Kalyan East : ‘हे’ १७ उमेदवार लढवणार कल्याण पूर्वेची जागा; निवडणूक चिन्हे मिळाली

Kalyan East : १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून जवळपास ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननी व अर्ज माघारी झाल्यानंतर आता १७ उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देखील आज देण्यात आले आहे.

  1. धनंजय बाबुराव बोडारे – शिवसेना उबाठा – मशाल
  2. ऍड.मिलिंद रविंद्र ढगे – बहुजन समाज पार्टी – हत्ती
  3. सुलभा गणपत गायकवाड – भारतीय जनता पार्टी – कमळ
  4. तृणेश अरूण देवळेकर- समता पार्टी – ट्रम्पेट
  5. प्रफुल रघुनाथ नानोटे – राईट टु रिकाॅल पार्टी – प्रेशर कुकर
  6. विशाल विष्णू पावशे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
  7. शालीनी राजेंद्र वाघ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – आटो रिक्षा
  8. शैलेश राममूर्ती तिवारी – प्रहार जनशक्ती पक्ष – बॅट
  9. हरिश्चंद्र दत्तु पाटील – संघर्ष सेना – शिट्टी
  10. त्रिशला मिलिंद कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
  11. कैलाश रमेश लाल चैनानी – अपक्ष – दुरदर्शन
  12. ऍड. धनंजय बप्पासाहेब जोगदंड – अपक्ष – संगणक
  13. प्रविण महेश घोरपडे – अपक्ष – रबर स्टॅम्प
  14. महेश दशरथ गायकवाड – अपक्ष – अंगठी
  15. महेश प्रकाश गायकवाड – अपक्ष – पत्र पेटी
  16. विवेक श्रीकांत पांडे – अपक्ष – सिरिंज
  17. सीताराम अण्णासाहेब गायसमुद्रे – अपक्ष – शिवण यंत्र

वरील १७ उमेदवार उर्वरित १७ दिवस निवडणूकीच्या आखाड्यात आपल्या ताकदीनिशी उतरले असून २० नोव्हेंबर रोजी जनतेचा कौल मिळवणार आहेत. पक्षांची बदललेली राजकीय समीकरणे, मतदारसंघातील परिस्थिती यावर कोणता उमेदवार कल्याण पूर्वेच्या सर्वाधिक मतदारांच्या पसंतीस उतरतो यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी २० नोव्हेंबर पर्यंत आपल्या पारड्याचे वजन वाढविण्यासाठी सर्वच उमेदवार जोर लावणार यात शंकाच नाही.

Kalyan East: ‘These’ 17 candidates will contest the seat of Kalyan East; Election symbols received

लोकसभेत राजू पाटील यांनी केला शिवसेनेचा जोरदार प्रचार; विधानसभेत शिवसेनेने उभा केला पाटलांविरोधात उमेदवार

राजू पाटील : मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत त्याच राजू पाटलांविरोधात शिवसेनेने अमित ठाकरेंपाठोपाठ आता राजू पाटील यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून लोकसभेत डॉ.श्रीकांत शिंदे यांना राजू पाटलांच्या मदतीने भरघोस मतदान झाले होते. मात्र आता मनसे युतीचा भाग नसल्याने शिवसेनेने त्यांच्या उमेदवारा विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मसनेचे आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभेतून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा पक्षाचे सुभाष भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे यांना देखील उमेदवारी दिली आहे.

कल्याण ग्रामीणचे शिवसेना उबाठाचे उमेदवार सुभाष भोईर हे २०१४-२०१९ या काळात याच मतदारसंघात आमदार होते. मात्र २०१९ साली त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर भोईर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे. शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे यांनी देखील महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. शिवसेनेने उमेदवार दिल्यामुळे मनसेत मात्र काहीसा संताप व्यक्त केला जात आहे.

Raju Patil campaigned strongly for Shiv Sena in the Lok Sabha

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत शेकडो उत्तर भारतीयांचा भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली : शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चव्हाण यांच्याच हस्ते प्रवेश करण्याच्या त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव राज्यभर प्रचारात व्यस्त असलेले मंत्री चव्हाण हे त्या सगळ्यांसाठी आवर्जून उपस्थित राहिले होते.

मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक, सरचिटणीस नंदू परब यांनी दिली. त्यामध्ये प्रमुख अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश, विश्वकर्मा श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा, दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा, अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा, अभिषेक सोनू, अभिषेक सिंह, नवीन शर्मा, विकास प्रजापती, दर्शन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, दत्ता माळेकर, रवीसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर मीतेश पेणकर बाळा पवार उपस्थित होते. नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे यांनी या प्रवेश संदर्भात काही महिने विशेष प्रयत्न केल्याबद्दल मंत्री चव्हाण यांनी या सगळ्यांचे विशेष कौतुक केले. संघटना मजबुतीसाठी हे महत्वाचे पाउल असून आलेल्या सगळ्यांचे स्वागत असून पक्षात एकदिलाने काम करून शतप्रतिशद भाजप हे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

Hundreds of North Indians join BJP in Dombivli in the presence of Minister Ravindra Chavan

कल्याण पूर्वेत राज ठाकरेंचं दुर्लक्ष? मनसे का देत नाहीये इथे तगडा उमेदवार?

MNS Kalyan East : कल्याण पूर्व मतदारसंघात मनसे कडून उमेदवार दिला जात नाही अशी गरळ नेहमीच ऐकावयास मिळते. याबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच नाराजी देखील असते. त्याचबरोबर या भागातील मतदार देखील राज ठाकरेंच्या भूमिकेवर अंतर्गत नाराजी व्यक्त करतात. कल्याण पूर्वेच्या जागेसाठी मनसेचे काही बडे नेतेच समझोता करतात अशाही चर्चा आजवर ऐकायला आल्या आहेत.

२००९ साला पासून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गणपत गायकवाड हे आमदार आहेत. राज ठाकरेंची प्रचंड ताकद आणि हवा असतानाही त्यांनी २००९ साली कल्याण पूर्वेत मनसेचा उमेदवार का दिला नाही हा प्रश्न आजही अनेकांच्या मनाला लागून आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेला भरघोस मतदान होत असतानाही मनसेने तेव्हा जागा का लढवली नाही असा सवाल आजही उपस्थित केला जातो.

२०१४ साली मनसेकडून मोरेश्वर भोईर हे उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत होते. मात्र अचानकपणे हे तिकीट मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांना देण्यात आले. याचा सर्वाधिक फायदा अनपेक्षितपणे अपक्ष व स्थानिक उमेदवार गणपत गायकवाड यांना झाला. मतदारसंघात त्यावेळी अधिक नावलौकिक नसलेल्या नितीन निकम यांना सात हजारहून अधिक मतदान झाले होते. मोरेश्वर भोईर यांना उमेदवारी मिळाली असती तर कदाचित या मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते अशीही चर्चा होती. यानंतर भोईर यांनी पक्षाला रामराम ठोकला.

२०१९ साली झालेल्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा कल्याण पूर्वेत उमेदवार न देण्याचे ठरवले. यामुळे मनसेला मतदान करणाऱ्या मतदारांना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष सोडून वेगळा उमेदवार अथवा इतर पर्यायाचा विचार करावा लागला होता. आता २०२४ च्या निवडणुकीतही मनसे पक्षातर्फे उमेदवार अजूनही दिला जात नसल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. कल्याण पूर्वेत मनसे प्रत्येक निवडणुकीत का कमीपणा घेते? असा सवाल आता पुन्हा पडला असून याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का? असाही प्रश्न काही राजकीय जाणकार करीत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यात मतदार दिला जातो मग मनसेची ताकद बऱ्यापैकी असलेल्या राजू पाटलांच्या शेजारील मतदारसंघात उमेदवार का दिला जात नाही? किंवा राजू पाटील कल्याण पूर्वेसाठी मनसेचा सक्षम पर्याय का शोधत नाही? असा सवालही या ठिकाणी उपस्थित केला जातो. तर दुसऱ्या बाजूला कुंपणच खातंय शेताला आणि बुजगावणेही फितूर अशी म्हण देखील या मतदारसंघासाठी बोलण्यात येते.

-संतोष दिवाडकर

Why is Raj Thackeray neglected Kalyan East?

Mahim Vidhansabha : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या सुपूत्रासाठी राज ठाकरेंनी केली होती मदत; आता त्यांच्याच सुपुत्रा विरोधात दोघांनीही दिले उमेदवार

Mahim Vidhansabha : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचे उमेदवार आता जवळपास निश्चित होऊ लागले आहेत. महायुती, महाविकास आघाडीसह मनसेने देखील आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मनसेने पहिल्यांदाच अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांना माहीम विधानसभेतुन उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या समोर दोन्ही शिवसेनेने आपआपले उमेदवार दिले आहेत.

मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानुसार कल्याण मधून निवडणूक लढवलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतली होती. मात्र आता राज ठाकरेंच्या सुपुत्रा विरोधातच एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभेत सदा सर्वणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मनसेत अंशतः नाराजी पहायला मिळत आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील वरळीतुन प्रथमच उमेदवारी लढत होते. त्याही वेळेस राज ठाकरेंनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. आता २०२४ विधानसभेला राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे देखील प्रथमच निवडणूक लढत आहेत. राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे राजकारणापलीकडे जाऊन नात्याला महत्त्व दिले त्याची परतफेड करण्याची संधी मात्र उद्धव ठाकरेंनी गमावली. यामुळे मनसे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही शिवसेने विरोधात रोषाची भावना निर्माण होऊ लागली आहे.

Mahim Vidhansabha: Raj Thackeray helped for the son of Uddhav Thackeray and Eknath Shinde; Now he has given his candidate against the son of Raj Thackeray

Kalyan Election : उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ठाकरे फडणवीस उद्या कल्याणमध्ये

Kalyan Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. निवडणूक आयोगाने २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिला आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी कल्याण पूर्व महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत महायुतीत रस्सीखेच सुरू असताना भाजप वरिष्ठांनी आपली जागा कायम ठेवत उमेदवारी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. याकरिता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असलयाचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थिती दर्शविण्याची शक्यता यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मनसेने देखील विद्यमान आमदार राजू पाटील यांनाच पुन्हा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या हस्ते राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला. त्याचवेळी राजू पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी स्वतः येत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी कल्याण शहरात दोन दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार असल्याने दोन्ही राजकीय पक्षांत उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Kalyan Election : Thackeray Fadnavis in Kalyan tomorrow to fill the applications of candidates

आजोबांच्या तरुणपणातला फोटो लागला हाती

आरसा हा आपला वर्तमान दाखवतो. पण आपला भूतकाळ जिवंत ठेवतो तो म्हणजे कॅमेरा. तो आता तर ज्याच्या त्याच्या हातातल्या मोबाईल फोनमध्ये आलेला आहे. पण पूर्वीच्या काळी कॅमेरा देखील फार दुर्मिळ असे. आज माझ्या वडिलांनी मला एक जुना फोटो दाखवला. जुन्या काळात जशी तैलचित्रे असायची तसा तो फोटो होता. कुणाचा फोटो होता हे अगोदर समजलेच नाही. अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या तरुणाचा तो एक रुबाबदार फोटो पाहत असतानाच वडील म्हणाले की हा तुझा आजोबांचा फोटो आहे.

फोटो पाहून विश्वासच बसेना. कारण मी माझ्या आजोबांना लहानपणी पाहिले होते. 2000 साली ते देवाघरी गेले जेव्हा माझे वय 6 वर्षे होते. त्यानंतर एका फोटोमध्येच मी त्यांना पाहत होतो. जो त्यांचा अंदाजे 60 ते 65 वयाचा फोटो असेल. यावरून कल्पनाच करू शकणार नाही की ही फोटोतली तरुण व्यक्ती माझे आजोबा असतील. आखीव रेखीव भुवया आणि भेदक अशी त्यांची नजर होती. कायम वजनात राहायचं आणि रुबाबात जगायचं ही त्यांची स्वभावशैलीच होती. गावखेड्यात आता 21 व्या शतकात बदल होऊ लागले आहेत. त्यापूर्वी शहरी भाग म्हणजे जणू परराज्यात जाण्यासारखे होते. दिवसभराचा अपूर्ण प्रवास आणि कुठेतरी मुक्काम असे काही त्याकाळी (50 वर्षांपूर्वी) असायचे.

ऐन तारुण्यात आजोबांनी गावी राहून फोटो कसा काढला? असा प्रश्न माझ्या मनात आला. फोटो मध्ये सूट घातलेला व्यक्ती गावाला कसा असू शकतो हाही प्रश्न आला? त्यानंतर वडिलांकडून समजले की माझे आजोबा हे तरुणपणातच मुंबईत आले होते. साधारणपणे तो काळ असावा अंदाजे 1960 ते 1965 च्या दरम्यानचा. मुंबईत आल्यानंतर त्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची देखील संधी मिळाली होती. परंतु शहरापेक्षा गाव बरा असे त्यांना वाटले असावे किंवा कौटुंबिक जबाबदारी, अशा कोणत्यातरी कारणाने त्यांनी मुंबईतील वास्तव्य सोडून पुन्हा ते गावात आले. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा खेडयात त्यांना राहणे जास्त सुकर वाटले. पुढे त्यांनी कायमस्वरूपी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. दोन मुलं आणि तीन मुली असा त्यांचा प्रपंच होता. पत्नी पार्वताबाई यांच्या सोबत त्यांचा शिस्तीचा पण सुखाचा संसार झाला. पाठीवर एक भाऊ आणि दोन बहिणी तुकाराम, अंजुबाई आणि पप्पूबाई.

पप्पूबाई ही त्यांची बहीण कडक स्वभावाची होती. पुढे त्यांचाही विवाह झाला. मुळशी तालुक्यातील मौजे उरावडे गावात कांजणे घराण्यात त्यांना देण्यात आले. तर अंजुबाई यांनाही मुळशी तालुक्यातील मौजे आंबवणे गावात भावेकरांची सून म्हणून पाठविले. पुढे लहान भावाचा विवाह झाला. आणि धोंडिबा बाबांनी घराची वाटणी करून आपल्या संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली. त्यांची पाच अपत्ये असून माझे वडील नारायणराव हे थोरले सुपुत्र. यानंतर राजेंद्रराव, नंदाबाई, मंदाबाई, कुंदाबाई ही माझ्या वडिलांनी भावंडे.

मुंबईत वास्तव्यास असताना त्यांनी एका फोटो स्टुडिओमध्ये जाऊन स्वतःचा एक फोटो काढला होता. तो फोटो खरंतर ब्लॅक अँड व्हाईट होता. पण गावी येताना ते हा फोटो घेऊन आले होते. त्याकाळी स्वतःचा फोटो असणे ही खूप मोठी गोष्ट होती. गावात आल्यानंतर संपूर्ण गावाला त्यांनी तो फोटो दाखवला. फोटो पाहण्यासाठी गावकरी म्हणजेच त्यांचे सवंगडी घरीही येत होते. अनेक वर्षे होत गेली. धोंडीबारावांचं वय वाढू लागले. मुले मोठी होत गेली. थोरला मुलगा म्हणजे माझे वडील नारायणराव अंदाजे 12-13 वर्षांचे असतानाच त्यांना दमदाटी करन त्यांचे भाचे सुरेशराव भावेकर यांच्यासोबत मुंबईला नोकरीस पाठवून दिले. तो काळ होता 1962 चा. (वडिलांचा प्रवास नंतर लिहून प्रकाशित केला जाईल).

माझे वडील मुंबईत नोकरीस आल्यानंतर ते अजूनही मुंबईतच आहेत. गावाशी नाळ जोडली असल्याने बालपण गावी गेले असल्याने ते अधूनमधून गावी जातातच. तेव्हाही गावी गेले असताना आजोबांच्या जुन्या सामानात त्यांना आजोबांचा हा फोटो सापडला. त्यांनी तो फोटो मुंबईत आणून बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये रंग भरले. आणि फ्रेम करून गावाला पाठवून दिली. पण फ्रेम फुटल्यानंतर फोटो व्यवस्थितपणे ठेऊन देण्यात आला. आता पुन्हा तो फोटो त्यांना मिळाला आणि त्यांनी तो मला दाखवला. म्हणून हा फोटो आणि फोटोमागची जेवढी समजली तितकी कहाणी सर्वांना समजावी यासाठी हा माझा बऱ्याच दिवसनांतर आलेला स्पेशल लेख.

धन्यवाद !!!

  • संतोष नारायण दिवाडकर (पत्रकार 8767948054)

सूचना : ज्यांनी कुणी हा लेख वाचला असेल ते जर मला ओळखत नसतील तर त्यांनी कृपया मला व्हॉट्सअप वर आपल्याला काय वाटलं ते कळवावे. आणि आणखीन काही जुन्या गोष्टी शेअर कराव्यात. अगदी निःसंकोचपणे बिनधास्तपणे सांगा.

मंत्री रवींद्र चव्हाणांना डोंबिवलीतुन तिकीट कन्फर्म ; BJP चा Dombivli बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा निर्धार

BJP Dombivli : विधानसभा निवडणूका जाहिर झाल्या आहेत. त्याचबरोबर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपने अधिकृतपणे उमेदवारी देखील जाहीर केली आहे. आजपर्यंत पक्षाला विजयश्री मिळवून देण्यासाठी भाजपचे शेकडो पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, आजी माजी जिल्हाध्यक्ष ज्यांनी कल्याण, डोंबिवलीसह जिल्ह्यात भाजप रुजवला, वाढवला अशा सर्वांचा डोंबिवलीत ब्राह्मण सभा येथे रविवारी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी डोंबिवली बालेकिल्ला अभेद्य राहील असा निर्धार सर्व ज्येष्ठ मंडळींनी केला.

भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की, जिथे कार्यकर्त्याचा सन्मान होतो. कै. रामभाऊ म्हाळगी, दिवंगत नायब राज्यपाल राम कापसे, स्व. दिगंबर विशे, स्व.संत, स्व.कांतबाबू आपले माजी मंत्री जगन्नाथ पाटील, संजय केळकर, पद्माकर कुलकर्णी, यांच्यासह के आर जाधव, शशिकांत कांबळे, विद्यमान अध्यक्ष नाना सूर्यवंशी आदींचे पक्षासाठी योगदान खूप मोलाचे असल्याचे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. या सगळ्यांनी पक्षाला बळकटी दिली. शून्यातून पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आता पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत, त्यांच्या कष्ट, पक्षाविषयी प्रेम, आदर, आपुलकी, एकीला माझा सॅल्युट अशा शब्दात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ मंडळींचे योगदानाबद्दल आदर व्यक्त केला. ज्यावेळी ही सगळी मंडळी झटत होती तो काळ प्रतिकूल परिस्थितीचा होता, हे इतिहास सांगतो. आता बऱ्याच प्रमाणात अनुकूल दिवस आले असून प्रतिकुल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची ताकद या ज्येष्ठ मंडळींमध्ये आहे. त्यांनी अपार मेहनत घेऊन, एकेक कार्यकर्ता पक्षात कसा टिकून राहील याची काळजी घेतली. त्यांनी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे, त्या सगळ्यांची मेहनत आता कामाला येत आहे असेही चव्हाण म्हणाले.

आयोजित मेळाव्यात पक्षाचे आतापर्यंत झालेले माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. त्यांना पन्नास हुन अधिक वर्ष होऊनही त्यांचे पक्षाबद्दल असलेले अपार प्रेम, आपुलकी पाहून मनाला उभारी मिळते, एकेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता हे ऊर्जा, स्फूर्तिस्थान आहे. आताच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्याकडून बरच शिकण्यासारखे आहे. ही ऊर्जा स्थान आहेत म्हणूनच आपण सगळे कार्यरत आहोत, त्या सगळ्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले आहे त्या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. पुन्हा एकदा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी त्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले असून शतप्रतिशद भाजप असे सांगून मला बळकटी दिली आहे. ते सगळे त्यांच्या स्तरावरून आत्ताही पूर्णपणे पक्षाचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी आश्वस्थ केले. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र चव्हाण किती ताकदीने मैदानात उतरणार आहेत हे लवकरच समोर येणार आहे.

BJP determined to keep Dombivli stronghold impregnable

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा उद्धव ठाकरेंना धक्का; शेकडो पदाधिकारी भाजपात

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मराठवाड्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे डोंबिवलीत आशावादी असलेल्या उद्धव ठाकरेंना चव्हाण यांनी डोंबिवलीतच धक्का दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही हा प्रवेश केला असून आम्हाला त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल प्रचंड आदर आहे. आम्ही त्यांचे काम पाहिले आहे. महाराष्ट्राला अशा नेत्याची गरज असून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आम्हीही आता मराठवाडयामध्ये सिल्लोड, नांदेड, उस्मानाबाद आदी सर्व भागात पक्ष वाढी, बळकटीसाठी झटणार असल्याचे राजपूत समाजाचे मराठवाडा येथील नेते माधव सिंह राजपूत उर्फ अशोक राठोड यांनी डोंबिवलीत आपले मत व्यक्त करताना सांगितले.

बदनापूर विधानसभेचे भाजपचे आमदार नारायण कुचे, कल्याण जिल्हा सरचिटणीस, १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर परब, दत्ता माळेकर यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने अनिल राठोड रामेश्वर काळे, योगेश ठोंबरे समाधान वाघ लहू तिडके सह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Minister Ravindra Chavan’s shock to Uddhav Thackeray; Hundreds of officials in BJP

कल्याण पश्चिम आमदार Vishwanath Bhoir यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन

Vishwanath Bhoir : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पंचवार्षिक विकास कामांच्या अहवालाचा सादरीकरण आणि प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अहवाल प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक सादर करतांना पाच वर्षात सहकार्य केले त्याबद्दल माध्यमांचे आभार मानले.

मागील पाच वर्षात मला फक्त अडीच वर्ष काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीची अडीच वर्ष ही कोव्हिड काळात गेली. तरीदेखील मी थांबलो नाही, तब्बल अडीच वर्षात मी शासनाकडून २०२३ कोटी रुपयांचा निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणला असून विकास कामे झपाट्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे भोईर यांनी सांगितले.

आयोजित अहवाल प्रकाशन सोहळ्याला शिवसेनेच्या छाया वाघमारे, उपनेत्या विजया पोटे, नेत्रा उगले, कल्याण जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे, संजय पाटील, प्रभूनाथ भोईर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, टिटवाळा ते कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात आमदारांनी विकास कामांची गंगा आणली, त्यात काँक्रिट रस्ते, नाले, गटार, अंतर्गत रस्ते, पायवाटा, उद्याने सुशोभिकरण तर स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक मोठ्या प्रकल्पांची विकास कामे केली आहेत. आमदारांनी प्रत्येक विभागात आणि प्रभागात न्याय देण्याचे काम केले आहे.

Publication of five year work report of Kalyan West MLA Vishwanath Bhoir