्यास, रेल्वे प्रवासाला उत्तम पर्याय मिळेल. ही सेवा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वेवरचा भार काहीसा कमी होईल असे दीपेश म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहरांवर येणाऱ्या लोंढ्यामुळे लोकसंख्या दुप्पटीने वाढू लागली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा देखील बोजवारा उडाला आहे. ज्याचा ताण रेल्वे वाहतुकीवर अधिक होतो. त्या दृष्टीने कल्याण डोंबिवलीतुन मानकोली पुलावरून मुंबई बससेवा सुरू केली तर नक्कीच सोयीस्कर बाब ठरू शकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Dipesh Mhatre’s demand to start direct KDMT bus service from Dombivli to Mumbai

डोंबिवली शहर होणार ग्रीन एनर्जी सिटी; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्यास सुरुवात

रवींद्र चव्हाण : डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल व या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समास्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती. विशेष म्हणजे या योजनेत सोलार पॉवर युनिटच्या फिटिंग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया मोफत पार पडणार आहे. यामुळे सोसायट्यांना सोलार पॉवर युनिट बसवणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नाहीत.

सदर योजनेसाठी सोलार पॉवर कंपन्या, सोसायट्या आणि महावितरण कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी या प्रक्रियेतील माईलस्टोन गाठला आहे. यावेळी ५४ सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी लेटर ऑफ इंटेंट साईन केले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या स्नेहा रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये सोलार पॉवर युनिट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला.

या योजनेमुळे सोलार पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या कनेक्शनसाठी पुढील २५ वर्षे स्थिर वीजदर शक्य होणार आहे. परिणामी तब्बल ५० ते ६०% रक्कमेची बचत होईल. यामुळे डोंबिवलीकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या ग्रीन एनर्जी सिटी संकल्पनेचे स्वागत केले आहे.

एसटी महामंडळ : यावर्षी पावला गणपती बाप्पा; नऊ वर्षांत प्रथमच एसटी आली नफ्यात

एसटी महामंडळ : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरु झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल ९ वर्षांनी ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळ नफ्यात आल्याने व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात देखील प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने फायद्यात येईल असे प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.

दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे २०२२ पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात ” हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान”, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगे तीर्थाटन, असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्या मध्ये आहेत, त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून, त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या.

या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला १६ कोटी, ८६ लाख ६१ हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे. भविष्यात येऊ घातलेल्या स्व: मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळ : For the first time in nine years, ST turned a profit

Gajanan Rane : कामगारांना पावला राज ठाकरेंचा ‘गजानन’; करून दिली घसघशीत पगारवाढ

Gajanan Rane : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महापे येथील नामांकित कंपनी प्रोटोलॅबच्या कामगारांना अखेर न्याय मिळाला असून, मनसेच्या पाठपुराव्यामुळे येथील कामगारांना पगारवाढ मिळाली आहे. यासाठी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने या कामगारांनी गणेश चतुर्थीला मनसेचा गजानन पावल्याची भावना व्यक्त केली आहे.

ऑगस्ट महिन्यात प्रोटोलॅब, इलेक्ट्रोटेक्नोलॉजिस्ट
कंपनीच्या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्य अंकुश राजपूत यांच्या समवेत सरचिटणीस गजानन राणे यांची भेट घेतली होती. या वेळी कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सदस्यतत्व स्वीकारले होते. या वेळी सर्व कामगारांनी गजानन राणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याचे ठरवले होते. परंतु या प्रसंगी राणे यांनी आज तर तुमच्या कंपनीमध्ये युनियनची स्थापना झाली आहे, जेव्हा तुमच्या सर्व मागण्या मान्य करून घेईन, तुम्हाला चांगली पगारवाढ मिळवून देईन तेव्हाच हा सत्कार मी स्वीकारेन, असे सांगितले होते.

अनेक वर्षापासून रखडलेली पगारवाढ अखेर या गणेशोत्सवात पूर्ण झाली असून त्रैवार्षिक करारही पूर्ण झाला. यामुळे आनंदी झालेल्या कामगारांनी “राज ठाकरेंचा गजानन आम्हाला पावला” असे उदगार काढत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही आभार व्यक्त केले. यादरम्यान कामगारांनी गजानन राणे यांचा तसेच प्रथम पुढाकार घेणाऱ्या कल्याण मधील युवा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांचा यथोचित सन्मान केला.

Gajanan Rane : Raj Thackeray’s ‘Gajanan’ steps up for workers; Gave salary hike