पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग सहा

टीप :- ज्यांनी या आधीचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि ज्या मुलाला भूत समजून करिश्मा गौरव जंगलात पळतात तो भूत नसून शिकारी असतो. त्यांना शोधायला निघालेल्या माझ्या टीम सोबत तोही सामील होतो. करिश्मा गौरवचा सामना अजगराशी होतो. त्याच अजगराचा सामना लेखकाशी होतो. जंगलात गेलेल्या मुलाच्या शोधात कॅम्पिंग जवळ सर्व बैचेन होतात. जीवन,गणेश आणि काही लोक देखील शोधकार्यात पडतात. इतक्यात कोल्ह्यांचा एक टोळक लेखक आणि त्याच्या समवेत असणार्या लोकांच्या अंगावर येते. आता पुढे वाचा कथेचा शेवटचा टप्पा…..

त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली. पुन्हा एकदा माझ्या कानाजवळून सपकन काही तरी गेल्याचा आवाज झाला. आणि मी पाहिले तर तो कोल्हा जमिनीवर तरफडू लागला होता. नंतर मला समजले की त्या बरक्याचा बाण पुन्हा एकदा माझ्या जवळून गेला. कारण तो आवाज दुसऱ्यांदा कानावर पडला होता. त्याच्या बाणाने थेट कोल्ह्याच्या तोंडाचा वेध घेतला होता. त्यानंतर तो मुलगा आमच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. त्याने पाठीमागे हात नेत एक बाण काढला आणि विजेच्या वेगाने समोर सोडला. एका मागोमाग एक त्याने आणखी दोन कोल्ही उतानी केली. ते पाहून बाकीची पळून गेली. आमच्या समोर तीन कोल्हे मरून पडले होते.”बारक्या तू नसता ना आज आमचं सगळ्यांच कामच झालं असत” अशोक त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.”आज तुमच्या मुळ शिकार झाली. नायतर मी कोटम्याव रातभर बसून एक ससा नेला असता तेवढा.” तो ही खुश झाला. त्याने ते मेलेले कोल्हे एका ठिकाणी ठेवले. आणि आम्ही पुन्हा वनव्याकडे पळ काढला.

“एक मिनिटं सगळ्यांनी वरून व्हा” सखाराम आबाने पोरांना अचानकपणे थांबवले.”काय झालं आबा ?” गणेशने खांद्यावरची बंदूक काढली.”आर माझ्या कडचा बेटरीचा फोकस लय डेंजर. हे बघ काय” त्याने टॉर्च मारली.”आग बाबो… कसल मोठं जनवार आहे ते… हे तर माणूस गिटिन एखादा” एक मुलगा म्हणाला.”केमेरा पण नाही नाहीतर या अजगराचा फोटो व्हिडीओ घेतले असते. फोन पण नाही आणला शीट” जीवन तळमळ करू लागला.”पाव्हन माझा फोन देऊ का ?” गणेशच्या मित्राने विचारले.”अरे पण त्याच्या जवळ कोण जायचं. केमेरा असता तर झूम केलं असत.” जीवन म्हणाला.”चला वरून व्हा पोराव. लवकर बघू तिकड जाऊन” असे म्हणत पुन्हा पळापळ सुरू झाली.

करिश्मा आणि गौरव धावत धावत एका ठिकाणी आले. तिथे वणव्याची फिकीर नव्हती. पण उजेडावर त्यांना सर्व काही दिसत होते. आणि आम्हालाही ते दोघे दिसत होते.”आर दादा ते दोघ सापडले र” बारक्या पळता पळता थांबला.”कुठंय?” घामाने भिजलेले आम्ही धापा टाकत एक सुरात म्हणालो.”ते बघा तिकडं लांब पायथराला शिखराच्या” असे म्हणतात आम्ही वर पाहिले.वर जाणे आता शक्य नव्हते. वर आता एक उंच शिखर दिसत होते. आता वरती जायचं म्हणजे थेट शिखराच्याही वरती असे तो बारक्या म्हणत होता. “गौरव….” अंकुशने आवाज दिला. “दादा वणव्याचा आवाज हाय र… तिथं आवाज पोहोचायचा नाही.” बारक्या असे म्हणाला आणि त्या दिशेने निघाला. आम्ही त्याच्या मागे निघालो.

“देवा खंडोबा रक्षण कर र पोरांचं” खंडू बुवा सारखे भंडारा फुकत होते. “अहो शिंदे मला वाटतंय वणवा लागलाय रानात. दिसतंय का तुम्हाला?” असे म्हणत संदीप सर केम्पिंग पासूनच पाहू लागले. दूरचे पाहण्यासाठी शिंदे सरांनी चष्मा काढला आणि शर्टाला पुसू लागले. तोच पाठीमागून धक्का लागला आणि हातातला चष्मा सटकून तो खाली पडला. तसा त्याच्या काचा फुटल्या. “अहो मॅडम काय हो” शिंदे सर म्हणाले.”अहो अप्पा मी नाही मी इथे आहे” मोरे मॅडम म्हणाल्या.”मग मला धक्का कुणी दिला?” असे म्हणत शिंदे सर मागे वळले.हातात बाटली घेऊन ड्रायव्हर सम्राट डुलत डुलत पाहत होता. “ही ही ही सॉरी हा सर जी. गलती से मेरा पैर फिसला और धक्का लगा” ड्रायव्हर हसत बोलू लागला.शिंदे सरांनी त्याच्या हातातली बाटली खेचली आणि लांब धरणाकडे फेकून दिली.”हराम** तू काय ठरवलंय का मला त्रास द्यायचं” शिंदे सर वैतागले.”आरे बाबा तू जा इथून तुला हात जोडतो मी सम्राट जी” संदीप सरांनी त्याला पुन्हा तिथून जायला सांगितले. शिंदे सरांनी चष्म्याची फ्रेम उचलून खिशात ठेवली.

आता आम्ही देखील गौरव करिश्मा जवळ पोहोचलो होतो. “ए करिश्मा ताई…. ते बघ ते… संतोष,विशाल, संदेश… सगळे आलेत आपल्याला शोधत” गौरवने आम्हाला पाहिले.करिष्माने मान वळवली आणि आम्हाला पाहून ती रडायला लागली. तिला आम्हाला पाहून अश्रू अनावर झाले. दोघेही उठले आणि हळूहळू आमच्या दिशेने यायला लागले आणि आम्ही त्यांच्या. दमलो असल्याने अगदी हळुवारपणे आम्ही चालत होतो. वणव्याचा प्रकाशात सर्व काही दिसत होते. “ए बारक्या इथे हाड हाड का पडलेत रे बघावं तिथं” ऋषीने विचारले.”ओ या भागात कुणी येत नाही किंवा आलं नाही कधी. मी स्वतः पहिल्यांदा येतोय” तो बोलला.”बापरे आपण मग चांगलीच एडव्हेंचर केलंय आज” अंकुश म्हणाला.”आ…. आर दादा… शssss आवाज करू नका…” त्याने आम्हाला थांबवले आणि तो कावरा बावरा होऊन आजूबाजूला पाहू लागला. “ए बाबा काय झालं भुताडकी आहे का इथं?” मी विचारले.”आर दादा आपण शिखरा पाशी आलोय. आणि इथं हडक पण आहेत.” तो मागे पाहून म्हणाला.”म्हणजे?” विशालने विचारले.”म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे” असे म्हणत ऋषी हसायला लागला आणि खिशातील पुडी काढली.”बरोबर बोलला र दादा” बारक्याने ऋषीला सांगितले.”ए काय बरोबरे ? तुला काय म्हणायचंय ते सांग नक्की?” विशालने विचारले.”म्हणजे दादा इथं वाघ आहे” बारक्या दबक्या आवाजात म्हणाला.वाघ म्हणताच आम्हाला परत घाम फुटला. सर्वांना धड धड व्हायला लागली. आम्ही इकडे तिकडे नजर फिरवू लागलो.”म्हणजे आता नसेल ना तो?” विचारता विचारता ऋषीच्या हातातली पुडी निसटून खाली पडली. “आता हाड दिसतायत ना इथं. मग वाघ पण इथंच आहे” बारक्या म्हणाला.आम्ही पुरते घाबरलो. संदेशने दोघांना पटापट येण्याचा इशारा केला. “असू द्या घाबरू नका. आख जंगल हिंडलो. काय झालं का ? बारक्या सोबत आहे ना?” अशोकने धीर दिला.

गौरव आणि करिश्मा आमच्या दिशेने येत होते. आणि वाटेतच त्यांच्या डाव्या बाजूला एक भलेमोठे भगदाड होते. “अय्या हे काय ?” करिष्माने गौरवला ते भगदाड दाखवत विचारले.”काय माहिती ? भुयार बियार असेल” गौरव म्हणाला. “इथे खजिना असेल का रे?” करिश्माने हसतच विचारले.”हो का…. त्या लोकांना बघून लय जोर आला वाटत तुला?” गौरव म्हणला.ते पुढे निघणार तितक्यात आतून आवाज आला.”कसला आवाज हा ?” करिष्माने विचारले.”हा आवाज पहिल्यांदा ऐकलाय. पण हा आवाज ऐकल्या सारखे वाटते. पिक्चर मध्ये” गौरव म्हणाला.”गौऱ्या…. हे भुयार नाही…. ही गुहा आहे..” करिश्मा शांतपणे म्हणाली.”आणि तो आवाज नाही ती डरकाळी होती” गौरव देखील शांतपणेच म्हणाला.दोघेही जोरात ओरडले आणि आमच्या दिशेने पळू लागले.

“आरं ए गणेश खाली आरडाओरडा झाला का र ?” सखाराम आबाने कानोसा घेतला.”आबा आबा पोर दिसतायत पलिकडे” जीवन ओरडला.तसे वरच्या म्हणजेच गुहेच्या बाजूने ते सर्व धावत येऊ लागले. एक मोठी डरकाळी फोडत एक भलामोठा वाघ गुहेतून उडी घेऊन बाहेर आला. बापरे मी टीव्ही आणि राणीच्या बागेत पाहिला त्यानंतर आता पाहिला. एक पट्टेदार वाघ. अतिशय धिप्पाड. लांब लांब मिश्या , भलेमोठे तोंड. आणि तितकाच मोठा त्याचा जबडा व त्यातून दिसणारे सूळया सारखे त्याचे दात. पाहताक्षणी एखादा चक्कर यावा असा तो वाघ. तुम्ही या ठिकाणी मोगली चित्रपटातला शेरखान आठवलात तरी चालेल.

गौरव आणि करिश्मा पुढे पळत होते. त्या वाघाने एकवार नजर टाकली. पंजाने जमिनीवर पाय विखुरले आणि त्यांच्या पाठीमागे तो लागला. पळता पळता करिष्माचा पाय अडखळला आणि ती पडली. गौरव तिला उचलत होता. तोच वाघ त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबला. दोघेही त्या वाघाकडे पाहत होते. त्यांच्यात जेमतेम दहा बारा पावलांचे अंतर उरले होते. वाघाने त्यांच्या कडे पाहत गदागदा मान हलवली आणि आकाशात पाहत डरकाळी फोडली. त्या आवाजाने सारे जंगल दुमदुमले.”ओह माय गोड” अंकुश उद्गारला.इतक्यात बारक्या गुडघ्यावर बसला. तसा आमच्या जीवात जीव आला.”कम ऑन बारक्या” कपाळावरून घाम टिपत संदेश म्हणाला.बारक्याने धनुष्य हातात धरला. आणि एक हात मागे नेत बाण चाचपडला.”बारक्या बाहुबली ची स्टाईल बंद कर आणि सोड बाण” अशोक बोलला.”आर दादा चार बाण होते… संपले” बारक्या पुन्हा उठला.”आरे तीन कोल्हे मारले… चौथा बाण काय केला ?” विशालने विचारले.”अहो दादा पहिलाच बाण तुमच्या बाजूने नाय का गेला?” त्याने माझ्या कडे पाहिले. आता म्हटलं काही खरं नाही. आता काय करावं सुचेना.

वाघाने चार पावले मागे घेतली.”चालला वाटत?” अंकुश हळूच म्हणाला. तितक्यात मला अक्षय कुमारचा डायलॉग आठवला.’शेर जब चार कदम पिछे जाता हे तो वो झपटने के लिये’ असं आठवलं आणि म्हटलं आता संपलं. तितक्यात वाघाने एक उंच झडप घेतली. त्या दोघांनी डोळे मिटले. आम्ही देखील माना वळवल्या. तोच एक जोरात बार झाला. आणि धाडकन वाघ कोसळला. आम्ही माना वर करून पाहिले. समोर पाहतो तर काय ? वाघाच्या मागे काही अंतरावर गणेश उभा आणि त्याच्या खांद्यावर बंदूक. नेम धरून तो तसाच उभा होता. वेळेवर येऊन त्याने आम्हाला वाचवले होते. करिश्मा गौरव दोघेही उठून उभे राहिले.

“आरे तुम्ही काय पागल आहेत का रे ? इथे कशाला आलात ?” जीवन वैतागून म्हणाला.”ओ जीवन शेठ इथं काय बोलू नका. खाली जाऊन बोलू. नक्की काय झालं ते तिथे गेल्यावरच समजेल.” विशालने जीवनला शांत केले. “ठेंक्स गणेश बरे झाले तू इथे आलास वेळेवर. नाहीतर आता आमचं काही खरं नव्हतं.” मी त्याचे आभार मानले.तो मात्र सैरभैर झाला होता.”संतोष चला इथून” त्याने सर्वांना चलायला सांगितले. “तू असा का पाहतोयस ?” मी विचारले.”अरे गोळी लागली पण वाघ कुठे गेला ?” गणेश असं म्हणताच सर्वांची पुन्हा एकदा घाबरकुंडी उडाली. फार काही न बोलता आम्ही तिथून पावलं उचलीत घाईने निघालो. “काय नाय गोळी लागल्यावर पळाला असेल” ऋषी घुटकी गिळत म्हणाला.पुन्हा एकदा माझ्या डोक्यात फिल्मी डायलॉग आला. ‘जखमी शेर और खतरनाक होता हे’ आम्ही सर्व काळजीपूर्वक चालत होतो.

अचानकच वरच्या बाजूने वेगाने वाघाने हल्ला केला आणि त्याने थेट गणेशवर झडप घातली. काही कळायच्या आतच गणेश खाली कोसळला आणि घरंगळत खाली गेला. त्याच्या खांद्यावरची बंदूक देखील निसटून एका बाजूला पडली. त्याच्या डोक्याला थोडा मार लागला व रक्त यायला लागले. वाघाच्या देखील पाठीला गोळी लागल्याने तो ही रक्तबंबाळ झालेला. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. वाघ एक एक पाऊल त्याच्या दिशेने जात होता. तो एक एक पाऊल मागे टाकत होता. वरतून आम्ही सर्वे पाहत होतो. “आर यार दादाने आमचा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात घातला.” करिश्मा रडकुंडीला येत म्हणाली.गौरवने तिचे उद्गार ऐकले आणि त्यानेही खाली उडी घेतली. “गौऱ्या…. ” करिश्मा जोरात ओरडली.गणेशच्या हातातून निसटलेली बंदूक गौरवने उचलली. “ए पोरा बंदूक आन लवकर वर एकच बार आहे त्यात. डबल बारीची आहे ती. घालतो वाघावर. आन इथे” सखाराम आबाने हाक दिली. वरती आम्ही खाली वाघ आणि गणेश आणि मध्यभागी बंदूक घेऊन गौरव उभा असे चित्र होते. सगळं काही वनव्याच्या उजेडावरच सुरू होत आणि दिसत होत.

सखाराम आबा पर्यन्त बंदूक आणून देई पर्यन्त गणेशच्या नरडीचा घोट वाघ घेणार होता. म्हणून गौरवने बंदूक स्वताच्या खांद्यावर ठेवली. “ओ तेरी… हा काय करतोय ?” अंकुश आश्चर्य व्यक्त करीत एक पूल पुढे आला.”याला बंदूक चालवता येते ? हा वाघ मारेल का?” गणेशच्या एका मित्राने आम्हाला विचारले.”याने कधी ऑफिसमध्ये मुंगळा नाही मारला हा वाघ कधी मारणार ?” संदेश हळूच बोलला.”याने दिवाळीत पण बंदूक नाही चालवली” मी असं म्हणताच सखाराम आबा चक्कर येऊन खाली पडले. गणेशची पावलं थांबली. एका झाडाला येऊन गणेश थांबला. आता त्याला मागे जाता येईना. म्हणून त्याने गुडघ्यावर बसून घेतले आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आता आमची दुसरी नजर गौरव वर खिळली. वाघ अगदी गणेशच्या जवळ गेला. गौरवच्या नेम धरणार पण थरकाप उडाल्याने त्याच्या खांद्यावरून बंदूक निसटली आणि खाली पडली. “अरे यार….” जीवनने डोक्याला हात लावला.

“सखाराम आबा खाली जा उठा” चक्कर येऊन पडलेल्या आबाला पोर उठवू लागली. गौरवने पुन्हा बंदूक उचलली. वाघाने गणेशच्या अगदी जवळ आला. त्याने गणेशचा वास घेतला. आणि जिभेने त्याच्या डोक्यावरचे रक्त चाटले. आणि तसाच तो मागे फिरला. पण आठ दहा पावले मागे वळताच गणेशने डोळे उघडले. मागे आलेला वाघ पुन्हा त्याच्या दिशेने धावला. एक उंच झेप त्याने घेतली. आणि डरकाळी फोडत गणेशच्या अंगावर झेपावू लागला. गणेशने डोळे पुन्हा मिटले आणि हात वर केले. इकडे मी जोरात ओरडलो.”गौरव किल….”किल शब्द ऐकताच गौरवने बंदुकीचा चाप ओढला. गोळी बंदुकीच्या नळीतून बाहेर पडली. काही कळण्याच्या आतच गोळी वाघाच्या डोक्यात शिरली. गोळी लागताच वाघ खाली कोसळला. आणि गतप्राण झाला.

“येह…. फट्टासा हेडशोट” असे म्हणत गौरव जोरात ओरडला. आम्ही सगळे काहीवेळ पाहतच राहिलो. गणेश देखील एक वेळ वाघाकडे, एकवेळ गौरवकडे आणि आमच्याकडे पाहू लागला. आम्ही सर्वांनी धपाधप खाली उड्या घेतल्या. गणेशच्या मित्रांनी गौरवला उचलून घेतले आणि नाचायला लागले. मी त्याच्या डोक्यावर जोरजोरात कुरवाळून शाबासकी दिली. आम्ही क्रिकेट मॅच सारखं सेलिब्रेशन करू लागलो. सखाराम आबा शुद्धीवर आले आणि त्यांना काय झाले कळेनाच. ते पुन्हा बेशुद्ध झाले. “आरे तू होळीला बंदूक वापरीत नाय. आन तुला कस जमलं हे ?” जीवन हसतच गौरवला विचारू लागला. “हा रे कसं काय ? ते पण डायरेक्ट डोक्यात हेडशोट ?” अंकुशने ही विचारले.

“भाई पबजी…. ” गौरव उद्गारला.”पबजी ??” विशालने विचारले.”पब्जीचा अनुभव कामी आला. संतोष किल म्हणाला आणि पब्जी समजून मी नेम धरला. किल….” गौरव म्हणाला.आम्ही सगळे हसायला लागलो. त्यानंतर आम्ही सर्वे उठलो आणि केम्पिंग कडे निघालो. रात्रभर काय झालं हे सगळं आम्ही केम्पिंग कडे येऊन कथन करीत होतो. आमची चित्तथरारक गोष्ट ऐकून सगळे भारावून गेले होते. जो तो आपला आपला किस्सा सांगत होता. की त्यांनी काय काय पाहिलं. जो ससा पाहून गौरव करिश्मा रानात गेले तो बारक्याच्या फासात अडकला होता. आणि बारक्याला घाबरूनच पुढे जे घडले ते घडले. बारक्याने गौरव आणि करिश्माला तो ससा दिला. आणि रान डुक्कर घेऊन तो त्याच्या घरी गेला. सकाळ होत आली. आम्हाला रात्रभर झोप नसल्याने आम्ही दमलो होतो. पण आता झोपलो तर केम्पिंग ची मजा येणार नव्हती. तरी गणेश म्हणाला तीन चार तास झोपा आपण करूच मजा. आणि आम्हाला रूम मध्ये बिछाना घालून दिला.

शिंदे सर टॉयलेट कडे गेले. पण पाहता तर आमचा ड्रायव्हर त्या संडासात पिऊन आडवा झालेला.”आरे बाबा तू काय माझी पाठ धरलीस ? चल उठ हो बाहेर” शिंदे सर जोरजोरात आरडाओरडा करू लागले. पुन्हा संदीप सर हसत हसत तिथे गेले आणि त्यांनी ड्रायव्हरला तिथून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी आम्ही केम्पिंग मध्ये खूप धमाल केली. पण खरं सांगतो खरं एडव्हेंचर ना रात्रीच आजमावल होत. अगदी जीवावर बेतणार एडव्हेंचर. जे आमच्या या आठवणीत कायम बसणार होत.धन्यवाद !

टीप :- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा कसलाही संबंध नाही. कथेतील काही पात्र ही लेखकाच्या परिचयाची असून इतर पात्रे तयार करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या दृष्टीने लिहलेली ही कथा काल्पनिक असल्याने कोणत्याही वन्य प्राण्यांची हिंसा होणे देखील काल्पनिकच आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणे कायद्याने गुन्हा असून आम्ही त्याचे समर्थन करीत नाही. याउलट प्राणी मित्र म्हणून आम्ही निसर्गाचे ऋणी आहोत. त्याचबरोबर २०२० ची हि शेवटची कथामालिका देखील इथेच संपत आहे. भेटूयात नव्या वर्षात नव्या उमेदीत आणि काही नव्या कथा व संकल्पनासह. तो पर्यंत धन्यवाद !!!!

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग पाच

टीप :- ज्यांनी सुरुवातीचे चार भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि करिश्मा आणि गौरव एका सश्याच्या पाठीमागे जाऊन जंगलात हरवतात. तिथे त्यांना एक दहा वर्षाचा लहान मुलगा दिसतो. ज्याला घाबरून ते जंगलात आणखी आत शिरतात. शेकोटी जवळ बसलेले त्यांच्या शोधात निघतात. कॅम्पिंग जवळ सर्वजण गायब झाल्याने सिनियर मंडळी चिंताग्रस्त होतात. आता पुढे….

सर्वांच्या मोबाईलचे टॉर्च सुरू होते. सगळ्यांना घेऊन मी वाट काढीत जंगलातून वरच्या बाजूला निघत होतो. आणि सपकन काहीतरी माझ्या कानाच्या बाजूने गेल्याचे जाणवले. “ए कोणे ? काये?” मी ओरडलो.तसे सगळे काय झालं म्हणून पाहू लागले.तितक्यात आम्हाला समोरून कोणी तरी येत असल्याचे जाणवले. अचानक समोर प्रकाश पेटला. तो प्रकाश एखाद्या जुन्या कंदिलाचा असावा. आणि एक दहा वर्षांचा मुलगा आमच्या दिशेने येऊ लागला. लांब सडक केस, कधीही न धुतलेले, उघडा बंब, मळकी चड्डी. तो आमच्या जवळ आला. “कोण रं तुम्ही ?” त्याने विचारले.”तू कोण आहेस ?” मी विचारले.”थोडक्यात वाचला रं दादा तू. आता माझा बाण लागला असता तुम्हाला. मला वाटलं जनावर आलं म्हणून मी सोडला बाण” तो त्यांच्या कातकरी ट्यून मध्ये म्हणाला.त्यावरून मी ओळखले हा एखादया कातकऱ्याचा मुलगा आहे आणि तो शिकारीला आला आहे. “शिकारीला आलाय का ?” मी विचारले.”शिकारीला आलोय पण काय भेटना आज. फासात तेव्हढा एक ससा गुतलाय. पण मोठं जनावर काय मिळत नाय आज” असे तो म्हणाला.”ए बारक्या इथे कुणी आलं होतं का रे ? म्हणजे एखादा माणूस आणि पोरगा पोरगी ?” अशोकने विचारले.”माणूस नाय ओ माहिती. पण पोरगा पोरगी आलथ इथं” तो म्हणाला”कुठं गेले ते?” संदेशने पटकन विचारले.”अहो इथं माझा फास होता म्हणून काय अडकल बघाय आलो तर मला एक पोरगा नी पोरगी दिसले” तो म्हणाला.”मग कुठे गेले ते ?” ऋषीने विचारले.”मी त्यांच्या जवळ जात होतो तर मला घाबरून इकड वरल्या बाजूला पळाले दोघे” तो म्हणाला.”अरे बारक्या तू दिसतोस असा भुता सारखा. तू आवाज देऊन थांबवायचं ना” विशाल म्हणाला.”आवाज ? आवाज दिला तर जनावर पळून जाईल की” तो म्हणू लागला.”एक काम कर आम्हाला दाखव ते कुठे गेले” स्वप्नील म्हणाला.”अहो हे इथून वर निघा या जाळकांडातुन वाकून पुढं निघा” त्याने बोट दाखवले.”तू चल ना बारक्या आम्हाला नाही ना माहिती” अशोक म्हणाला.”मी कशाला ? इथं जनावर येत. पाण्याचा कोटमा आहे इथं. इथंच असतो मी” तो काही येईना. “अरे चल ना बाळा. आम्हाला काही माहीत नाही रे. तुला पैसे देतो.” प्रसादने खिशातून दहाच्या नोटा काढल्या.”बर चला. माझा कंदील घ्या इकडे.” तो म्हणाला.ऋषीने त्याचा कंदील धरला तसे आम्ही त्याचा मागोमाग जंगलात वरच्या बाजूला निघालो.

“हे मोठं इपरित झालं म्हणायचं” खंडू बुवा म्हणाले.”तुमच्या मालकाला बोलवून घ्या” संदीप सर म्हणाले.”अहो तो मालक गावात राहतो. आणि गाव इथून काय जवळ नाय. एक काम करा तुम्ही तुमची गाडी काढा. आपण मालकाला आणू” खंडू बुवा म्हणाले.तसा जीवन गाडीकडे बघून आला.”अहो सर तो ड्रायव्हर गाडीत नाहीये. त्याला पण नेला वाटत अशोकने” जीवन म्हणाला.”कशाला आणला असला माणूस. ” शिंदे सर वैतागले.”आयला हि काय फालतूगिरीये ? ओ शिंदे सर बघुयात का आपण जाऊन ?” संदीप सर म्हणाले.”नाय नाय तसं करू नका. तुम्हाला माहिती नाय. आणि पोरं पण जाणकार नाय. ती १००% चुकणार आत. कारण जाणकार जरी गेला तरी तो आत गेल्याव सैरभैर होतो. वाट घवत नाय. थांबा आपण सखाराम आबा ला आणू त्याच घर हितून जवळे. ते पक्क हुशारे. रानातलं सगळं माहितीये त्याला.” असे म्हणत खंडू बुवा आत गेले आणि भंडारा घेऊन बाहेर आले. त्यांनी सर्वांच्या माथी भंडारा फासला. “देवा खंडोबा रक्षण कर र बाळ गोपाळाच” असे म्हणत थोडासा भंडारा जंगलाच्या दिशेने फुकुन दिला.

“गौरव मला वाटत आपण इथे दगडाच्या पाठी जरा सेफ आहोत.” असे करिश्मा म्हणते ना म्हणते तेच तिच्या हाताला कसलासा स्पर्श झाला. तिने हात मागे घेतला. “गौरव ? काय झालं?” तिने विचारले.”काही नाही ताई. मलाही वाटत आपण इथे सेफ आहोत. एक काम करू का ? मी ना इथे आग लावतो म्हणजे प्राणी येणार नाहीत” गौरव म्हणाला.दगडाला बिलगलेल्या करिश्माच्या मानेला पुन्हा स्पर्श झाला.”गौरव तू काय करतोयस ?” तिने थोडे रागात विचारले.”अग मी मघाशी बार्बेक्यू पेटवले ना तर माचीस खिशात राहील होत. थांब मी इथे गवत पेटवतो. म्हणजे इशारा मिळेल जो आपल्याला शोधेल त्याला.” उभे राहत गौरव म्हणाला.”गौरव तू तिकडे आहेस ? मग इथे माझ्या बाजूला कोण आहे?” असे म्हणत करिश्मा धावपळ करीत उठली. आणि त्याच्या सोबत उभी राहिली.”काय झालं दीदी आता?” गौरव म्हणाला.”अरे मला वाटलं की तुझा हात मला लागतोय पण तू तर इथे आहेस. तिथे अंधारात कोण आहे बघ बर. ते मघासच पोरग तर नसेल ?” करिश्मा म्हणाली.”अरे पण इथे मला तू दिसत नाहीस. आपण कुठे बसलो तेही दिसत नाहीये.” गौरव म्हणाला.”अरे हे काय इथे समोरच दोन पावलांवर बसलेलो आपण. तू ते माचीस पेटव आणि त्याच्या उजेडावर बघ” करिश्मा म्हणाली.”हा हा थांब” असे म्हणत गौरव ने माचीस पेटवले. आणि जवळ नेले. काहीतरी दिसले आणि तितक्यात माचीस विझले.”गौरव काय आहे तिथे?” करिश्मा घाबरून म्हणाली.”थांब यार काय नीट दिसले नाही.” गौरव म्हणाला.त्याने दुसरी काडी पेटवली. तसा उजेड पसरला. आणि त्या उजेडात त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. दोघेही थरथर कपू लागले. ते दोघे बसलेल्या ठिकाणी एक भले मोठे अजगर बिळातून बाहेर येऊन बसले होते. एनाकोंडा पिक्चर मध्ये असावं अगदी त्यापेक्षा थोडं लहान. पुढ्यात असलेलं अक्राळ विक्राळ अजगर पाहून करिश्माला चक्कर येऊ लागली. दोघे पुन्हा एकदा धावायला लागले. गौरव अंधारातून वाट काढू लागला.

इकडे आम्ही आम्ही चालत चालत एका ठिकाणी आलो. बारक्या क्षणभर थांबला.”आर दादा…. इकड आण जरा कंदील. इथं रान डुक्कर हाय. कुणी मारलं असेल याला ? अर्ध खाल्लं आहे र. बिबट्याने खाल्लं असणार” असे म्हणत तो ते डुक्कर गोणीत भरू लागला.”काय बिबट्या ? पण तुझा केम्पिंगवाला मित्र तर म्हणाला इथं बिबट्या नसतो” संदेशने मला विचारले.”आरं दादा… रानात आलाय तुम्ही. इथे असणारच ना.” तो मुलगा म्हणाला.”ए बारक्या ते जाऊदे आता. ते दोघे कुठे आहेत ते बघू.” अशोक म्हणाला.” थांबा जरा मी गोणी झाडावर ठेवून येतो. मंग घरी जाताना नेता येईल.” तो सरसर झाडावर गेला आणि गोणी ठेवून आला. आणि आम्ही पुढे जायला निघालो.थोडं पुढे आल्यावर आम्हाला मोबाईलचा टॉर्च दिसला.”विशाल अरे मोबाईलचा टॉर्च दिसतोय.” ऋषी म्हणाला. आम्ही त्या उजेडाचा दिशेने निघालो.

इकडे शिंदे सर, जीवन आणि खंडू बुवा सखाराम आबा च्या घरी आले. सखाराम आबाने त्यांच्या नातवाला गाडीवर गणेशला बोलवायला पाठवले. मदतीला चार माणसं मागितली. आणि ते सर्वे वेताळबुवा च्या झाडा जवळ जमले.

“गौरव माझं ऐक. मला त्या एनकोंडा जवळ सोड. मला नाही जमणार आता पळायला. एकदाच काय ते होऊन जाऊ दे ना” करिश्मा रडायला लागली.गौरव देखील घाबरला होता.”ताई एक मिनिटं मी काही तरी करतो.” असे म्हणत त्याने माचीसची काडी ओढली आणि गवतात टाकली. एकच भडका उडाला. सरसर गवताने पेट घेतला. हवेमुळे आग पांगु लागली.

“अरे हा तर गौरवचा फोन आहे” अंकुशने खाली पडलेला फोन उचलला.”आता कुठे गेले असतील ?” अंकुश पुन्हा म्हणाला.”दादा मला वाटत शिकार झाली तव्हा ते इथच होते. म्हणजे ते इथून पळाले असतील. आणि घाबरून फोन पडला असेल.” तो बारक्या सांगू लागला.”तुला काय वाटत कुठे जातील तिथे चल” विशाल म्हणाला.”या माग माग” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे निघालो.

खंडू आबा, मोरे मेम आणि श्वेता केम्पिंगच्या ठिकाणी काळजी करीत बसले होते.”बाई असं कशाला करायचं यांनी. नसतो आलं ते परवडले असते” मोरे मॅडम म्हणाल्या.”ओ बाबा सापडतील ना ते” श्वेताने विचारले.”हो… मालक आले वाटत बघा. तिकड फटफटीचा आवाज आला. आता घवतील पोर” खंडू बुवा म्हणाले.”काय झालं सर संतोष पण गेलाय का आत रानात ?” बाईकवरून उतरून झाडाखाली थांबलेल्या सरांना गणेशने विचारले.”हो ना… काय मूर्खपणा करताय काय माहीत. एकतर कुणाला काही माहिती नाही.” संदीप सर म्हणाले.पाठीमागून चार पाच टू व्हीलर आल्या. गणेश आठ-दहा पोर मदतीला घेऊन आला.”सर तुम्ही केम्पिंग पाशी थांबा. आम्ही बघतो.” असे म्हणत गणेश, सखाराम आबा आणि त्याचे काही मित्र रानात शिरले. “थांबा मी पण येतो जोडीला” असे म्हणत जीवन देखील त्यांच्या सोबत निघाला.

गौरवने लावलेली आग आता पूर्ण वाढली होती. आगीच्या भीतीने आसपासचे हिंसक प्राणी दूर पळाले होते. पण आता त्याच आगीत ते दोघेही अडकले होते. आगीच्या उजेडाने ते दूरपर्यंत पाहू शकत होते. आणि उजेडात वाट शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

“आर ह्या काय ? आग लागली का काय ?” संदेशने आगीचा लोट पहिला.”आग लागली नाय र लावली आसल.” बारक्या वेगाने चालू लागला.”कुणी लावली?” अंकुशने विचारले.”तुमच्या मित्रांनी लावली असल. अशी लागत नाही आग. आणि दुसरं कोण येत नाय र इथं. तेच असतील” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे चालत सुटलो.

जीवन, गणेश आणि त्याचे मित्र पाठीमागून वेगाने डोंगर चढत होते. काट्या कुट्यातून ते वाट काढीत होते.”आबा कुढ गेली असतील पोर ?” गणेशने विचारले.”आर हित जाळी मोडली आहे. वरच्या भागातच असतील. सायरीच्या रानात” असे म्हणत ते ही वाट काढू लागले. गणेशच्या खांद्यावर चापाची बंदूक लोड केलेली होती. अचानक होणाऱ्या कुठल्याही हल्ल्या पासून बचाव करण्यासाठी.

गौरव आणि करिश्मा आगीच्या विळख्यातुन स्वतःची सुटका करतात. दोघेही धुराने काळे झालेले असतात. परंतु ते जीव वाचवून पळत असतात. कारण वणवाही त्यांच्या पाठीमागे वेगाने येत असतो. जर हालचाल केली नाहीतर वणवा त्यांना गाठू शकत होता. नाविलाजाने त्यांनी आणखीन वरच्या बाजूला प्रवास सुरु केला. पाठीमागून येणाऱ्या वनव्याच्या उजेडावर ते पुढचे आणि पाया खालचे सर्व काही पाहू शकत होते.आम्ही देखील आता वनव्याच्या दिशेने पळत होतो. आणि तितक्यात माझा पाय अडखळला आणि मी तोंडावर आपटलो. पण तोंड वाचवण्यासाठी हात मध्ये आणला म्हणून माझ्या हाताला खरचटले. इतक्यात माझ्या पायाला कायतरी पटकन लपेटल्या सारखे झाले. हातातून निसलेला मोबाईल मी उचलला आणि पाहिले तर एका अक्राळ विक्राळ अजगराने माझ्या पायाला विळखा मारला होता.मी बोंबाबोंब सुरू केली. तसे ते पळणारे सर्व थांबले आणि मागे फिरले. अशोक माझ्या जवळ आला आणि तितकाच दूर गेला.भला मोठा अजगर पाहून कुणाचीच पाचावर धार राहिली नव्हती. त्या बारक्या मुलाने पटकन झडप दिली आणि अजगराचे मुंडके धरले.”आर बघू नका साप व्हडा. मी तोंड धरलय.” तो पोरगा ओरडू लागला.सगळे घाबरत होते. तरीही स्वप्नील, संदेश, अंकुश आणि ऋषीने जोर लावला. प्रसाद, अशोक आणि विशालची हिंमत होईना. पण बराच वेळ सुरू असलेली झटापट पाहुन त्या दोघानीही जोर लावला. काही वेळातच अजगर थकला आणि शांत झाला. तसा विळखा सैल झाला आणि मी माझा पाय खेचला.आवळला गेल्याने पायाला मुंग्या आल्या होत्या. “थांबा सोडू नका… मी सांगतो तव्हर.” त्याने सांगितले.तो एका बाजूला आला आणि त्याने एक इशारा केला तसे सर्वांनी अजगराला सोडले. अजगर देखील हळुवारपणे खालच्या बाजूला निघून गेला. मी देखील कसाबसा उभा राहिलो. आणि पुन्हा शोधमोहीम सुरू केली.

“त्या आईच्या गावात ? गण्या ए आरे हिकडं बघ रक्तये कुणाचं तरी?” त्याच्या मित्राने रक्त दाखवले.जीवन आणि गणेश सर्वच धावू लागले.”आर थांबा भ्येता कायला ? जनावरच दिसतंय. शिकार फिकार झाली आताच” सखाराम आबा म्हणाले.”आग बाबो… कसला र वणवा लागलाय. सायरीच्या रानाला?” एकाने वनव्याकडे लक्ष वळवले.”म्हणजे हे सर्व तिकडे आहेत” गणेश जीवन कडे पाहत म्हणाला.”तुम्हाला कस माहिती गणेशजी” जीवन ने विचारले.”जीवन जी हा वणवा अचानक लागू शकत नाही कुनी लावल्या शिवाय. हे सर्व तिकडेच आसपास असणार चला” गणेश म्हणाला आणि सर्व तिकडे चालू लागले.”त्याआयला पोर हिकडं काय रान पेटवून द्यायला आलीत का काय ?” सखाराम आबा देखील पळता पळता बोलू लागले.

त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. आणि तितक्यात पापणी मिटायच्या आतच एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली.

क्रमशः

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग चार

टीप :- ज्यांनी सुरुवातीचे तीन भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि कशाप्रकारे सर्व टीम कॅम्पिंग नाईट एन्जोय करते. सगळे झोपल्यानंतर शेकोटी करता करता करिश्मा गौरवला घेऊन वेताळबुवाच्या झाडाकडे जाते. पुढे काय होते ते तुम्हीच वाचा.————————————————–

इतक्यात झाडी मध्ये वरच्या बाजूला कसलासा आवाज झाला. दोघांनी पटकन टॉर्च तिकडे फिरवला.”ए गौऱ्या ससा आहे ना तो?” करिश्मा कुतुहुलाने बोलली.”दीदी ससाच आहे. पकडायचा का ? मी एकदा पकडला होता माझ्या गावी कोकणात” गौरव देखील पटकन म्हणाला.”हम्म बघ बरं..” करिश्माने त्याला पुढे ढकलत मानेने खुणावले.हळुवार पावलं टाकीत गौरव सशाच्या मागे जाऊ लागला. गौरव पुढे येताच ससा दोन पावले पुढे जायचा. असे करत करत गौरव आणि करिश्मा हळूहळू आत जंगलात शिरू लागले. त्यांचे लक्ष फक्त सश्यावरच होते. आपण त्याच्या नादात कुठ चाललोय याचं त्यांना भान न्हवत. आणि बरंच अंतर कापून पुढे आल्या नंतर गौरवने सश्यावर झडप मारली. सश्याने पटकन एका झाडीत उडी घेतली. गौरवने पुन्हा त्याच्या दिशेने टॉर्च मारली तर त्याच झाडीतून एक भेकर (हरणा सारखा प्राणी) उड्या मारीत लांब निघून गेले. आणि ससा मात्र कुठेही दिसेनासा झाला.

“वाव हरीण ??” करिष्मा ओरडली.गौरव मात्र कावराबावरा झालता.”ताई पण ससा ?” त्याने मागे वळून विचारले.”कुठे आहे तो ?” करिश्माने विचारले.”त्याने जिथे उडी मारली तिथून हा हरण आला” गौरव म्हणाला.”म्हणजे ? तुला काय म्हणायचंय ?” करिश्माने गंभीरपणे विचारले.”काही नाही चल परत जाऊ” गौरव म्हणाला.त्यानंतर ते दोघे माघारी जाण्यासाठी वळले.काही वेळ ते इकडे तिकडे टोर्च मारू लागले.”अरे पण जायचं कुठून ? इथून तर बाहेरच काहीच दिसत नाही. आणि आलोय कुठं ते पण माहीत नाही.” करिश्मा मागे टॉर्च फिरवत म्हणाली.”ए संतोषsssss. संदेशssss” गौरव आवाज देऊ लागला.”गौऱ्या मला वाटत आवाज जाणार नाही. आपण इथून मागून खाली खाली निघत जाऊ. धरण तर दिसणार नाही पण लाईट जरी दिसली ना तरी आपण बाहेर पडू.” करिश्मा म्हणाली. ते दोघेही चाचपडत चाचपडत वाट शोधू लागले. पण नेमकं कोणत्या दिशेला निघावं हे काही त्यांना कळेना. काट्या कुट्यातून ते वाट काढू लागले. “आह….” करिश्मा ओरडली.”काय झालं ताई ?” गौरवने विचारल.”काटा लागला वाटत” करिश्माने चपलीतला काटा काढला.इतक्यात झाडाच्या फांद्या गदागदा हलायला लागल्या. दोघेही वर पाहायला लागले.”कोणे ?” गौरवने विचारले.इतक्यात त्यांना पावलांचा आवाज कानावर पडला.

“एक मिनिटं… कोणीतरी इकडे येतंय वाटत” करिश्मा म्हणाली.”कोण असेल बरं ?” गौरवने विचारले.”शिंदे सर…. संदीप सर….” करिश्मा आवाजाच्या दिशेने पाहत म्हणू लागली.”संतोष…. संदेश….” गौरव देखील हाक मारू लागला.आणि अचानकच दोघांना अंधारात कसलीशी हालचाल दिसली. दोघांनी अंधारात नीट न्याहाळून पाहिले. त्यांच्या नजरेस काहीतरी पडत होते. काळीकुट्ट सावली त्यांच्या जवळ येतेय अस त्यांना भासल. अचानकपणे तिथे एक लक्ख प्रकाश पेटला आणि त्या प्रकाशात त्यांना आठ दहा वर्षांचा एक लहानसा मुलगा दिसला. त्याला पाहताच दोघांना घाम फुटला.”ए कोण आहेस तू ?” करिश्माने घाबरत विचारले.अंधारात तो एक एक पाऊल पुढे टाकीत त्यांच्या जवळ येऊ लागला.तसे ते दोघेही जोरात किंचाळले आणि वाट मिळेल तिथे पळत सुटले.

“हा हा हा हा…. शिंदे सरांनी कसली खेचली त्या ड्रायव्हरच्या कानाखाली” विशाल हसत हसत सांगत होता.”भाई करिश्मा पण म्हणत होती आता याला एक कानाखाली टेकवतेच. पण आधीच त्याला शिंदे सरांनी दिली ठेवून” संदेश म्हणाला.”अरे करिश्मा आणि गौरव अजून आले नाहीत” मी आठवण केली.तसे सर्व शांत झाले. आणि एकमेकांकडे पाहू लागले. आम्ही सर्व एकसाथ उभे राहिलो आणि ते दोघे गेले त्या दिशेला पाहू लागलो. मोबाईलचा कसलाही उजेड दिसत नव्हता. “भेंडी बोलायचा नादात लक्षात पण नाही आलं” ऋषी बोलला.”एक काम कर ना ते तंबूत आले का बघून ये बर… इथून मागच्या बाजूने गेले असेल तर” अशोक म्हणाला.”संदेश चल बर” मी आणि संदेश पाहून आलो.”अरे ते नाहीये तिथे… आणि गौरव पण नाही आला” संदेश म्हणाला.”अरे अशोक तुझा ड्रायव्हर पण गाडीत नाहीये” ऋषी गाडी कडे बघून आला.”च्यायला काय भानगड आहे ?” विशाल म्हणाला.”आज अमावस्या आहे. तरी तो म्हणत होता बाहेर नका पडू” मी म्हणालो.”अरे संतोष काय राव तू पण बोलतो. कशाची रे अमावस्या. चला इथं नका बोलू. कुणाला काही बोलू नका सर ओरडतील. आपणच जाऊन बघू” असे म्हणत आम्ही त्या वेताळ झाडा कडे निघालो. “मघाशी करिश्मा त्या ड्रायव्हरवर हसली ना रे. म्हणून मला जरा भीती वाटते” स्वप्नील म्हणाला.”त्याने जर शहाणपणा केला ना त्याला लय महागात जाईल” विशाल म्हणाला. आम्ही पटापट पुढे जाऊ लागलो.

करिश्मा आणि गौरव अंधारातच कुठेही पळत सुटले. आणि एका मोठ्या झाडाखाली येऊन थांबले. “गौऱ्या कोण होता तो ?” करिश्मा घामाने थबथबली होती आणि धापा टाकत होती.”मला कस माहिती… मला तर आता वेगळंच वाटू लागलय. इथे रेंज पण नाही. कुणाला कस बोलवायचं” गौरव पण घाबरला.”गौऱ्या 2 वाजलेत. आपल्याला कुणी बघायला का आलं नाही?” करिश्मा म्हणू लागली.”अरे आपण कुठे आलो आपल्यालाच माहीत नाही” असे गौरव म्हणाला.तोच पाठीमागून पुन्हा पाचोळ्याचा आवाज झाला. पाहतात तर काय एक रान डुक्कर त्यांच्या दिशेने येताना दिसला. त्या दोघांनी एकमेकांना पकडले. गौरव त्याच्या कडे डोळे फाडून पाहत होता. तो त्यांच्यावर हल्ला करणार म्हणून दोघांनी जमिनीवर बसून घेतलं. डुक्कर त्यांच्या दिशेने येण्या पूर्वी अचानकपणे झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुसंडी मारली आणि हवेत झेपावून थेट डुकराची मान धरली आणि त्याला लोळवले. धुराळा उडाला आणि करिश्मा गौरव तिथून जोरात पळू लागले. दोघेही ओरडत ओरडत निघाले.

“हेच ना रे ते वेताळ झाड ?” अशोकने मला विचारले.”आर बाबा ह्या काय ? यांनी अंडी फोडली इथ आणि हे गेले कुठं ?” संदेश इकडे तिकडे पाहू लागला.”साहेब हे जंगलात तर नसतील ना गेले ?” विशालने मला विचारले.”नाही असं का करतील ते ?” मी म्हणालो.”अशोक तुझ्या त्या ड्रायव्हरला बघ यार. मला तर त्याच्यावर डाऊट येतो आता फुल. सरांनी त्याला मारलं त्याचा राग काढायचा असेल तर तो काही करेल.” ऋषी बोलला.”हा यार अशोक पहिले त्या भडव्याला बघ” विशाल म्हणाला.”अरे इथं रेंज नाय फोनला. कुठे बघू ?” अशोक म्हणाला.”संतोष सर मला वाटत आपण इथे थोडं आत रानात शिरून आवाज द्यावा. काही समजलं तर इथेच समजेल. मला नाही वाटत ते दुसरीकडे कुठे जाऊ शकतात” प्रसाद मला म्हणाला.”करिश्मा….. गौरव….” संदेश आवाज देत होता.आम्ही देखील त्यांना शोधायला आत घुसलो.

दोघेही घनदाट झाडीतून वाट काढीत होते. आणि याच धावपळीत गौरवचा फोन देखील एका ठिकाणी पडला. बिबट्याच्या भीतीने तो न उचलता अंधारातच ते वाट काढत पळत सुटले.”गौऱ्या टॉर्च ?” करिश्मा म्हणाली.”आग ताई फोन पडला मधी” गौरव म्हणाला. “आरे आता अंधारात कसं काय जायचं ? मला तर तू पण दिसत नाहीस” करिश्मा घाबरत म्हणाली.”मी बाजूलाच आहे.” गौरव हात लावून म्हणाला.पळून पळून दोघेही घामाघूम झाले होते. दोघांना धाप लागली होती. बिबट्या मुळे दोघेही थरथर कापत होते. करिश्मा एका ठिकाणी खाली बसली.”गौऱ्या…. पाणी पाहिजे आता. नाहीतर मला चक्कर येईल” असे म्हणत डोळे मिटून ती खाली पडली.तसा गौरव खाली बसला.”आग ए ताई… अस नको करुस… चल उठ काय तरी रस्ता सापडेल. इथून चल बिबट्या यायचा इथं” गौरव तिला उठवत होता.

“च्या मारी ? जंगला कडे टॉर्च कुणाचे ?” बाथरूम साठी उठलेल्या जीवनने पाहिले. त्यानंतर त्याने सर्व तंबू पाहिले. त्याला कुणीच दिसले नाही. म्हणून त्याने थेट संदीप सर आणि शिंदे सरांना उठवले.”अहो सर ही पोर वाटत जंगला कडे गेली. मला मोबाईल टॉर्च दिसले. मी आता लगवीला उठलो तेव्हा” जीवन म्हणाला.”काय बोलता ? पोर इथं नाहीत?” संदीप सर पाहू लागले.”म्हणून मला वाटत होतं यांना आधी झोपून द्यायला पाहिजे होत. तो दिवाडकर घेऊन गेला असेल यांना” शिंदे सर वैतागले.बाहेर चाललेल्या आवाजामुळे मोरे मॅडम आणि श्वेता देखील बाहेर आले.”काय झालं आप्पा ? काही प्रॉब्लेम ?”मोरे मॅडमने विचारले.”काय नाय मॅडम ही पोर कशाला रानात गेली काय माहिती?” जीवन म्हणाला.”आग श्वेता…. करिश्मा कुठंय ?” संदीप सरांनी श्वेताला विचारले.”काय माहीत असेल तिच्या टेंट मध्ये” श्वेता म्हणाली.”काय माहीत काय ? जाऊन बघ पहिले” संदीप सर ओरडले.”ओ सर ती नाहीये आत” श्वेताने सांगितले.”आईचा घो… गेले कुठे हे सगळे ?” शिंदे सर टेन्शन मध्ये आले.”गौरव पण गेलाय वाटत. आता येऊ दे त्याला असा फोडतो ना. लय झाली त्याची नाटक. लहान भाऊ म्हणून जास्त शेफरलाय” संदीप सर वैतागले.”अहो संदीप जी येऊ द्या नाही. आडवा त्यांना. जंगलात काय? अमावस्याये आज. त्या म्हाताऱ्याला उठवा. नायतर त्या केम्पिंग वाल्याला फोन करा.” शिंदे सर म्हणाले.”अहो सर फोनला रेंज नाय. थांबा म्हाताऱ्याला उठवतो.” जीवन खंडू बुवाला उठवायला गेले.आणि त्याने दार वाजवले.”ओ आबा…. बुवा….” जीवन ने दरवाजा ठोकला.खंडू बुवाने दार उघडले.

“करिश्मा दीदी यार तू पण काय अशी करते. काही होणार नाही आपल्याला. तू हिंमत नको हारुस यार. उठ इथून थोडं लांब जाऊ.” गौरव म्हणाला.”नाही गौरव माझ्यात ताकद नाही. पुढे आणखीन जंगल दिसतंय. आपण खूप आत आलोय. आपलं काही खरं नाही वाटत. सकाळ व्हायलाही खूप वेळ आहे” करिश्मा बोलू लागली. इतक्यात कोल्हे भुकी झाली. आणि पाच सहा कोल्हे ओरडायला लागले. तसे ते दोघे एकमेकांना बिलगून एका मोठ्या दगडाच्या आडोशाला मुरून बसले. ज्या दिशेने गौरव जायचे म्हणत होता. नेमके तिथूनच तो आवाज येत होता. “मी म्हटलं ना गौरव. कुठेही पळ. आपण जंगलात आहोत.” करिश्मा म्हणाली.

सर्वांच्या मोबाईलचे टॉर्च सुरू होते. सगळ्यांना घेऊन मी वाट काढीत जंगलातून वरच्या बाजूला निघत होतो. आणि सपकन काहीतरी माझ्या कानाच्या बाजूने गेल्याचे जाणवले. “ए कोणे ? काये?” मी ओरडलो. तसे सगळे काय झालं म्हणू लागले.

क्रमशः

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग तीन

टीप :- ज्यांनी पहिले दोन भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा

पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पाहिले की संपूर्ण टीम पवना लेकला पोहोचून मस्ती करायला सुरुवात करते. गणेशने दुपारी त्यांच्यासाठी खास जेवण बनवले होते. त्यानंतर सर्व क्रिकेट खेळतात. यानंतर शिंदे सरांनी टोलवलेला चेंडू दूर जातो. गौरव तो आणायला गेला असता त्याला भुताचा उतारा नजरेस पडतो. आणि आता संध्याकाळ झालेली असते. वाचा पुढे काय होत.

पवना लेकला फिरायला सध्या पर्यटक खूपच गर्दी करतात. गणेशने शुक्रवार – शनिवार साठी आमच्या मुळे इतर कुणाचेही बुकिंग घेतले नव्हते. सायंकाळी सहा वाजताच हळूहळू अंधार पसरू लागला. गणेशच्या कामगारांनी केम्पिंगच्या सर्व लाईट्स सुरू केल्या. रंगबेरंगी रोषणाईने धरणा काठची केम्पिंग आणखीनच रंगतदार झाली होती. त्यात सौम्य आवाजात म्युसिक सुरू केल्याने वातावरणात आणखीनच भर पडली होती. जसजशी संध्याकाळ होत गेली गुलाबी थंडी पडायला लागली. सखाराम आबांनी आणि खंडूबुवाने तंबू लावायला घेतले. त्यांनी पाच – सहा तंबू ठराविक अंतरावर लावून दिले. तिकडे धरणा कडेला असलेल्या मैदानात आम्ही जमलो.

“गुड ईव्हीनिंग मित्रांनो” गणेश म्हणाला. आम्ही सर्वे एक सुरात ‘गुड ईव्हीनिंग’ म्हणालो. “तर टीम. आज तुम्ही आमच्या पेरडाईज केम्पिंग मध्ये काही तरी भन्नाट करणार आहात जे तुम्ही मुंबईत करू शकत नाही. थंडी हलकी आहे. म्हणून शक्यतो स्वेटर न घालता थोडा फील घ्या.” गणेश हसतच म्हणाला.”आम्हाला सवय नाय जास्त थंडीची” अंकुश हसत म्हणाला.”हम्म ठीक आहे काय हरकत नाही. तर पहा जेवण तुम्ही म्हणाल तेव्हा करा. आमचे आबा आणि बुवा दोघेही स्वयंपाकाला लागलेले आहेत. तिकडे आपण बारबेक्यू करणार आहोत. तुम्हाला चार कोंबड्यांचे पीस करून त्यांना मसाला लावून दिलेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते भाजा. सर्व काही सामान तिथे आहे. त्या व्यतिरिक्त काही चकना हवा असेल तर कळवा. तुमचं पिणं सुरू असताना म्युसिकही सुरूच असेल. इथे किती नाचलात तरी कोणी काही बोलणार नाही” गणेश सांगू लागला.मध्येच शिंदे सर मला खानाखुणा करून पिण्याच्या सोयी बद्दल विचारू लागले.

“अरे गणेश तुला पार्सल संगीतलेले आणायला. ते आले का ?” मी विचारले.”हा हा हा… हो ते आलेय.. खोलीत ठेवलंय ते. मघाशीच पोरगा माल देऊन गेला.” गणेश म्हणाला.”किती दिली?” मी विचारले.”आहे भरपूर आहे. २५-३० लीटर नक्कीच असेल” त्याने स्मितहास्य करून सांगितले.”ओह क्या बात हे” मी आनंद व्यक्त केला.त्यानंतर गणेशने आम्हाला पिण्याच्या ठिकाणी नेले. तिथे सर्व काही सोय झाली होती. ग्लास, रिकाम्या प्लेट, बार्बेक्यू चा सेट आणि चार कापून मसाला फासलेल्या कोंबड्या. गणेशने आम्हाला पीस कसे भाजायचे ते दाखवले.”अहो गणेशजी राहू द्या करतो आम्ही. आम्हाला माहिती आहे. आम्ही पण करतो असं” जीवनजी सांगू लागले.मी पटकन एक केंड ओपन केलं. अशोक ने नाक लावून वास घेतला.”आरं बाबा हे काये ? काय देशी बिशी आहे का काय ? सर वास बघा ना कसला स्ट्रॉंग येतोय याचा” अशोकने शिंदे सरां कडे पाहिले.”बघू बर” शिंदे सरांनी वास घेतला.”हम्म नाही रे असाच असतो वास… चला युवा पत्रकार ग्लास भरा पटापट” शिंदे सर म्हणाले.मी आणि अशोकने एकामागोमाग एक करत सर्वांचे ग्लास भरले. आणि सगळ्यांनी जोरदार आवाजात चिअर्सsss केले.

“एक नंबर ताडी आहे भावड्या” अशोक म्हणाला.”ताडी नाय रे माडी आहे” मी सांगितले.”तुझ्या मामाच्या झाडाची आहे का ?” विशालने विचारले.”अरे मामा मुळशी मध्ये हे मावळ आहे. गणेशला सांगितले होते त्याने मागवली कुठून तरी.” मी पिता पिता सांगितले.”जीवन शेठ का शांत आहेत आल्या पासून” संदेश म्हणाला.”नाही शांत काय… हे काय कधी पिला नाय आपण. आता काये संतोषने मागवलंय म्हणल्याव घ्यायचं आता.” असे म्हणत जीवन पीस भाजायला लागला.”ओ सर हा बघा रेडी झालाय इकडचा.. थांबा मी एक प्लेट मध्ये काढून देतो” ऋषी गडबड करू लागला.”ही माडी कशी बनवतात संतोष ?” मोरे मॅडमने मला विचारले.”अहो झाडाची बनते” शिंदे सर पीस खाता खाता म्हणाले.”अय्या कसं काय ते ?” करिश्माने विचारले.”अरे ते नारळाच कस असत तसच झाड असत” संदेश म्हणाला.”अरे ते माडाच झाड असत. त्याला पुढे कोंब येतो. तो थोडासा कट करतात. आणि त्याला मडकं किंवा भांड लावतात. त्यात एक एक थेंब माडी पडते. मग सकाळी किंवा संध्याकाळी ती माडी काढतात” मी पूर्ण सविस्तर सांगितले.

काही वेळ गेल्यानंतर”ए बाबा माझं डोकं गरगर करायला लागलय” श्वेताने हातातला ग्लास तसाच ठेवला.इकडे विशाल, शिंदे सर, संदेश, संदीप सर, गौरव, जीवन, ऋषी सगळे नाचायला लागले. करिश्मा पण हळू हळू नाचायला लागली.”अरे यात दारू मिक्स नाय ना ?” मोरे मॅडमने विचारले.”नाही ओ असं कसं मिक्स करतील?” मी पण नाचायला जाऊ लागलो.”अरे मग फिरल्यासारखे वाटतेय” मोरे मेम हसतच म्हणाल्या.”अहो ते तसच असत.” असे म्हणत मी देखील नाचू लागलो. पाहता पाहता सर्व नाचू लागले.”अय्यो… अशोक जी हमको अकेला छोड आये?” ड्रायव्हर डुलत डुलत आला.”कुठं पडला होता तू ** वाशा” अशोकने त्याचा हात धरून नाचायला ओढले.”अरे हम ये झाड का पाणी नहीं पिता. मस्त दो कोटर डाल दी गाडी मे बैठ कर” सम्राट नाचायला लागला. सगळे बेफान नाचत होते. “अय्यो मॅडमजी आप नहीं नाचोगी?” सम्राटने करिश्माला विचारले.”नाय मला गरगरत आहे” ती म्हणाली.”अय्यो हम को बताओ जी. हम आपके लिये लिंबू पाणी लाके देता हे अभि” तो देखील खुर्चीवर बसला.”काय झालं ?” करिश्माने त्याच्याकडे पाहिलं”कुछ नहीं जी” असे म्हणत त्याने एक पीस खाल्ला.अशोकने पुन्हा त्याला नाचायला ओढले. सम्राटला जास्त झाल्याने त्याचा सारखा तोल जात होता. शिंदे सर बार्बेक्यू मध्ये पीस लावत होते. तितक्यात सम्राटचा नाचता नाचता तोल गेला आणि तो शिंदे सरांच्या पाठीवर बसला. तसा शिंदे सरांच्या हातातला पीस खाली मातीत पडला.”ए कोणे….” शिंदे सर ओरडले.”अय्यो हम हे सर जी” तो तोल सावरत उभा राहिला.शिंदे सर उठले.”झेपत नाय तर पितोस कशाला ?” शिंदे सर देखील उभे राहून म्हणाले.”शिंदे जी हम पैसा लिया क्या आपसे ? हमारे पैसे का पिया. आपको क्या दिक्कत ?” त्याने सांगितले.तशी खाडकन शिंदे सरांनी त्याच्या कानाखाली पेटवली.तसे सगळ्यांनी मध्यस्थी केली. अशोक सम्राटला लांब घेऊन गेला. करिश्मा आणि श्वेता तोंड दाबून हसायला लागल्या.

संदीप सरांनी डायरेक्ट जेवणाची तयारी करायला सांगितले. आबा आणि बुवाने जेवण वाढायला घेतले. एकदम चुलीवरच जेवण होत ते. चिकनचा लालझर रस्सा… वाफा निघणारा जीरा राईस आणि तांदळाच्या गरमागरम भाकरी… वाह मजा आली जेवायला. लिंबू पिळून मी आधी रस्सा टेस्ट केला. आबांनी कांदा कापून दिला…. जेवण बाकी झ्याक झालं. त्यानंतर गणेश आला.”झालं जेवण सर्वांचे ? कसे होते आताचे जेवण?” गणेशने विचारलं.”भाऊ एक नंबर खरंच” विशाल म्हणाला.सर्वांनी तारीफ केली.”बरं सर तंबू मध्ये झोपायची सोय केलीये. मी घरी निघतोय. काही लागलं तर सखाराम आबा आहेतच इथे.” गणेश सांगू लागला.”हो नक्की” संदीप सर म्हणाले.”आणखी एक… तुम्ही जे काय करायचं ते आतच करा… म्हणजे केम्पिंग एरियाच्या बाहेर पडू नका” गणेशने जाता जाता सांगितले.”का हो गणेशजी ? बिबट्या वगैरे आहे का ?” संदीप सरांनी विचारले.”नाही ओ बिबट्या असता तर केम्पिंग बंद पडलं असत आमचं. आज अमावस्या आहे म्हणून मुद्दाम सांगतोय” गणेश सांगून निघाला.”अच्छा हा बरोबर…” संदीप सरांनी दुजोरा दिला.”चल संतोष येतो सकाळी. चला गुड नाईट एवरीवन” असे म्हणून गणेश सखाराम आबा सोबत त्याच्या गावातील घरी निघून गेला.

गणेश गेल्या अंतर आम्ही सर्वे शेकोटी जवळ जमलो. आता वातावरण थंड झाले होते. रात्रीचे १२ वाजत आल्याने पारा खाली उतरला होता. सगळ्यांच्या डोक्यात माडीची नशा भिनत होती. आणि मध्येच भुताचा विषय निघाला. बोलता बोलता गौरवने अंड्यांचा किस्सा सांगितला. आमच्यातील काही जण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हते. बराच वेळ चाललेल्या गप्पांनंतर शिंदे सर आणि संदीप सर आपापल्या तंबूत झोपायला गेले.”पोर असून घाबरता. कशाचं भूत नी काय ?” करिश्मा हसू लागली.”हा का ? जा मग बाहेर केम्पिंगच्या” अशोक म्हणाला.”त्यात काय ? चल रे गौऱ्या आपण तिथली अंडी आणू उचलून” करिश्मा म्हणाली.गौरव पण उठला आणि दोघेही तिकडे जायला लागले.”ए तिथं हाडळ आहे धरेल तुला” अंकुश पाठीमागून सांगू लागला. ते दोघेही केम्पिंगबाहेर जाऊ लागले. आणि पाहता पाहता गेट खोलून बाहेर अंधारात गडप झाले.

गौरवने फोनचा टॉर्च ऑन केला.”अरे थांबवा तिला उगाच कशाला जाते तिकडे?” ऋषी म्हणू लागला.”येईल बघ परत तिथून आता” विशाल म्हणू लागला.पण टॉर्च पुढे पुढे जात होता. तसे आम्ही सर्व उभे राहिलो. आणि पुन्हा खाली बसलो. गौरव आणि करिश्मा वेताळबुवाच्या झाडाखाली पोहोचली. गौरवने टॉर्च मारून करिश्माला अंडी दाखवली. पण ती पूर्णपणे फुटलेली होती.”अग दीदी… अंडी फोडलीत कुणीतरी” गौरव म्हणाला.”कुठंय ?? ” करिश्मा देखील पाहू लागली.”आता काय लिंबू न्यायचं दाखवायला ?” गौरव म्हणू लागला. इतक्यात झाडी मध्ये वरच्या बाजूला कसलासा आवाज झाला. दोघांनी पटकन टॉर्च तिकडे फिरवला.

क्रमशः

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग २

पवना लेक कॅम्पिंगला निघालोय खर पण काय होणारे हे लेखक सोडून इतर कुणालाच माहित नाही.

पूर्वसूत्र :- जिम मधून बाहेर आल्यानंतर संतोष आणि संदेश दोघांमध्ये पिकनिक बद्दल विषय निघतो. दुसर्याच दिवशी ऑफिसमध्ये मिटिंग होते आणि संपूर्ण स्टाफचा पवना कॅम्पिंगला जाण्याचा निर्णय ठरतो. भाग एक वाचला नसेल त्यांनी तो वाचावा.

पिकनिकचा दिवस सकाळी सात वाजताच आमची टीम तयारीनिशी ऑफिसमध्ये पोहोचली. अशोकच्या मित्राची एक ट्रॅव्हलर गाडी होती. त्याने त्याला आधीच फोन करून बोलावले होते. तो बरोबर सात वाजता ऑफिसवर पोहोचला होता. “अय्यो अशोकजी… हमको बोला 7 बजे आओ. हम आ गये… लेकीन तुम्हारे लोग ही आये नहीं अब तक” तंबाखू मळत मळत तो बोलत होता.”येतील ना **वाशा तुला कसली घाई एवढी.” अशोकने त्याला हसतच शिवी हासडली.अशोकच्या मित्राने तंबाखू खाल्ली आणि हात झटकले. हाताला लागलेला कचरा पाठीमागून येणाऱ्या शिंदे सरांच्या नेमका डोळ्यात उडाला.“आई ग….” सरांनी डोळेच मिटून घेतले. पण संदीप सरांनी पुढे येत त्यांना पाण्याची बाटली दिली आणि डोळे धुवायला सांगितले.“सॉरी हा सर जी… हमने आपको देखा हि नही” असे म्हणत तो करिश्मा कडे पाहून हसायला लागला.पाहता पाहता सर्व जण जमले. अगोदर आम्ही मिळून सामान गाडीत लावले. अशोक त्याच्या मित्राच्या म्हणजेच ड्रायव्हरच्या बाजूला बसला. पहिल्या सीट वर मोरे मेम,श्वेता आणि करिश्माने जागा अडवली. त्यांनी अख्खी एक लाईनच घेतली. पाठी मागे लगोलग संदीप सर आणि जीवन जी बसले. एका सीट वर कानात वायरी घालून गौरव खिडकीला खेटून बसला. त्याच्याच बाजूला स्वप्नीलने जागा धरली. दुसऱ्या सीट वर अंकुशने देखील डोळे मिटून घेतले. पाठीमागे शिंदे सर, मी, संदेश, विशाल आणि ऋषी गप्पा मारीत होतो. आमच्या मस्तीत मध्ये मध्ये अंकुश,अशोक आणि जीवन भाग घेत होते. असे करता करता आम्ही मुंबई पुणे हायवेला लागलो.

गाडी हायवेला लागताच अंकुशने उलट्या सत्र सुरू केले. प्रसादच्या खिशात असलेल्या आवळासुपारीने अंकुशला दिलासा दिला. गौरव अजूनही गाण्यातच. खिडकीतून छान थंडगार वारा आत येत होता. खंडाळा घाटातील प्रवास सुंदर भासत होता. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात रंगत आणण्यासाठी जीवनजीने त्याचा बेगेतून माईक बाहेर काढला आणि सरळ करा ओके ट्रेक बस मधील स्पीकरला जोडून गाणी म्हणू लागला. ‘क्या हुआ तेरा वादा’, ’गुलाबी आखे’ अशी गाणी जीवन म्हणू लागला.शिंदे सर आणि संदीप सर देखील गाडीतच पाठीमागे येऊन थोडा थोडा डान्स करायला लागले. मी मात्र अधून मधून फोनवर केम्पिंगवाल्या मित्राच्या संपर्कात होतो. खंडाळा घाटातील बोगद्यातून जाताना विशाल, जीवन ,स्वप्नील आणि अशोक चौघेही शिट्ट्या मारायला लागले. ‘वे टू लोणावळा’ आमच्या सर्वांचे व्हॉट्स अप वर केव्हाच स्टेटस पडले होते. गौरवने इन्स्टाग्रामवर लाईव्ह देखील केलं. त्याला मोजून चार व्हीवस मिळाले. आणि ते पण आम्ही गाडीतलेच. असो त्याच बघून मी फेसबुकवर लाईव्ह आलो.

सकाळी साडे दहा वाजता आम्ही लोणावळ्यात पोहोचलो. तिथे एका हॉटेलवर आम्ही गाडी थांबवली. खरं तर सर्वांना खूप भूक लागली होती. म्हणून तिथे थोडासा नाश्ता केला.”अरे निघालो तेव्हा पासून लागली होती. आता मोकळा झालो” टॉयलेट मधून बाहेर येता येता ऋषी मला सांगत होता. तिथे आम्ही मुद्दामच मिसळपाव मागवला. “हमको मिसलपाव नहीं… हम मसाला डोसा खायगा जी.” अशोकने आणलेल्या ड्रायव्हरचा वेगळाच थाट.”म्याडमजी पाव मंगताय तो मंगा लो जी” करिश्मा कडे पाहून तो हसू लागला.नाश्ता करून आम्ही गाडीजवळ आलो.”कोण आहे काय माहीत ? सकाळ पासून बघतेय नुसता माझ्याकडेच बघतोय. दिसतो तर काळा घुशी गत” करिश्मा श्वेताला म्हणू लागली. पाहता पाहता सर्वे गाडीत बसले. गाडी सुरू झाली. कुमार रिसॉर्ट वरून उजवीकडे वळून गाडी पुढे निघाली.

दुधीवरे खिंडी मार्गे आमची गाडी अंतर कापू लागली. शेजारून दिसणाऱ्या पवना धरणाचे आम्ही व्हिडीओ काढत होतो. “ए अशोक इथे थांबव ना फोटो काढुयात” श्वेताने अशोकला सांगितले.”अय्यो हमको बोलोजी.. हमारा नाम सम्राट हे जी… सम्राट वेणूगोपाल अय्यर.. हम को बोलो जी. तुम जिधर बोलेगा उधर रुखाताय जी हम गाडी.” असे म्हणत त्याने बोलता बोलता कचकन ब्रेक दाबला. गाडीचा ब्रेक दाबताच पाठीमागच्या सीटवर निवांत आडवे झोपलेल्या शिंदे सरांचा तोल गेला आणि ते धाडकन सीटवरून खाली पडले.”कोण ए तो…. काय रे ए… अशी चालवतात का गाडी ?” उठता उठता रागाने ते मागून जोरात ओरडले.”अय्यो कोण बोला जी ?” ड्रायव्हर मागे पाहू लागला.”कोण बोला क्या बोला… असा कसा ब्रेक मारतो तू ?” शिंदे सर त्याच्यावर ओरडले.”ओ जाऊद्या अप्पा… गाडी आलथी समोर” मोरे मॅडम पुढूनच उठून म्हणाल्या.”ओ जाऊद्या शिंदे…. तुम्ही या इथं पुढे बसून आराम करा” संदीप सरांनी त्यांना पुढे येण्यास संगीतले.”अरे समजत नाय काय नाय माणसं आहेत का जनावर आहेत गाडीत? कशीही चालवतोय माणूस गाडी” असे म्हणत ते मध्य भागी गौरव च्या बाजूला बसले.”ए बाबा तू चल आता नको थांबू कुठं” संदीप सरांनी ड्रायव्हरला चलण्यास संगीतले. मी देखील पुढील डायरेक्शन सांगायला पुढे गेलो.

पवना धरणाला वळसा घालून आमची गाडी ‘जवण’ गावा जवळ आली. तिथूनच खाली एक रस्ता जातो. त्या रस्त्याने साधारण तीन किलोमीटर पुढे गेल्यावर एक बोर्ड लागला. ‘पेरडाईज केम्पिंग’. तिथून पुन्हा दोन किलोमीटर आत आल्यावर आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलो. केम्पिंग जवळ जाऊन आम्ही आमची गाडी पार्क केली. आणि सर्व खाली उतरलो. स्वप्नील, प्रसाद आणि बाकीचे गाडीतील सामान काढायला लागले. माझा मित्र गणेश तिथेच आमची वाट पाहत थांबला होता. मी पहिले त्याच्या हातात हात देत हस्तांदोलन केले.

“वेलकम टू पेरडाईज केम्पिंग… मायसेल्फ मिस्टर गणेश गोणते. विलींग टू युअर सर्व्हीस सर” त्याने आमचे स्वागत केलं.”थँक्स मिस्टर गणेश” मी देखील डोळ्यावरचा गॉगल उतरवला.”मग संतोष कसा झाला तुमचा प्रवास?” त्याने प्रश्न केला.”हम्म एकदम मस्त. चार तासात गावाला टच. शिवाय मध्ये मध्ये थांबलो देखील होतो.” मी म्हणालो.पाठीमागून आमचे सर आले.”मी ओळख करून देतो. हे आमच्या जनशक्ती चॅनलचे सीईओ संदीप सर, हे आमचे संपादक शिंदे सर, हे आमचे सहकारी पत्रकार जीवनजी, विशाल, संदेश, आमचा व्हडिओ एडिटर अशोक, अंकुश, गौरव हे आमचे केमेरा पपर्सन ऋषीकेश, स्वप्नील, प्रसाद आणि या आमच्या अँकर मोरे मॅडम, करिश्मा आणि श्वेता. आणि हे आमचे ड्रायव्हर सम्राटजी अय्यर” मी सर्वांची ओळख करून दिली.”आणि मित्रांनो हा माझा मित्र गणेश. पेराडाईज केम्पिंग मध्ये तो दोन दिवस आपल्याला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. “हम्म… आता फक्त एक करा.. ओलमोस्ट 12 वाजलेत दुपारचे.. तुम्ही फ्रेश व्हा.. आणि जेवणार आता लगेच आहात की उशिराने ?” त्याने विचारले.”नाही नाही.. सावकाश दादा.. अजून लगेच नाही.” शिंदे सरांनी आजूबाजूचा परिसर न्याहाळत सांगितले.”एक मिनिटं सर… जो पर्यंत आम्ही सांगत नाही. तोपर्यंत कृपया कोणीही पाण्या जवळ किंवा पाण्यात शिरू नका. प्लिज तेवढं सहकार्य करा.” गणेश म्हणाला.”हो हो नक्की” संदीप सरांनी दुजोरा दिला.

आम्ही पटापट खोल्यांमध्ये गेलो. आमच्या बेग्स ठेवल्या. कपडे बदलली. आणि पुन्हा केम्पिंग एरियात फिरू लागलो. दुपार झाली असली तरी वातावरणात काहीसा थंडावा होता, कानावर पक्ष्यांचे आवाज पडत होते. जवळपास कोणतेही वाहन नसल्याने कोणताही इतर आवाज त्रास देत नव्हता. वाहणारा वारा देखील सुंदर वाटत होता. समोर पाहिले तर पवना धरणाचे निळे शार पाणी आणि नजरेला भिडणारा तिकोणा किल्ला उभा होता. पाण्याच्या पलीकडून तो खुणावत होता. धरणा कडेलाच केम्पिंग. लाईट्स होत्या पण त्या रात्री पेटणार होत्या. एका बाजूला खोल्या, आणि एक स्वयंपाक गृह अशी तिथली रचना होती. पार्किंग जवळच क्रिकेट साठी छोटे मैदान होते. आम्ही क्रिकेट खेळण्याचा बेत आखला. पण अजून आमचे जेवण बाकी होते. धरणातील मासे पकडून मस्त पैकी फ्राय केले होते. आम्ही सगळे एका झाडाच्या सावलीतच दुपारचे जेवण केले. गणेशने सांगितल्या प्रमाणे त्याच्या किचन मध्ये काम करणाऱ्या सखाराम आबा आणि खंडूबुवाने सर्वांना जेवण वाढले. फ्राय केलेले गरमागरम मासे, तांदळाची भाकर आणि काळ्या खेकड्यांचा रस्सा आणि इंद्रायणी भात आमच्या ताटात होता. आम्ही मस्त दाबून जेवण केले.

दुपारी तीन चार वाजता आम्ही क्रिकेट खेळू लागलो. शिंदे सरांनी एक बॉल लांब मारला. गौरव तो बॉल आणायला लांबपर्यंत गेला आणि त्याने चेंडू उचलला. काहीवेळ तो तिथेच कायतरी पाहत राहिला आणि त्याने बॉल माघारी फेकला. लांबून हळूवारपणे चालत चालत तो माझ्या जवळ आला. “अरे तिथे काय होत संतोष ?” त्याने येऊन मला विचारले.”काय होते .” मी त्याला विचारले.”अरे तिथे देवा सारख कायतरी होत. आणि खूप सारे लिंबू आणि कोंबड्यांची डोकी होती.” तो सांगू लागला.तोच पाठीमागून गणेश पुढे आला.”अरे ते तिथे वेताळबुवा आहे.” गणेश म्हणाला”म्हणजे नक्की काय ?” मी विचारले.”अरे आज अमावस्या नाय का… म्हणून उतारे आणून टाकतात.” तो सांगू लागला.”हा हा हा हा…. एवढी अंडी वाया घालवली.. आम्हाला तरी द्यायची” गौरव मला हसून सांगू लागला.”एक मिनिटं…. मित्रा हसायचा भाग नाही हा” गणेशने त्याला शांत केले.”म्हणजे गणेश ? काय भानगड तिथे ?” मी विचारले.”संध्याकाळ होत आली. मी आज तुम्हाला धरणा जवळ तर पाठवणार नाहीच. धरणावर उद्याच जाऊ. पण आज तुमचा जो काही प्लॅनिंग असेल ना तो इथे आतच करा.” गणेश बोलला.”आतच करा म्हणजे ?” मी पुन्हा विचारले.”अरे म्हणजे बाहेर कुठे जाऊ नका.. तसं मी सांगेलच रात्री गेम संपल्यावर” असे म्हणत त्याने माझ्या खांद्यावर थोपटले आणि तो निघून गेला. या सर्व गोष्टीं मुळे माझ्या मनात शंभर प्रश्न निर्माण झाले. क्रिकेटवर माझं लक्ष लागेना. इथे ग्राउंडवर मात्र चांगलाच धुराळा उडाला होता. मी मात्र विचारात हरवलो होतो.

क्रमशः

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग – भाग १

डिसेंबर महिना सुरू होता. मुंबई शहरातील वातावरणात काहीसा थंडावा सुरू झाला होता. याच दिवसांत फिटनेस साठी जीम करणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढीस लागते. त्याचबरोबर आणखी अनेक गोष्टी होतात ज्या थंडीच्या दिवसांतच पाहायला मिळतात.मी आणि संदेश दोघेही एकाच जीम मध्ये होतो. दोघेही मुळात पत्रकार असल्याने वेळात वेळ काढून संध्याकाळी जीम करत होतो. आमची मैत्रीण करिश्मा हिने आम्हाला फिटनेस वेट गेन साठी प्रोटीनचा एक डब्बा दिला होता. मिल्क शेक बनवून काही दिवस प्यायचे आणि व्यायाम करायचा. बरेच दिवस हेच सुरू होते.

एकेदिवशी संध्याकाळी जिम मधून मी आणि संदेश बाहेर आलो.“करिश्मा ने कसलं डबड दिलय काय माहीत. वजन वाढलं तर ठीक नायतर चाळीतली पोरं म्हणतील माझा डब्बा चोरला परत कुणीतरी” मी संदेशला म्हणालो.“होईल रे भावा… तुला ना जरा पेशन्स नाहीत. आता कुठे आठवडा झालाय. त्या समीर दादाची बघ कशी एका महिन्यात पर्सनालिटी बनली” रुमाल बेग मध्ये टाकत संदेश बोलत होता.“संदेश ऐक ना… मी काय म्हणतो. असं पण इलेक्शनला थोडा वेळ आहे. नंतर वेळ मिळेल नाही मिळेल. मस्त पैकी कुठे तरी फिरायला जायचं का ?” बाईक जवळ येऊन मी त्याला प्रश्न केला.“भावा तुझ्या मनात तेच माझ्या मनात. लाव बर विशालला फोन लगीच” संदेश म्हणाला.“नाय नको… आपण उद्या ऑफिसमध्ये ठरवूयात. उगाच आता फोन लावला ना भावा अर्धा तास रस्त्यात जाईन बोलत बसलो तर. त्यापेक्षा आता घरी जाऊ. जेवण करू आणि झोपताना व्हॉट्स अप वर बोलू” मी बाईक ला चावी लावली आणि घरी जायला निघालो.“व्हॉट्सअपला तू बोल विशालशी. मी आज ऑनलाइन नाही येणार. आज शेतावर जायचाय पोर पोपटी करणारेत” संदेश देखील त्याच्या बाईकवर बसला. आणि काही वेळात आम्ही दोघेही तेथून निघून आपापल्या घरी आलो. घरी आल्यानंतर झोपण्यापूर्वी विशालला फिरायला जाण्यासाठीची कल्पना देऊन ठेवली. आता बाकीचं बोलणं ऑफिसमध्ये.

दुसऱ्यादिवशी सकाळी दहा वाजताच मी ऑफिसमध्ये गेलो.

“अरे वा दिवाडकर साहेब आज चक्क एक तास लवकर” संदीप सरांनी आश्चर्य व्यक्त केले.

माझ्या पाठोपाठच संदेश आणि विशालही ऑफिसमध्ये आले.

“कमाल आहे… आज काय ठरवलं काय तुम्ही. तुम्ही जर असेच लवकर आलात तर आपला चॅनल लवकरच पुढे जाईल. क्या बात हे?” संदीप सर पुन्हा आश्चर्य व्यक्त करत बोलू लागले.

“सर ही बातमी घ्यायची का ?” श्वेताने सरांना मागून आवाज दिला.

“अरे मला काय विचारते संपादकांना फोन लाव. विचार घ्यायची का नाय” संदीप सर एक फाईल उचलून बाहेर गेले.

“ए सेंडी चल रे व्हीओ घे हा आज लवकर आला आहेस तर” श्वेताने माझ्या हातात स्क्रिप्ट टेकवली.

“ए काय राव तू. याच्या साठी आलो का ?” मी कॉलर माईक घेऊन रेकॉर्डिंगला बसलो.

“रॉल….” म्हणत गौरवने रेकॉर्डिंग स्टार्ट केलं. आणि पटकन मी बातमी वाचून संपवली. आणि पटकन माईक बंद करून उठून बाहेरच्या खोलीत आलो.

“संदेश… करिश्मा आली का ? संदीप सर काय बोलले आणि?” मी सोफ्यावर बसलो.

“ही बघ आली. 100 वर्षे आयुष्य आहे तुला” संदेशने दारात पाहत संगीतले.

करिश्मा दार उघडून आत येत “ओहो… आज सगळे माझ्या आधी ? काय विशेष ?” करिश्मा रेकॉर्डिंग रूम मध्ये बेग ठेवायला निघाली.

“करिश्मा सर्वांना आवाज दे आणि तू पण ये” विशालने तिला सांगितले.

“का ???  काही मिटिंग आहे का ?” करिश्मा आत जाता जाता बोलली.

“तू ये तर पहिले सर्वांना बोलव” विशाल बोलला.

एक एक करत सगळे बाहेरच्या रूम मध्ये आले.

“साहेब तुम्ही बोलता का मी बोलू?” विशालने मला विचारले.

“बोला की आता तुम्हीच त्यात काय?” मी म्हणालो.

“आपल्याला पिकनिकला जायचं आहे येत्या शुक्रवारी. तेव्हा सगळ्यांना तयार राहायचय” विशाल म्हणाला.

“ओह वाव” करिष्मा म्हणाली.

“अरे पण न्यूजच कस काय ? संदीप सर आणि शिंदे सर ?” श्वेताने आडवा प्रश्न केला.

“ते सोड तुला काय करायचंय?” विशाल म्हणाला.

“अरे शिंदे सरांशी बोलणं झालंय सकाळी. ते ओके बोलले.” मी सांगितले.

“आणि संदीप सर?” श्वेताने विचारले.

“संदीप सर ना. हे बघ आले” संदेश म्हणाला.

संदीप सर दरवाजा खोलून आत आले. आणि आत जमलेली मिटिंग पाहून बोलले.

“हे काय ? कसली मिटिंग ? आता निघाले का काय पिकनिकला ?” संदीप सरांनी प्रश्न केला.

“नाय ओ भाऊ जरा सांगतोय सर्वांना एकदा. म्हणजे तोपर्यंत तयारी करायला.” विशाल म्हणाला.

“अच्छा ओके. बरं ऐका आता सगळ्यांनी. बरेच दिवस..महिने… महिने काय 2 वर्षे आपण कुठे पिकनिकला गेलो नाही. माझ्याही मनात होतंच जायचं. तर तुमच्या सर्वांच्या मनात आलंच आहे तर आपण येत्या शुक्रवारी सर्वे मस्तपैकी फिरायला जातोय.” असे म्हणत संदीप सरांनी शर्ट फोल्ड केले.

“येस……” करिश्मा खुष झाली.

“ओ सर बसा ना इथं. ऋषी चेअर आन ना एक आतून” संदेशने सांगितले.

“ए नको राहू दे..” संदीप सर उभे राहून पुढे बोलू लागले.

“बरं ऐका… विशाल आणि संदेश मला सांगत होते मघाशी. मी पण वैतागलोय खूप. म्हटलं आता फ्रेश व्हावं मस्तपैकी. शिवाय दादा स्वतः परवा म्हटले की टीमला घेऊन जा बाहेर कुठंतरी दोन दिवस. तर शिंदेना मी बोललो याबद्दल तर ते म्हटले शुक्रवार शनिवार जाऊयात. म्हणून या शुक्रवारी आपण निघतोय.” संदीप सर सांगत होते.

“कुठे सर ?” श्वेताने प्रश्न केला.

संदीप सर हसूनच “अरे हो हो… मी बोलतोय ना… लगेच काय घाई…. हा तर… आपण पिकनिक  साठी यावेळी कुठलंही रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसला नाही जाते. यावेळी आपण संतोष साहेबांच्या गावी जातोय. लोणावळा.” संदीप सर म्हणाले.

“ओहो….चलो फिर” करिश्मा माझ्या कडे पाहत म्हणाली.

“साहेब बघ कसे खुश झाले लगेच” विशाल माझ्याकडे बघून म्हणाला.

“लोणावळाला कुठे जातोय आणि काय काय प्लॅन आहे ते सांग संतोष तू आता सर्वांना” संदीप सरांनी मला पुढील सूचना द्यायला सांगितले.

“आपण जी पिकनीक फिक्स केली आहे. त्यानुसार आपण लोणावळा जवळील. म्हणजेच मावळ तालुक्यातील पवना लेकला जात आहोत. आणि तिथे माझ्या एका मित्राचं केम्पिंग आहे. आपण तिथे खास करून केम्पिंगची मजा घ्यायला जातोय. आणि खरंच खूप मजा येईल” मी सांगितले.

“ओह क्या बात हे ? फिर तो और मजा आयेगा” ऋषी बोलला.

“बरं ऐका आता… मला दादांशी बोलावं लागेल. कारण पुढची एरेंजमेंट करायला लागेल. संतोष तुझ्या त्या मित्राला एडव्हान्स किती पे करायचे हे एकदा बोलून घे. आणि तिकडे काही कमी पडायला नको. सर्व मेनेज करून ठेव. उद्या पर्यंत मी तुला केश ट्रान्सफर करतो.” असे म्हणत संदीप सर खुर्चीवर बसले.

“श्वेता ही लिस्ट वाच यात कुणाची नावे राहिली का चेक कर” संदेश तिच्या हातात कागद देतो.

“संदीप सर, शिंदे सर, विशाल, संतोष, संदेश, अंकुश, अशोक, गौरव, ऋषी, करिश्मा, श्वेता… बस अजून कोण ?” श्वेताने लिस्ट वाचली.

“जीवनजिचं नाव टाक त्यात… आणि मोरे मेम ला पण विचार” संदीप सर पाणी पिता पिता म्हणाले.

बराचवेळ चाललेल्या मिटिंग नंतर

“चला… सगळे कामाला लागा. अजून चार दिवस आहेत. फॉलोअप मध्ये रहा. चला संतोष, संदेश, विशाल तुमच्याकडे काय न्यूज आज ?” संदीप सरांनी विचारले.

“सर आमच्या एरियात काल रेप झालता.. बघतो काय मिळतंय का बाईट वगैरे” विशाल म्हणाला.

“रेप ना ? झाला रोज होतो… मला माहितीये तुम्ही काय फेकता ते.. आता एक काम करा. विशाल तू आणि संदेश दोघेही पोलीस स्टेशनला जायचं. तिथून काल कोळसेवाडी मध्ये जो मॅटर झाला ना त्याची अपडेट घ्यायची. आरोपीला पकडले आहे वाटत. शिंदे सरांना कॉल करा आणि पोहोचा. संतोष तू… तुझं जॅकेट कुठंय?” मला सरांनी विचारले.

“आहे ना सर बेगेत.” मी म्हणालो.

“हे दोघे तिथून बाईट आणतील. आत मध्ये शिंदेंच्या पेडला एफआयआर ची कॉपी आहे. ती घे आणि स्क्रिप्ट बनव. पटकन अँकर घे तो गुन्हा आणि मोकळा हो. बनकर आला की पटकन एडिट करून अंकुश लगेच ऑन एअर करेल. जास्त खेळत नाय बसायचं. पटकन एकदम” संदीप सर म्हणाले.

क्रमशः