Kalyan : बोडारेंच्या प्रचाराला आल्या Sushama Andhare; पण प्रचार झाला महेश गायकवाडांचा?

Kalyan : शिवसेना उबाठा पक्षाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे ( Sushama Andhare ) यांनी नुकताच कल्याण लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कल्याण डोंबिवलीत विधानसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी प्रचारसभा केल्या. मात्र याच प्रचारसभेत त्यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा कल्याण पूर्व अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्यासाठी चांगलाच पचनी पडला असून एक व्हिडिओ महेश गायकवाड समर्थक प्रचंड शेअर करीत आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपाकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, शिवसेना उबाठा पक्षाचे धनंजय बोडारे आणि अपक्ष उमेदवार महेश गायकवाड हे तिरंगी लढत लढवत आहेत. पोलीस स्थानकातील गोळीबार या मुद्द्यावर कल्याण पूर्वेची निवडणूक सुरू असल्याचे वारंवार समोर येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ आलेल्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कल्याण पूर्वेत सभा घेउन हाच मुद्दा उपस्थित केला. पोलीस स्थानकात गोळीबार करणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच भाजपा उमेदवारी देते का? असा सवाल करीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कल्याण पूर्व महाविकास आघाडी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ सभा घेणाऱ्या अंधारे यांनी गोळीबार मुद्दा उपस्थित करताना अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचेही नाव घेतले. ही क्लिप महेश गायकवाड समर्थकांनी प्रचंड शेअर केली असून सुषमा अंधारे नेमक्या कुणाचा प्रचार करून गेल्या? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. बोडारे यांच्यासाठी घेतलेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी महेश गायकवाड यांचे नाव घेतल्याने प्रचार सभेचे गणित उलटे फिरले असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Kalyan : Sushama Andhare came to campaign for Bodare; But Mahesh Gaikwad campaigned?

काय म्हणाल्या व्हिडिओ पहा
Election Dry Day : निवडणुकीमुळे चार दिवस दारूबंदी

Election Dry Day : भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र देशी दारु नियम, १९७३ चे नियम २६ (१) (क) (१) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.) नियम, १९६९ चे नियम ९ अ (२) (क) (1) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे (छेदणे) नियम, १९६८ चे नियम ५ अ (१) तसेच विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, १९५२ मधील १० (ब) (क) (1) मधील तरतूदीनुसार तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ (1) नुसार सर्व ठोक व किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या (सर्व नमुना एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएल-४ए. एफएल / बीआर-२ एफएलडब्ल्यु-१, नमुना ई. नमुना ई-२, सीएल-३, सीएल / एफएल टीओडी-३, टीडी-१) बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.

जारी करण्यात आलेल्या नियमानुसार १८ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजल्यापासून दारूबंदी सुरू होणार असून २० नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या ४८ तासांत दारूची विक्री झाल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर २३ नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दारूबंदी असणार आहे.

सर्व अबकारी अनुज्ञप्ती धारकांनी या आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्काने केले आहे. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Election Dry Day : Alcohol ban for four days due to election

डोंबिवलीत उडणार धमाल मजा मस्ती! रविवारी भरणार किलबिल फेस्टिव्हल

किलबिल फेस्टिव्हल : डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आतुरतेचा आवडीचा डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल रविवार, दि १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसाठी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ डोंबिवलीत रंगणार आहे.

डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा असतो. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. मौज मजा धमाल मस्तीचा अविस्मरणीय उत्सव त्यात धाडसी खेळांचे साहस रंगत आणतात. केवळ लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बारा वर्षांपूर्वी डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवलची संकल्पना सुरू करण्यात आली होती.

मुलांना चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर यासोबत कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी, वायरची खेळणी स्वतः बनवता येणार आहेत. तसेच बोलक्या बाहुल्या, मोझॅक आर्ट, जम्पिंग मून वॉक, बालनाट्य, जादूचे प्रयोग यासारखे कार्यक्रम ही पाहायला मिळणार आहेत. यंदा थाऊसंड हँड डान्स ग्रुप आणि झिरो डिग्री डान्स, हा अद्भुत नृत्य प्रकार बाळगोपाळांना आकर्षित करणार आहे. जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन असे विविध बहुरूपी छोट्या दोस्तांच्या चेहेऱ्यावर हास्य खुलवतील. तर साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग असे थरारक प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. यंदा दोन सेगवे व्हेइकल्सचा थरारही मुलांना अनुभवायला मिळणार आहे. तांदुळावर नाव कोरणे, मेहंदी तसेच लाखेच्या बांगड्या बनवून मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत आहेत.

Kilbil festival will be held on Sunday in dombivli
डोंबिवलीत कमळच फुलणार म्हणत पुरोहित मंडळींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला जाहिर पाठिंबा

डोंबिवली : आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे म्हणत डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी महायुती उमेदवार रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच “आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल” असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच “पुढील सामाजिक कार्यासाठी जय, यश, बल लाभो” असे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या शुभाशीर्वादांमुळे निवडणूक लढवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ मिळालं अशा प्रांजळ भावना चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमोल विजय कुलकर्णी, संतोष पुराणिक, कोदंडपाणी कुलकर्णी, लक्ष्मण पारेकर, केदार पारेकर, राहुल शुक्ल, महेश जोशी, दिनेश उपासनी, श्री.यज्ञेश जोशी, कपिल भंडारी, सार्थक आराध्ये, श्रीपाद कुलकर्णी आणि श्री कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते.

डोंबिवलीत कमळच फुलणार !

शहरातील रामनगर येथील विविध संस्था आणि सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रामनगर मधील राजस्थान जैन संघ हॉल येथे संपन्न झाली.
या बैठकीमध्ये श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, लोहाणा समाज, यादव समाज, बिलावल असोसिएशन, युवा आशापुरा मंडल इ. संस्था यांचा सहभाग होता. या बैठकीदरम्यान चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला तसेच उपस्थितांनी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सी.ए. जय जैन आणि ॲड. रोहन देसाई या युवकांचा सन्मान करण्यात आला.

सर्व उपस्थितांनी डोंबिवलीत कमळच फुलणार असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. आयोजित बैठकीला माजी नगरसेवक भाई देसाई, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, माजी अध्यक्ष गिरीश साठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहिर देसाई, आशिष मौर्य, सिद्धांत घुले, सुनील वेताळ, स्वानंद भणगे आदी भाजपा पदाधिकारी तसेच किरण राजजी राणावत, प्रमोद ठक्कर, राजबहादूर यादव, लल्लन यादव, तगदराज राणावत, भावेश जैन, प्रदीप जैन, दिलीप कोठारी, सुखलाल जैन, तेजराज जैन आदी प्रमुख संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

The priests gave their support to Minister Ravindra Chavan, saying that only lotus will bloom in Dombivli

Kalyan East : ‘हे’ १७ उमेदवार लढवणार कल्याण पूर्वेची जागा; निवडणूक चिन्हे मिळाली

Kalyan East : १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून जवळपास ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननी व अर्ज माघारी झाल्यानंतर आता १७ उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देखील आज देण्यात आले आहे.

  1. धनंजय बाबुराव बोडारे – शिवसेना उबाठा – मशाल
  2. ऍड.मिलिंद रविंद्र ढगे – बहुजन समाज पार्टी – हत्ती
  3. सुलभा गणपत गायकवाड – भारतीय जनता पार्टी – कमळ
  4. तृणेश अरूण देवळेकर- समता पार्टी – ट्रम्पेट
  5. प्रफुल रघुनाथ नानोटे – राईट टु रिकाॅल पार्टी – प्रेशर कुकर
  6. विशाल विष्णू पावशे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
  7. शालीनी राजेंद्र वाघ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – आटो रिक्षा
  8. शैलेश राममूर्ती तिवारी – प्रहार जनशक्ती पक्ष – बॅट
  9. हरिश्चंद्र दत्तु पाटील – संघर्ष सेना – शिट्टी
  10. त्रिशला मिलिंद कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
  11. कैलाश रमेश लाल चैनानी – अपक्ष – दुरदर्शन
  12. ऍड. धनंजय बप्पासाहेब जोगदंड – अपक्ष – संगणक
  13. प्रविण महेश घोरपडे – अपक्ष – रबर स्टॅम्प
  14. महेश दशरथ गायकवाड – अपक्ष – अंगठी
  15. महेश प्रकाश गायकवाड – अपक्ष – पत्र पेटी
  16. विवेक श्रीकांत पांडे – अपक्ष – सिरिंज
  17. सीताराम अण्णासाहेब गायसमुद्रे – अपक्ष – शिवण यंत्र

वरील १७ उमेदवार उर्वरित १७ दिवस निवडणूकीच्या आखाड्यात आपल्या ताकदीनिशी उतरले असून २० नोव्हेंबर रोजी जनतेचा कौल मिळवणार आहेत. पक्षांची बदललेली राजकीय समीकरणे, मतदारसंघातील परिस्थिती यावर कोणता उमेदवार कल्याण पूर्वेच्या सर्वाधिक मतदारांच्या पसंतीस उतरतो यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी २० नोव्हेंबर पर्यंत आपल्या पारड्याचे वजन वाढविण्यासाठी सर्वच उमेदवार जोर लावणार यात शंकाच नाही.

Kalyan East: ‘These’ 17 candidates will contest the seat of Kalyan East; Election symbols received

लोकसभेत राजू पाटील यांनी केला शिवसेनेचा जोरदार प्रचार; विधानसभेत शिवसेनेने उभा केला पाटलांविरोधात उमेदवार

राजू पाटील : मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्याच राजू पाटलांविरोधात शिवसेनेने अमित ठाकरेंपाठोपाठ आता राजू पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे यांना राजू पाटलांच्या मदतीने भरघोस मतदान झाले होते. मात्र आता मनसे युतीचा भाग नसल्याने शिवसेनेने त्यांच्या उमेदवारा विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मसनेचे आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभेतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा पक्षाचे सुभाष भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना देखील उमेदवारी दिली आहे.

कल्याण ग्रामीणचे शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर हे २०१४-२०१९ या काळात याच मतदारसंघात आमदार होते. मात्र २०१९ साली त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर भोईर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. शिवसेनेने उमेदवार दिल्यामुळे मनसेत मात्र काहीसा संताप व्यक्त केला जात आहे.

Raju Patil campaigned strongly for Shiv Sena in the Lok Sabha

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शेकडो उत्तर भारतीयांचा भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली : शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चव्हाण यांच्याच हस्ते प्रवेश करण्याच्या त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव राज्यभर प्रचारात व्यस्त असलेले मंत्री चव्हाण हे त्या सगळ्यांसाठी आवर्जून उपस्थित राहिले होते.

मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक, सरचिटणीस नंदू परब यांनी दिली. त्यामध्ये प्रमुख अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश, विश्वकर्मा श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा, दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा, अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा, अभिषेक सोनू, अभिषेक सिंह, नवीन शर्मा, विकास प्रजापती, दर्शन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, दत्ता माळेकर, रवीसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर मीतेश पेणकर बाळा पवार उपस्थित होते. नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे यांनी या प्रवेश संदर्भात काही महिने विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी या सगळ्यांचे विशेष कौतुक केले. संघटना मजबुतीसाठी हे महत्वाचे पाउल असून आलेल्या सगळ्यांचे स्वागत असून पक्षात एकदिलाने काम करून शतप्रतिशद भाजप हे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

Hundreds of North Indians join BJP in Dombivli in the presence of Minister Ravindra Chavan

कल्याण पूर्वेत राज ठाकरेंचं दुर्लक्ष? मनसे का देत नाहीये इथे तगडा उमेदवार?

MNS Kalyan East : कल्याण पूर्व मतदारसंघात मनसे कडून उमेदवार दिला जात नाही अशी गरळ नेहमीच ऐकावयास मिळते. याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच नाराजी देखील असते. त्याचबरोबर या भागातील मतदार देखील राज ठाकरेंच्या भूमिकेवर अंतर्गत नाराजी व्यक्त करतात. कल्याण पूर्वेच्या जागेसाठी मनसेचे काही बडे नेतेच समझोता करतात अशाही चर्चा आजवर ऐकायला आल्या आहेत.

२००९ साला पासून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाड हे आमदार आहेत. राज ठाकरेंची प्रचंड ताकद आणि हवा असतानाही त्यांनी २००९ साली कल्याण पूर्वेत मनसेचा उमेदवार का दिला नाही हा प्रश्न आजही अनेकांच्या मनाला लागून आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेला भरघोस मतदान होत असतानाही मनसेने तेव्हा जागा का लढवली नाही असा सवाल आजही उपस्थित केला जातो.

२०१४ साली मनसेकडून मोरेश्वर भोईर हे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत होते. मात्र अचानकपणे हे तिकीट मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांना देण्यात आले. याचा सर्वाधिक फायदा अनपेक्षितपणे अपक्ष व स्थानिक उमेदवार गणपत गायकवाड यांना झाला. मतदारसंघात त्यावेळी अधिक नावलौकिक नसलेल्या नितीन निकम यांना सात हजारहून अधिक मतदान झाले होते. मोरेश्वर भोईर यांना उमेदवारी मिळाली असती तर कदाचित या मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते अशीही चर्चा होती. यानंतर भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकला.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा कल्याण पूर्वेत उमेदवार न देण्याचे ठरवले. यामुळे मनसेला मतदान करणाऱ्या मतदारांना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष सोडून वेगळा उमेदवार अथवा इतर पर्यायाचा विचार करावा लागला होता. आता २०२४ च्या निवडणुकीतही मनसे पक्षातर्फे उमेदवार अजूनही दिला जात नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. कल्याण पूर्वेत मनसे प्रत्येक निवडणुकीत का कमीपणा घेते? असा सवाल आता पुन्हा पडला असून याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का? असाही प्रश्न काही राजकीय जाणकार करीत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यात मतदार दिला जातो मग मनसेची ताकद बऱ्यापैकी असलेल्या राजू पाटलांच्या शेजारील मतदारसंघात उमेदवार का दिला जात नाही? किंवा राजू पाटील कल्याण पूर्वेसाठी मनसेचा सक्षम पर्याय का शोधत नाही? असा सवालही या ठिकाणी उपस्थित केला जातो. तर दुसऱ्या बाजूला कुंपणच खातंय शेताला आणि बुजगावणेही फितूर अशी म्हण देखील या मतदारसंघासाठी बोलण्यात येते.

-संतोष दिवाडकर

Why is Raj Thackeray neglected Kalyan East?

Mahim Vidhansabha : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या सुपूत्रासाठी राज ठाकरेंनी केली होती मदत; आता त्यांच्याच सुपुत्रा विरोधात दोघांनीही दिले उमेदवार

Mahim Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे उमेदवार आता जवळपास निश्चित होऊ लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीसह मनसेने देखील आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मनसेने पहिल्यांदाच अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांना माहीम विधानसभेतुन उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या समोर दोन्ही शिवसेनेने आपआपले उमेदवार दिले आहेत.

मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण मधून निवडणूक लढवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतली होती. मात्र आता राज ठाकरेंच्या सुपुत्रा विरोधातच एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभेत सदा सर्वणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेत अंशतः नाराजी पहायला मिळत आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील वरळीतुन प्रथमच उमेदवारी लढत होते. त्याही वेळेस राज ठाकरेंनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. आता २०२४ विधानसभेला राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे देखील प्रथमच निवडणूक लढत आहेत. राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे राजकारणापलीकडे जाऊन नात्याला महत्त्व दिले त्याची परतफेड करण्याची संधी मात्र उद्धव ठाकरेंनी गमावली. यामुळे मनसे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही शिवसेने विरोधात रोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे.

Mahim Vidhansabha: Raj Thackeray helped for the son of Uddhav Thackeray and Eknath Shinde; Now he has given his candidate against the son of Raj Thackeray

Kalyan Election : उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ठाकरे फडणवीस उद्या कल्याणमध्ये

Kalyan Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. निवडणूक आयोगाने २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिला आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी कल्याण पूर्व महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत महायुतीत रस्सीखेच सुरू असताना भाजप वरिष्ठांनी आपली जागा कायम ठेवत उमेदवारी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. याकरिता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असलयाचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थिती दर्शविण्याची शक्यता यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मनसेने देखील विद्यमान आमदार राजू पाटील यांनाच पुन्हा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या हस्ते राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला. त्याचवेळी राजू पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी स्वतः येत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी कल्याण शहरात दोन दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार असल्याने दोन्ही राजकीय पक्षांत उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Kalyan Election : Thackeray Fadnavis in Kalyan tomorrow to fill the applications of candidates