बांधकामाला वापरलेले सामान न काढताच गटार केले बंधीस्थ; परिसरात पाणी साचल्याने घाई गडबड बांधकामाचा प्रकार निदर्शनास

विठ्ठलवाडी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्र.क्र. ९६ मध्ये काही दिवसांपूर्वी काॅंक्रीट रस्ता व गटाराचे काम करण्यात आले होते. परंतु गटार बंधिस्त करण्यापूर्वी गटार व्यवस्थित साफ न करता, तसेच खाली लावलेले प्लायवुड सुद्धा काढले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

विठ्ठलवाडी येथील सह्याद्री पार्क ते महालक्ष्मी शाॅपिंग सेंटर येथील नवीन काॅंक्रीट रस्त्यावर अर्धा एक तास मुसळधार पाऊस पडल्यास गुडघ्या पेक्षा अधिक गटाराचे पाणी साचते. यामागे काही तांत्रिक बाबी असून महापालिका व MMRDA ठेकेदार कंपनी कडुन गटारांची साफसफाई आज करण्यात आली होती. याचदरम्यान या परिसरातील रहिवासी तसेच भाजप शहर उपाध्यक्ष संदिप राजाराम जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी उपस्थित असता ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत समाजसेवक विशाल जाधव यांनी हा प्रकार श्रेयवादाच्या घाईत झाला असल्याची उपरोधक टीका समाज माध्यमांवर केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रभागांत रस्ते काँक्रीटीकरण तसेच बंधीस्थ गटारांची कामे करण्यात आली आहेत. याच कामांचे श्रेय मिळवण्यासाठी राजकीय मंडळींमध्ये चढाओढ लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र कामात हलगर्जीपणा, निकृष्ठता तसेच दिरंगाई होता सल्याचे प्रकार देखील समोर येत असतात. करदात्या नागरिकांना गृहीत धरून केलेल्या कामाचा पुढे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही स्मार्ट सिटीची स्मार्ट काम आहेत का? असा सवाल नागरीक विचारू लागले असून महापालिका अधिकारी कामाची पाहणी करतात की नाही असाही सवाल उपस्थित केला जातो.

संतोष दिवाडकर

In Vitthalwadi, water accumulates on the road due to sewerage

एज्युकेशन टुडे फाउंडेशन Arya Gurukul आयोजित जन्माष्टमी उत्सव

Arya Gurukul : जन्माष्टमी उत्सवात शाळेतील सर्वच १४३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध कार्यक्रम एज्युकेशन टुडे फाउंडेशन तर्फे विविध शाळांमध्ये घेतले जातात. जन्माष्टमी कार्यक्रमा क्षणी मुले खूप आनंदी व उत्साही दिसत होते. लिट्ल आर्यन्सच्या मुलांसाठी तर हा सण म्हणजे एक पर्वणीच होती. शाळेतील सगळे बालगोपाळ प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील मुले व मुली श्रीकृष्ण व राधाचा पोषाख परिधान करून आले होते. आर्य गुरुकुल शाळा नसून एक गोकूळच आहे की काय असा भास होत होता.

लिटिल आर्यन्स परिसरात श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. लग्न, बाळकृष्ण, कालियामर्दन, राधा-कृष्ण अशा अनेक प्रसंगाचे हुबेहुब चित्र व सजावट करण्यात आली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.

संदिपनी आश्रमातील मुलांनी गीतेच्या श्लोकांचे पठण केले. चिन्मय सरगम समूहाने कृष्ण भजन गायले, मूलींनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. तसेच शाळेत आयोजित केलेल्या दही हांडीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भाग घेतला. भगवान श्रीकृष्णांचा आवडता पदार्थ लोणीचा प्रसाद शाळेतील सर्व वालगोपाळांना वाटण्यात आला. शाळेतील बालगोपालन सह हा सण साजरा करताना संपूर्ण वातावरणाने जणू काही आपण मथुरेत आहोत आसा भास होत होता.

संतोष दिवाडकर

Watch Full Video of Arya Gurukul Janmashtami

Janmashtami celebration organized by Education Today Foundation Arya Gurukul

Kalyan Ganeshotsav : कल्याण डोंबिवली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना KDMC कडून दिलासा

Kalyan Ganeshotsav : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळांच्या नियोजना संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्यांनी यावेळी मोठा दिलासा दिला आहे.

क.डों.म.पा. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गणेश मंडळांना मंडप आणि त्याजवळील असलेल्या कमानीचे शुल्क माफ करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे असणारे शुल्क हे हजार रुपयांवरून निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना महापालिकेच्या या शुल्कातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सोयीस्कर अशी एक खिडकी योजना प्रभाग क्षेत्र कार्यालयात राबविण्यात येणार आहे.

सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने खड्डे पडलेले रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करून डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी माध्यमांना दिली आहे. त्याचबरोबर घरघुती गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्यानंतर मूर्तींची होणारी विटंबना थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांकडून माध्यमांना सांगण्यात आले.

संतोष दिवाडकर

Kalyan Ganeshotsav : Relief from KDMC to Kalyan Dombivli Public Ganeshotsav Mandals

एज्युकेशन टुडे फाउंडेशन तर्फे Arya Gurukul School येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा संपन्न

Arya Gurukul School : आर्य गुरुकुल विद्यालय नांदिवली शाखा कल्याण पूर्व, एज्युकेशन टुडे फाऊंडेशनचे संस्थापक भरत मलिक यांच्या नेतृत्वाखाली, पर्यावरण सहयोगी, आनंद आणि उत्साहाने गणेश चतुर्थीच्या तयारीला एक नवीन आयाम आणण्यासाठी गणपतीच्या आगमनासह ही बाब लक्षात घेऊन “पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 2 सप्टेंबर 2023 रोजी आर्यगुरुकुल विद्यालयाच्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

ज्यामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती राधामणी अय्यर यांच्या प्रेरणेने शाळांनी पर्यावरणाची शुद्धता आणि सौंदर्य लक्षात घेऊन कच्च्या शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार केल्या. ज्यामध्ये पाच शाळांमधील 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कलाशिक्षक मनीष व्यापारी यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डेमो सेशन सादर केले.आणि मार्गदर्शन केले.

प्रा.मनीष व्यापारी यांची प्रतिक्रिया

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून रुपाली शालवाले या पर्यावरणवादी आणि अस्मिता शर्मा होत्या. ज्या 2016 पासून सामाजिक शिक्षणाद्वारे शाश्वत समुदाय उभारणीवर काम करत आहेत. कार्यक्रमाचे परीक्षक विजय पुंडेकर व सुभाष शेगावकर यांनी केले. सर्वांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेचा उद्देश लोकांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच निस्तेज गणेशमूर्तीं ऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे हा आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गणेशमूर्ती बनवण्याच्या कलेतील त्यांचे प्रभुत्व दाखवण्याची आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक कल्पना मांडण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा केवळ रंगीबेरंगी आणि मौजमजेला एक नवी दिशा देणार नाही, तर आपल्या पर्यावरणाच्या रक्षणाचा महत्त्वाचा संदेशही देईल.

पर्यावरणपूरक गरजांशी जोडून उत्तम आणि हरित भविष्य कसे निर्माण करता येईल हा संदेश या स्पर्धेने दिला आहे.स्पर्धेतील सर्व उमेदवारांना सहभाग पत्र देण्यात आले व विजेत्याला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

संतोष दिवाडकर

Environment friendly Ganesha idol making competition concluded at Arya Gurukul School by Education Today Foundation

Navbharat Saksharta Abhiyan : कल्याण डोंबिवलीत निरक्षरांचे झाले सर्वेक्षण; शिक्षकांची झाली पुरती दमछाक

Navbharat Saksharta Abhiyan : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये “नवभारत साक्षरता अभियान उपक्रम २०२२ -२७ अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दि. १७.०८.२०१३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील ४४६ शाळांतील २३०६ शिक्षकांमार्फत सर्व वार्डातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण यातून करण्यात आले.

शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे निरक्षरांचे नाव, लिंग, संवर्गनिहाय माहिती संकलीत करण्यात आली. सर्व प्रभागातील लोकांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पदधतीने साक्षर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७.०८. २०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत शिक्षक सर्वेक्षक, म्हणून आपल्या कुटुबांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहेत.

या कालावधित वय वर्ष १५ ते ३५ आणि ३५ वर्षाच्या पुढील सर्व स्त्री आणि पुरूष दिव्यांग आणि पारलिंगी यांचे सर्वेक्षण करून विगतवारी करून निरक्षर संख्या निश्चित करावयाची आहे. तसेच शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल केले जाणार आहे. या सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सिआरसी प्रमुख यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र शाळाबाहय व निरक्षर मुक्त करण्यासाठी प्रशासन अधिकारी रंजना राव यांनी सहकार्य करणेकामी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले होते. मात्र हे सर्वेक्षण करण्याचे काम शाळेतील शिक्षकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच घरोघरी फिरून शिक्षकांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आले. त्याचबरोबर सर्वेक्षणापूर्वी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतानाच शिक्षकांच्या नाकी नऊ आले होते.

संतोष दिवाडकर

Navbharat Saksharta Abhiyan : A survey of illiterates was conducted in Kalyan Dombivli

Kolsewadi Police यांचा अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर छापा; तस्करासह आठ नशेडी ताब्यात

Kolsewadi Police : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एका अंमली पदार्थ तस्कराला अटक केली असून ८ नशा करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले आहे. नानिकराम मंगलानी असे अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव असून तो खडेगोळवली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर दोन खून आणि एक विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी सर्वपक्षीय जागृक नागरीकांनी मोर्चा काढला होता. कारण खून आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात सहभागी तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते. कल्याण-डोंबिवलीत अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्कॉट तयार करण्यात आले आहे. जो प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज तस्करांवर लक्ष ठेवून आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी या बाबत सांगितले की, सोमवारी कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये एका ड्रग्ज तस्करासह आठ नशेबाजांनाही अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले नशा करणारे हे चांगल्या घरातील असले तरी ते नशेच्या आहारी गेले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने अमली पदार्थांचे सप्लाय करणाऱ्यांमध्ये घाबराहटीचे वातावरण पसरले असून पोलिसांना माहिती मिळताच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी तस्करांसह ५०-६० किलो गांजा अंबरनाथ बदलापूर मध्ये जप्त करण्यात आला असल्याची देखील माहिती आहे.

संतोष दिवाडकर

Kolsewadi Police raids drug dens

Kalyan Crime : रक्षाबंधनापूर्वी भाऊ बहीण लॉकअप मध्ये; कल्याण पूर्वेतुन पुन्हा खळबळजनक घटना समोर

Kalyan Crime : रक्षाबंधनापूर्वीच कल्याण पूर्वेत आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाऊ पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करत असताना चक्क बहिणीनेच मोबाईल वर व्हिडिओ बनवला. पीडित मुलीने हि बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेडया ठोकल्या आहेत.

सदर बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते. ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना याच परिसरात राहणारे अजय थापा व सपना थापा या बहीण भावांची नजर तिच्यावर पडली. यात भाऊ अजयने या मुली सोबत अश्लील चाळे केले. आणि त्याची बहीण सपना हिने हा किळसवाना प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडीतेने हकीकत घरी कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी अजय थापा व सपना थापा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण पूर्व भागात मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना आता वारंवार समोर येऊ लागल्या असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्वेतील वाढलेली लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि अपुरे पोलीस कुमक पाहता एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावर याचा मोठा ताण पडत आहे. मात्र असे असूनही पोलिसांनी प्रत्येक गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड केले आहे. त्यामुळे आणखीन एक पोलीस ठाणे केव्हा होणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Crime : Obscene video made by brother and sister

Kalyan Suicide : कल्याण पूर्वेत आणखी एक आत्महत्या

Kalyan Suicide : कल्याण पूर्वेतील गणेशवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पवन धनराज आगडे (२८) असं या तरुणाचे नाव असून गळफास घेऊन त्याने स्वतःचे जीवन संपवले आहे.

मागील काही दिवसांपासून कल्याण पूर्वेत अनेक गुन्हे घडत असून आत्महत्याच्या घटनाही समोर येत आहेत. सहाय्यक लोको पायलट आत्महत्या प्रकरण ताजे असताना आता आणखीन एका तरुणाने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरात कोणी नसल्याचे पाहून सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करीत त्याच्या मूळगावी पाठवून देण्यात आला.

सदर तरुण आपल्या आई वडिलांसह राहत होता. मागील काही काळापासून तो मानसिक तणावाखाली वावरत होता. व याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Suicide: Another suicide in Kalyan East

Kalyan Murder : कल्याण पूर्वेत आणखी एक हत्या; टोळक्याच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Kalyan Murder : कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी शहरवासीयांसाठी चिंतेची बाब बनली असताना आता आणखीन एका हत्येची बातमी समोर येत आहे. खडेगोळवली येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाची हत्या झाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदर मुलाला काही जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर लोखंडे असं मृत मुलाचे नाव असून तो काल सायंकाळी कैलाशनगर परिसरात गेला होता. तेथे जुन्या वादातून एका टोळक्याने त्याला घेराव घालून अमानुषपणे मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच टोळक्याने तेथून पोबारा केला. त्या टोळक्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले तसेच जखमी समीरला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र आज पहाटेच्या दरम्यान समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. सध्या काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुकेश आणि नीरज दास अशी त्यापैकी दोघांची नावे आहेत.

कल्याण पूर्व भागात सध्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत असून शहरवासीयांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. तिसगावातील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण ताजे असताना आणखी एका मुलाच्या हत्येने आता पूर्व भागात खळबळ माजली आहे. स्थानिक आमदार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी नुकतेच आणखी एक पोलीस स्थानक तसेच पोलीस कुमक वाढवण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील लोकसंख्या, क्षेत्रफळ, फोफावलेली गुन्हेगारी आणि एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावरील ताण लक्षात घेता आता गृहखात्याने गांभीर्याने विचार करून आणखी एक पोलीस स्थानक निर्माण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.

शहरातील तरुणाईला गांचाचा नाद ?

अलिकडल्या काळातील तरुणाई ही गांजाच्या अधीन गेली असून शहरात ठिकठिकाणी गल्ली बोळात घोळका करून गांजा सेवन केले जाते. खडेगोळवली भागातील असंख्य अल्पवयीन मुलं या नशेच्या आहारी गेली असल्याचे स्थानिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या अगोदर मानापाडा पोलिसांनी अनेकदा गांजा पकडला होता. मात्र तरी देखील शहरात तरुणांना गांजा कुठून मिळतो? गांजा विक्रेते कोण आहेत? हा गांजा कुठून सप्लाय होतो? याचा शोध घेऊन तरुणाईला वाचवणे ही देखील येणाऱ्या काळाची गरज बनली आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Murder : A minor boy died in a gang attack in Kalyan East

Maval News : कामशेत मध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला कल्याण पोलिसांनी केली अटक

Maval News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व शहरातील चक्कीनाका परिसरात एका सायकल मार्टचे मालक भावेश चौधरी यांची संजय आचरे आणि कविता आचरे या पती पत्नीने सायकल विकत घेण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जाऊन कामशेत येथून या नवरा बायकोला अटक केली आहे.

सायकल खरेदी करताना दुसऱ्या व्यक्तीच्या नावे फेक चेक देऊन, आपण डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक असल्याचं महिलेने सांगून, माझ्या गाडीत माझी पर्स राहिली आहे त्यामुळे आता मला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं आहे तेव्हा मला दहा हजार रुपये द्या नंतर मी संध्याकाळी तुम्हाला ते परत करते असे तिने सांगितले. व त्या नंतर पुन्हा अडीच हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. यानंतर दोघेही नवरा बायको पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायकल मार्टच्या मालकाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक करणाऱ्या आचरे दांपत्याचा कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय एपी सुरवडे आणि त्यांच्या टीम ने तपास करून त्यांना आता कामशेत येथून अटक केली आहे. कामशेत मध्ये राहून ठाणे जिल्हयातील लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा हा धंदा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कल्याण एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत असल्याचे क्राईम पी आय सुनील गवळी यांनी सांगितले आहे.

संतोष दिवाडकर

Maval News : Kalyan police arrested a couple who cheated the people of Thane by living in Kamshet